नवी दिल्ली (हिं.स.) : देशात विजेचा तुटवडा आणि कोळशाची वाढती मागणी पाहता भारत सरकारने कोळशाच्या आयातीत वाढ करण्याचा विचार करत आहे. जूनपर्यंत भारत परदेशातून १.९ दशलक्ष टन कोळसा आयात करण्याचे काम करत असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.
वाढत्या उष्णतेमुळे वाढता वीजवापर लक्षात घेऊन भारत सरकार हे पाऊल उचलत आहे. माहितीनुसार, भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा कोळसा आयातदार देश आहे आणि विजेचा वाढता वापर पाहता, जास्त कोळसा मागवला जात आहे.
एका अहवालात नमूद केल्यानुसार एप्रिलमधील तीव्र उन्हाळ्यामुळे गेल्या ६ वर्षांतील सर्वात भीषण वीज संकट भारतात आले आहे. ऊर्जा मंत्रालयानुसार, केंद्र सरकारने सरकारी मालकीच्या युटिलिटीजना २२ दशलक्ष टन कोळसा आणि खाजगी पॉवर प्लांटना १५.९४ दशलक्ष टन आयात करण्यास सांगितले आहे. ऊर्जा मंत्रालयाने राज्याच्या ऊर्जा विभागांच्या उच्च अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात, वाटप केलेल्या रकमेपैकी ५० टक्के ३० जूनपर्यंत, ४० टक्के ऑगस्टच्या अखेरीस आणि उर्वरित १० टक्के ऑक्टोबरच्या अखेरीस वितरित करण्याची खात्री करण्यास सांगितले आहे.
देशातील एकूण १५० पॉवर प्लांटपैकी ८८ प्लांटमध्ये कोळशाचा तुटवडा आहे. सोप्या भाषेत याचा अर्थ असा होतो की भारतातील ६० टक्के कारखान्यांना कोळशाचा तुटवडा जाणवत आहे. कोळशाची कमतरता असलेल्या ८८ वीज प्रकल्पांपैकी ४२ राज्य सरकारच्या, ३२ खाजगी, १२ केंद्र सरकारच्या आणि २ संयुक्त उपक्रमांतर्गत आहेत.
एप्रिल २०२२ मध्ये भारतातील विजेची मागणी १३.६ टक्क्यांनी वाढून १३२.९८ अब्ज युनिट झाली आहे. एप्रिल २०२१ मध्ये देशातील विजेचा वापर ११७.०८ अब्ज युनिट्स होता. वृत्तानुसार, झारखंडमध्ये सुमारे १२ टक्के कमी वीज पुरवठा होत आहे. झारखंडसोबतच मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांमध्येही विजेचा तुटवडा जाणवत आहे.