शिबानी जोशी
भटक्या व विमुक्त जमाती पूर्वीपासून एका गावातून दुसऱ्या गावात भटकत असतात. त्यामुळे त्यांना स्वतःचं घर नसे, ना त्यांची मुलं एका ठिकाणी शिकू शकत असत. या गटासाठी ही शिक्षण, स्वावलंबन, सन्मान, सुरक्षा पोहोचली पाहिजे यासाठी काही तरी काम करावं, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांना जाणवलं. त्यासाठी २ ऑक्टोबर १९९१ साली पुण्यामध्ये भटक्या-विमुक्त विकास परिषदेची स्थापना झाली. दादा इदाते त्याचे अध्यक्ष झाले. संघाचे अनेक संघटनातले निरलस कार्यकर्ते प्रकल्पामध्ये अथकपणे काम करत राहिल्यामुळे बत्तीस वर्षं हा प्रकल्प नवनवीन उपक्रम हाती घेऊ शकला आहे. दादा इदाते, गिरीश प्रभुणे, रमेश पतंगे आणि विवेक साप्ताहिकाचा समूह, समरसता मंचाचे कार्यकर्ते, स्थानिक कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली. त्यातूनच पुढे यमगरवडीला भटक्या-विमुक्तांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळा, वसतिगृह, मुलींसाठी वेगळे वसतिगृह, कौशल्ये आधारित प्रशिक्षण असे प्रकल्प सुरू झालेत. भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठान अंतर्गत उस्मानाबादपासून यमगरवाडी हे ४० किलोमीटर अंतरावर आहे तिथे हा प्रकल्प सुरू झालाय.
उस्मानाबाद येथे सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शहापूरकर हे त्यावेळी संघाच्या जनकल्याण समितीचे काम करत असत. त्यांना या प्रकल्पामध्ये काम कराल का? अशी विचारणा झाली आणि त्याने होकार दिला. डॉक्टर शहापूरकर दर आठवड्याला एक दिवस प्राथमिक आरोग्याच सर्व सामान घेऊन तिथे जातात. सुरुवातीला ३-४ झोपडीवजा घरात ही शाळा चालत असे. त्या ठिकाणी जाण्यासाठी पक्का रस्ताही नव्हता. डॉक्टर तिथे जाऊन या मुलांची नखं कापत असत. अस्वच्छता आणि कुपोषण या मुलांमध्ये खूपच दिसून येत असे. त्यामुळे गजकर्ण, खरूज असे रोगही त्यांना होत असत. मग त्यांना मलमपट्टी करणं, सकस आहार देणे, प्राथमिक उपचार करणे अशी कामे डॉक्टर करत असत. एखादा गंभीर आजारी मुलगा असला तर त्याला स्वतःच्या उस्मानाबाद येथील रुग्णालयात नि:शुल्क सेवा देण्यासाठी आणतसुद्धा असत. अशा रीतीने सुरुवातीला बावीस मुलांपासून सुरू झालेली शाळा शासनमान्य झाली असून आज तिथे चारशे निवासी मुलं शिकत आहेत. त्यांचे शिक्षण, त्यांच्यावर संस्कार, खेळ, आरोग्य सुविधा, त्यांच्याकडील कौशल्यांचा विकास हे सर्व संस्थेतर्फे केलं जातं. आता सध्या प्रतिष्ठानचे डॉक्टर शहापूरकर हे उपाध्यक्ष आहेत, तर अध्यक्ष म्हणून पनवेलचे रामचंद्र वैदू काम पाहतात. आता प्रतिष्ठानच्या अंतर्गत एकलव्य शाळा, वसतिगृह, मुलींचे वसतिगृह, पालावरची शाळा असे उपक्रम राबवले जात आहेत, त्यात ४० ते ४८ जाती-जमातीतील साडेचारशे, ५०० मुलं गेली तीस-बत्तीस वर्षं इथे शिक्षण घेत आहेत. हजारो मुलं शिकून बाहेर पडली आहेत. काही महिला नर्सिंग कोर्स केल्यामुळे प्रतिष्ठित रुग्णालयात परिचारिका झाल्या आहेत. १-२ विद्यार्थ्यांनी स्वतः सोलापूरसारख्या ठिकाणी वसतिगृह सुरू केली आहेत. नुसतं बी.ए., बी.कॉम. होऊन आज-काल शहरातल्या मुलांनाही नोकरी मिळत नाही. त्यामुळे कौशल्य आधारित प्रशिक्षण देऊन या मुलांना लगेच हाताला काम मिळेल आणि रोजगार उपलब्ध होईल असे प्रशिक्षण वर्ग आठवीपासूनच चालवले जात आहेत. मुलांच्या वसतिगृहाची जागा कमी पडू लागली असल्यामुळे आता आणखी मोठं वसतिगृह उभारले जात आहे. यमगर वाडीमध्ये कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान उभारण्यात आले आहेत.काही विद्यार्थी राजकारणात, काही समाजकारणात गेली आहेत. काही शिक्षक, सिव्हिल इंजिनीअर झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची एक माजी विद्यार्थी संघटना स्थापन झाली आहे. ही सर्व मुलं भावनिक दृष्ट्या संस्थेशी बांधली गेली आहेत. ही मुलं वर्षातून एकदा एकत्र येतात आणि स्वतःच्या सध्याच्या कामाबद्दल एकमेकांकडे विचारांचं आदान-प्रदान करतात.
