Sunday, March 23, 2025
Homeमहत्वाची बातमीराज ठाकरेंच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने ठाकरे सरकारचा जळफळाट झाला

राज ठाकरेंच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने ठाकरे सरकारचा जळफळाट झाला

प्रवीण दरेकरांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने ठाकरे सरकारचा जळफळाट झाला आहे. तोच राग आता सरकार बाहेर काढत आहे. त्यामुळेच पोलिसांनी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली. मनसेचे मशिदींवरील भोंग्यांबाबतचे आंदोलन चिरडण्यासाठी दबाव आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून सरकार मनसैनिकांना संदेश देऊ पाहत आहे. आमच्याविरोधात बोललात तर कायद्याचा वापर करून तुम्हाला पूर्णपणे दाबू, असे सरकार सुचवू पाहत आहे, असा आरोपही दरेकर यांनी केला.

यावेळी प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरे यांचे समर्थन करत ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. सरकारने एखादे आंदोलन चिरडायचे ठरवले तर काय होऊ शकते, याचे उदाहरण म्हणून मी मनसेकडे पाहत आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकतील, अशा मनसेच्या नेत्यांना जेरबंद केले जात आहे. तुमच्या पक्षाच्या प्रमुखांवर गुन्हा दाखल होऊ शकतो, यामधून बाकीच्यांनी बोध घ्या, हे सरकारकडून अधोरेखित करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्य सरकारलाच शांतता नको आहे. अशाप्रकारे धरपकड, नोटीस किंवा अटक करून हिटलरशाही पद्धतीने शांतता राखता येईल, असा सरकारचा समज आहे का? पण राज्य सरकार हिंदुत्वाची चळवळ जितकी दडपण्याचा प्रयत्न करेल, तितकी ती उसळी मारून वर येईल, असेही दरेकर यांनी म्हटले.

यावेळी दरेकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीकास्त्र सोडले. मनसेच्या आंदोलनाआडून घातपात करण्यासाठी परराज्यातून लोक आल्याचा दावा संजय राऊत करतात. पण त्यांना निराधार आणि बेजबाबदारपणे बोलण्याची सवय आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी बाहेरून राज्यात लोक येत असतील तर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करावी. मात्र, मनसेच्या नेत्यांना नोटीस पाठवून आणि गुन्हे दाखल करुन राज्य सरकारकडून एकप्रकारे अघोषित आणीबाणी लादण्यात आली आहे, असेही दरेकर म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -