मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करणार, असे म्हटल्याने नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला. मग मशिदींसमोर हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांवर तुम्ही काय कारवाई करणार आहात? आमच्या मशिदींपेक्षा तुमचे मातोश्री निवासस्थान पवित्र आहे का?; असा सवाल एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला.
‘राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत जे भाषण केले ते हिंसेला चिथावणी देणारे होते. एकदा होऊनच जाऊ द्या, असे खुले आव्हान त्यांनी दिले त्याचा अर्थ काय? एका व्यक्तीमुळे तुम्ही राज्याची शांतता पणाला लावणार आहात का?’, अशा प्रश्नांची ठाकरे सरकारवर सरबत्ती करत खासदार आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी राज यांच्यावर निशाणा साधला. ‘प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राज यांना अटक करून तुरुंगात टाका म्हणजे त्यांचे डोके ठिकाणावर येईल. आपण काय बोलले पाहिजे आणि काय नाही, याचे भान त्यांना राहील’, असेही ओवेसी यांनी ठणकावून सांगितले.
‘राज ठाकरे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. औरंगाबादचेच उदाहरण द्यायचे झाले तर तिथे हिंदू, मुस्लिम आणि दलित बांधवांमध्ये सलोखा आहे. तो भंग करण्याचा डाव यामागे दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे. राज ठाकरे यांच्याविरुद्ध कलम १५३ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे,’ अशी मागणी ओवेसी यांनी केली.
राज ठाकरे यांनी आधी उत्तरभारतीयांना लक्ष्य करून राजकारणात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तो प्रयोग फसल्यानंतर ते आता मशिदींवरील भोंग्यांविरुद्ध बोलू लागले आहेत. ते कायदा हातात घेत आहेत हे स्पष्ट दिसत आहे मग तो भाऊ आहे म्हणून मुख्यमंत्री गप्प आहात का?, यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी का बोलत नाही. त्यांचे सेक्युलर धोरण हेच आहे का, असे सवालही ओवेसी यांनी विचारले. दोघे भाऊ एकमेकांच्या विरुद्ध असल्याचे दाखवत असले तरी प्रत्यक्षात तसे नाही. दोन्ही भाऊ एकत्रच आहेत, असा दावाही ओवेसी यांनी केला.