नवी दिल्ली (हिं.स.) : देशात आज, मंगळवारी देशात अडीच हजारांहून अधिक कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. कालच्या तुलनेत १८.७ टक्के कमी रुग्ण संख्या आढळून आली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, गेल्या २४ तासांत २ हजार ५६८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर कोविडमुळे आणखी २० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण दिल्ली (१०७६), हरियाणा (४३९), केरळ (२५०), उत्तर प्रदेश (१९३) आणि कर्नाटकमध्ये (१११) आले आहेत. नवीन कोविड प्रकरणांपैकी ८०.५८ टक्के या पाच राज्यांमधून आले आहेत. फक्त दिल्लीचा वाटा ४१.९ टक्के आहे. गेल्या २४ तासात कोरोनामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात आतापर्यंत ५,२३,८८९ लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यासोबतच गेल्या चोवीस तासांत २९११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या भारतात कोरोना रिकव्हरी रेट ९८.७४ टक्के आहे. भारतातील सक्रिय रुग्णांमध्येही घट झाली आहे. आता हा आकडा १९ हजार १३७ झाला आहे.
लस ही कोरोनाविरुद्धच्या लढाईतील सर्वात मजबूत शस्त्र आहे. गेल्या २४ तासांत १६ लाख २३ हजार ७९५ लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत देशात १८९ कोटींहून अधिक कोरोना प्रितबंधात्मक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.