औरंगाबाद : सांगलीमधील शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढलेले असतानाच औरंगाबादमधील सभेप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात मंगळवारी औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संविधानातील कलम ११६, ११७, १५३ अ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम १३५ नुसार हा गुन्हा दाखल आला आहे. या सभेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादेत सभा घेतली होती. या सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे यावरुन टीकेची झोड उठवली होती. या भाषणाप्रकरणी मंगळवारी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात दोन समुहांमध्ये भांडण लावल्याचा आरोप ठाकरेंवर करण्यात आला आहे. तसेच प्रक्षोभक वक्तव्य करणे, अटींचे उल्लंघन केल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा प्रकरणात आता पोलिसांनी तत्काळ कठोर भूमिका घेणार असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता औरंगाबादमध्ये ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन झाल्याचे समोर आल्याने पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यास सरकारनेही संघर्षाची तयारी ठेवावी, असे मनसेच्या संदीप देशपांडे यांनी इशारा दिला आहे.
तर राज ठाकरे यांनी आज शेवटचा दिवस असल्याचे म्हणत मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत मंगळवारी शिवतीर्थावर बैठक बोलावली. याआधीच मनसेच्या कार्यकर्त्यांना १४९ नुसार नोटीस देण्यात आल्या आहेत. यानंतर राज्यात घडामोडींना वेग आला असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तत्काळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. त्याआधी त्यांनी पोलीस महासंचालकांसोबत बैठक घेतली.