ज्या मुलांना शाळेमध्ये येऊन शिकता येत नाही अशांसाठी मग पालावरची अभिनव शाळा हा उपक्रम सुरू झाला. भटक्या-विमुक्तांच्या पालावर पोहोचून तिथे त्यांना बेसिक शिक्षण द्यायचं अशी ही योजना आहे. त्यांना चौथीपर्यंतच अनौपचारिक शिक्षण या शाळेत दिलं जातं आणि नंतर यमगरवाडी किंवा त्यांच्या गावातच शाळा असेल, तर तिथे ती मुलं शिकायला जाऊ शकतात; परंतु सुरुवातीचं शिक्षण त्यांच्या पालावरच झाल्यामुळे ते शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकतात हे महत्त्वाचं ठरतं. सुरुवातीची पाच-सात वर्षं कठीण गेली या मुलांना जमवून आणि त्यांना टिकवणं हे फार कठीण काम होतं; परंतु नंतर त्यांना या गोष्टीचे महत्त्व कळल्यावर आता मात्र ही मुलं येऊ लागली आहेत. पूर्वी काही मुलं पळून जात असत, काही मुलांचे आई-वडील तुरुंगात असत, काही जणांचे पालक वारलेले असत. त्यामुळे ही मुलं शिक्षण घेण्याच्या मानसिकतेतच नसत. त्यांना नीटपणे समजावून शाळेत टिकवण्याचं मोठं काम पार पाडत विद्यार्थी संख्या हळूहळू वाढवू शकले आहेत.
चांगलं आणि नि:स्वार्थी काम केलं की ते कोणत्याही कानाकोपऱ्यात असो त्याची दखल सजग नागरिकांकडून नेहमीच घेतली जाते. याची अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकीच एक यमगरवाडी प्रकल्प. या प्रकल्पाची माहिती झाल्यानंतर हजारो हात येऊन मिळाले. या कामाची मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद या ठिकाणी नोंद झाली आणि बघता बघता या बीजाचा वटवृक्ष झाला. पुण्यात तर “यमगरवाडी मित्र मंडळ” अशी एक संस्था स्थापन झाली आहे. मुंबईतही अशी संस्था स्थापन झाली आहे. त्याने हर प्रकारे या प्रकल्पाला मदत केली आहे. आर्थिक मदत, अनेक प्रकारच्या वस्तू, मुलांना मानसिक आधार देण्याचे काम या मंडळातर्फे करण्यात येत. एखाद्या सामाजिक प्रकल्पासाठी एक मंडळ स्थापन होणे ही खरंच वेगळी घटना म्हणावी लागेल. मंडळाच्या मदतीचं एक उदाहरणच द्यायचं झालं, तर दिवाळीच्या वेळी पुण्यातल्या अनेक कार्यकर्त्यांच्या घरी इथली मुलं ८ दिवस राहायला जात असत. शहरी घरातील वातावरण, त्यांचा दिनक्रम, संस्कार, संस्कृती कसं जोपासले जाते? हे या मुलांना प्रत्यक्ष पाहायला मिळत असे. आठ दिवस एकत्र राहिल्यामुळे त्यांच्यात एक मैत्रीचा बंध निर्माण होतो. त्यापैकीच एक उदाहरण म्हणजे एका पन्नाशीच्या बाईंच्या घरी एका मुलीला राहायला ठेवलं होतं. या बाई सकाळी उठायच्या, सर्व आवरायच्या, आंघोळ करायच्या, देवपूजा करायच्या, देवासमोर नैवेद्याचं ताट ठेवायच्या, रांगोळी काढायच्या. मुलगी सर्व पाहायची. पण तिला असं वाटायचं की, देवापुढे ठेवलेला नैवेद्य काय करतात? याचं पुढे काय होतं? एक दिवस बाई काही कामासाठी बाहेर गेल्या असताना या मुलीने नैवेद्य खाऊन टाकला. घरी आल्यावर बाईंनी पाहिलं की देवासमोर नैवेद्य नाही. त्यांच्या लक्षात आलं, परंतु त्या मुलीला म्हणाल्या, “बघ, इतकी वर्षं मी मनोभावे देवाला नैवेद्य ठेवत आहे. पण तू रागाला आलीस आणि आज खरोखरच देव येऊन माझा नैवेद्य खाऊन गेला आहे “म्हणजे त्या मुलीच्या रूपात त्या बाईंनी देव पाहिला होता. हे त्या मुलीच्या लक्षात आल्यावर तिला ओशाळल्यागत झालं आणि हीच खरी संस्कृती हे तिच्या मनावर कायमचं कोरलं गेलं. सामाजिक समरसता ही आणखी वेगळी काय असणार? भटक्या-विमुक्त विकास परिषदेच्या अंतर्गत हळूहळू असे मोठे मोठे प्रकल्प सुरू झाले असून शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, सन्मान देण्याबरोबरच त्यांची सुरक्षा हेसुद्धा महत्त्वाचं उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
