मुंबई (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाच्या पूर्वसंध्येला माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या सरकारने कोरोनाच्या काळात दारू विक्रेते आणि विदेशी दारू पिणाऱ्यांना दिलासा दिला; परंतु राज्यातील कामगारांना एका पैशाचीही मदत केली नाही. एवढेच नाही, तर कोरोनाच्या काळात पान दुकान, हातगाडी, चहाची दुकाने बंद होती, तेव्हाही महाविकास आघाडी सरकारने गरीब आणि मजुरांना मदत केली नाही. मात्र महाविकास आघाडी सरकारने मद्य परवाना शुल्कात ५० टक्के रक्कम सवलत दिली.
मुंबईतील चांदिवली विधानसभा क्षेत्रातील असल्फा येथे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला भाजप उत्तर मध्य मुंबईचे जिल्हा उपाध्यक्ष शुभ्रशू दीक्षित यांनी कामगार बांधवांच्या सन्मानार्थ श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान, पंचरत्न बिल्डींग जवळ, आ. मिलिंद नगर असल्फा घाटकोपर पश्चिम येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कामगार बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फडणवीस बोलत होते.
फडणवीस म्हणाले, “कोरोनाच्या काळात सर्व दुकाने बंद होती, बार बंद होते, त्यामुळे दारू विक्रेत्याला मोठा फटका बसला होता. त्यामुळे दारू विक्रेत्यांना दिलासा देण्यासाठी मविआ सरकारने त्याची लायसन्स फी निम्मी करण्यात आली. कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे सरकारने दारू विक्रेत्यांचे परवाना शुल्क ५० टक्क्यांनी कमी करण्याचे काम केले. मात्र या सरकारने गोरगरीब मजुराला एक पैशांची मदत केली नाही.
भाजपचे उत्तर मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष शुभ्रांशू दीक्षित म्हणाले की, केंद्र सरकारने मजुरांसाठी तयार केलेल्या सर्व योजनांची आम्ही आपल्या क्षेत्रात अंमलबजावणी करण्याचे वचन दिले आहे. या कार्यक्रमाला स्थानिक खा. पूनम महाजन, मुंबई भाजप अध्यक्ष व आ. मंगल प्रभात लोढा आणि मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय, भाजपचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष सुषम सावंत, सामाजिक कार्यकर्ते राजेश दुबे यांचीही उपस्थिती होती.