सिंधुदुर्ग (हिं.स.) : मालवण तालुक्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा असलेल्या श्री देवी भगवती मंदिराशेजारील धामापूर तलावात गेल्या चार दिवसांपासून अचानक आणि मोठ्या प्रमाणावर लहान-मोठे मासे मृत होण्याचे प्रमाण वाढले आहे.
अचानक मासे मृत होण्यामुळे संपूर्ण तलावाच्या काठावर मेलेले मासे तरंगत येउन मृत माशांचा खच पडला आहे आणि संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच पाण्याचा रंगही काही प्रमाणात काळसर झाल्याचे स्थनिकांच्या निदर्शनास आले आहे. धामापूर भगवती मंदिर आणि तलावाच्या सुमारे ४५० ते ५०० वर्षाच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडल्याचे स्थानिक जाणकार व्यक्तींनी सांगितले.
एवढ्या मोठ्या प्रमाणात तलावातील मासे मृत होण्याचे नेमके कारण अजून निश्चित समजले नाही. परंतु १७ मार्च २०२२ पासून गावकऱ्यांमधील अंतर्गत वादावरील न्यायलयीन प्रक्रियेमुळे देवी भगवती मंदिर कुलूपबंद करण्यात आले आहे, पर्यायाने तेव्हापासून मंदिराच्या इतिहासात प्रथमच एवढे दिवस देवी भगवतीची नित्यपुजा बंद आहे.
या प्रकारामुळेच देवीचा प्रकोप झाला असावा आणि सध्याची अघटीत परिस्थिती निर्माण झाली असावी अशीदेखील चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे. तर काही जण वाढत्या उष्णतामानामुळे मासे मरत असतील असे मत व्यक्त करत आहेत.
दरम्यान धामापूर तलावाचे पाणी धामापूर, काळसे, गावांसह संपूर्ण मालवण शहराला पिण्यासाठी नळयोजनेमार्फत पुरविले जाते. परंतु आता तलावात आणि काठावर लाखो मासे मरुन पाण्यावर तरंगत असल्याने पाणी दूषित झाले असल्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.
काळसे ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण काळसे गावात दवंडी पिटून धामापूर तलाव नळयोजनेचे पाणी वापरणाऱ्या नागरिकांना नळाचे पाणी पिण्यासाठी न वापरण्याचे आणि पाणी निर्जंतुक करून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच काळसे सरपंच केशव सावंत आणि आरोग्य सेवक गणेश जाधव यांनी आज सकाळी तलावाकाठी जाऊन मृत मासे आणि पाण्याची पाहणी केली. यावर लघुपाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून पाण्याची तपासणी करावी आणि मृत मासे तलावातून बाहेर काढून पाणी शुद्धीकरण करावे असे आवाहन करण्यात येत आहे.