डोंबारी, वडारी अशा काही समाजाची मुलं शाळेत येऊ शकत नाहीत. कारण त्यांनाही आपल्या आई-वडिलांबरोबर काम करावं लागतं, खेळ करावे लागतात. हे लक्षात घेतल्यानंतर पालावरची अनुभव शाळा हा एक अभिनव उपक्रम परिषदेने सुरू केला. पालावरच्या एखादा चुणचुणीत मुलाला आठ दिवसांचे प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याने त्या वस्तीतील मुलांच्या सोयीच्या वेळेनुसार तिथे तीन तास शाळा चालायची त्यामध्ये बाराखडी, अंकलिपी, छोटी छोटी गणितं, गाणी, खेळ शिकवायचे. शालेय साहित्य संस्थेतर्फे त्यांना विनामूल्य दिले जातात. तसेच आठवड्यातून दोन दिवस पोषक आहारही दिला जातो. त्या कार्यकर्त्याला मानधनही दिले जात. यातून त्यांना शिक्षणाची गोडी लागते आणि नंतर माध्यमिक शिक्षणासाठी ते वसतिगृहामध्ये येऊ शकतात अशी पालावरची शाळा चालवणे मागची संकल्पना आहे. त्या गोष्टीसाठी एक प्रथमोपचार पेटीसुद्धा या कार्यकर्त्याकडे दिली जाते. किरकोळ उपचार आल्यावरच त्यांना त्यामुळे मिळू शकतात. अशा शाळा सध्या ५५ ठिकाणी चालू आहेत. या कामासाठी राज्य शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक पुरस्कार शाळेला मिळाला आहे तसेच सोलापूरच्या प्रिसीजन फाऊंडेशन, पुण्याच्या नातू फाऊंडेशनचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार संस्थेला मिळाले आहेत. संस्थेमुळे भटक्या-विमुक्तांच्या जीवनमानात लक्षणे असे परिवर्तन घडले आहे त्याचीच साक्ष हे पुरस्कार देतात. शिक्षणाबरोबरच इतरही सामाजिक काम संस्था करत असते. जवळपास ४० हजारांपेक्षा जास्त पारधी समाजातल्या लोकांना आधार कार्ड जातीचा प्रमाणपत्र मिळवून द्यायला प्रतिष्ठानला मदत केली आहे. या लोकांची कागदोपत्री कुठेच नोंद नसल्यामुळे त्यांना कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येत नव्हता. हे लक्षात आल्यावर या लोकांच्या पालावर अरेंज करून आधारकार्ड, वयाचा दाखला, निवडणूक ओळखपत्र, जातीच्या दाखल्याचं वाटप प्रतिष्ठाननं केलं आहे. त्याचं कौतुक तत्कालीन मंत्री आर. आर. पाटील यांनीही केलं होतं आणि योजनेची यशस्विता पाहून अहमदनगर जिल्ह्यातही अशा तऱ्हेच काम उभं राहिलं होतं.
खरं तर यातील अनेक भटक्या-विमुक्त जाती जमातीमध्ये विविध कौशल्य आहेत. ही मुलं अत्यंत काटक असतात. त्यामुळे ते उत्तम खेळ खेळू शकतात. पशुपक्ष्यांचे खेळ घेऊ शकतात. अगदी भंगारात निघालेल्या लोखंडापासून शस्त्रास्त्र निर्मिती करू शकतात, ओतारी समाज आहे तो मूर्ती घडवण्याचं काम उत्तम करू शकतो. वडार समाजातील लोक दगडातून उत्तम मूर्ती काढू शकतात, गड बांधणी करू शकतात. ही कौशल्य लक्षात घेऊन विश्वकर्मा यांच्या नावाने एक इन्स्टिट्यूट उभारावी अशी कल्पना पुढे आली आहे आणि गेल्या तीन-चार वर्षांपासून त्यावर काम सुरू आहे. इयत्ता आठवीपासूनच त्यांना दोन दिवस कौशल्य विकासाचे प्रशिक्षण इथे दिलं जाणार यात. इलेक्ट्रिशन, प्लंबर, सुतारकाम, मोबाइल फोन दुरुस्ती असे छोटे छोटे प्रशिक्षण देऊन नोकरीच्या मागे वेळ घालवण्यापेक्षा लगेचच ते आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकतील व स्वाभिमानाने जगू शकतील. त्यातून या समाजातील लोकांना कौशल्य आधारित शिक्षण देऊन रोजगारनिर्मिती करता येऊ शकेल आणि त्यांना समाजात सन्मानाने जगता येऊ शकेल, अशी धारणा आहे. शिवाय त्यांच्यातील पारंपरिक कलागुणांना वाव मिळेल आणि त्या पुढच्या पिढीपर्यंतही पोहोचतील. समाजातील दानशूर यासाठी पुढे आले, तर हे काम अधिक वेगाने मार्गी लागेल हे नक्की.