Friday, October 31, 2025
Happy Diwali

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर बुधवारी निकाल, तुरुंगातील मुक्काम वाढला

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर बुधवारी निकाल, तुरुंगातील मुक्काम वाढला

मुंबई (हिं.स.) : राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीनावर आता बुधवारी निर्णय होणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम दोन दिवसांनी वाढला आहे.

राणा दाम्पत्याविरोधात १२४ अ कलमानुसार, राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर राणा दाम्पत्याने जामीनासाठी अर्ज केला होता. आमदार राणा यांच्याविरोधात १७, तर खासदार राणा यांच्याविरोधात सहा गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांनी राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केला आहे.

शनिवारी राखून ठेवलेल्या निकालावर आज, सोमवारी निर्णय होणे अपेक्षित होते, मात्र, न्यायालयाची वेळ संपल्याने आणि युक्तीवादाचे वाचन पूर्ण होऊ न शकल्याने दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावरील सुनावणीची प्रकिया अपूर्ण राहिली. दरम्यान, उद्या ईदची सुट्टी असल्याने आता बुधवारी सुनावणी होणार आहे.

बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास निकाल जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत नवनीत राणांचे लोकसभाध्यक्षांना पत्र

दरम्यान, नवनीत राणा यांनी आपल्याला तातडीने उपचारास परवानगी मिळावी, असा भायखळा कारागृहाकडे अर्ज दाखल केला आहे. राणा यांना मणक्याच्या व्याधीचा त्रास असून कारागृहात जास्त वेळ जमिनीवर बसून आणि झोपून हा त्रास आणखी बळावला आहे. त्यांना २७ फेब्रुवारीला उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे राणा यांचा सिटीस्कॅन करण्यात यावा, असे सांगितले होते. याबद्दल कारागृहातील अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, आता वेदना असह्य झाल्याने नवनीत राणा यांची सिटीस्कॅन चाचणी करण्यात आली आहे. नवनीत राणा यांच्याबाबत अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला. याबाबत संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राणा यांनी वकिलांमार्फत केली आहे. याबाबतच्या पत्राची एक प्रत लोकसभा अध्यक्ष आणि राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पाठवण्यात आली आहे.

Comments
Add Comment