नवी दिल्ली (हिं.स.) : माजी पेट्रोलियम सचिव तरुण कपूर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने आज, सोमवारी यासंदर्भात जारी केलेल्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे.
कपूर हे भारतीय प्रशासकीय सेवेचे १९८७ च्या बॅचचे हिमाचल प्रदेश केडरचे अधिकारी आहेत. ते ३० नोव्हेंबर २०२१ रोजी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सचिव पदावरून निवृत्त झाले होते. आदेशानुसार, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने कपूर यांची पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. त्यांची नियुक्ती २ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
वरिष्ठ सनदी अधिकारी हरी रंजन राव आणि आतिश चंद्र यांची पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राव हे १९९४ च्या बॅचचे मध्य प्रदेश केडरचे आयएस अधिकारी आहेत. सध्या ते दूरसंचार विभागात युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड या प्रशासक पदावर आहेत. आतिश चंद्र हे बिहार केडरचे अधिकारी आहेत. ते भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त आहेत. १९९४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले चंद्रा हे कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिवही राहिले आहेत.