Tuesday, December 3, 2024
Homeक्रीडा‘कोरबो लोरबो जीतबो’ विरुद्ध राजस्थानचा ‘हल्लाबोल’?

‘कोरबो लोरबो जीतबो’ विरुद्ध राजस्थानचा ‘हल्लाबोल’?

मुंबई (प्रतिनिधी) : कोलकाता नाईट रायडर्स सोमवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तुलनेने तगड्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध “कोरबो लोरबो जीतबो” म्हणत विजयासाठी उत्सुक असेल, तर राजस्थान आपले स्थान अधिक पक्के करण्यासाठी “हल्लाबोल” करण्याच्या तयारीत असेल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकातासाठी हा हंगाम आतापर्यंत संमिश्र स्वरूपाचा राहीला आहे. कोलकाताने मोहिमेची चांगली सुरुवात केली होती; परंतु सध्या पॉइंट्स टेबलमध्ये ते सलग पाच पराभवानंतर आठव्या स्थानावर आहेत आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील.

आठव्या स्थानावरून प्ले-ऑफसाठी जागा बनवणे कोलकातासाठी कठीण आहे. तरीही, नाईट रायडर्सला आजच्या सामन्यात गत पाच सामन्यांतील पराभवांचा सिलसिला सोडवायचा आहे. मुंबई विरुद्धच्या सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला, “आमचे आणखी पाच सामने शिल्लक आहेत, आम्हाला चांगले खेळायचे आहे, भूतकाळ विसरून, नवीन सुरुवात करायची आहे.”

कर्णधार श्रेयसने २९० धावा करत फलंदाज म्हणून चांगली कामगिरी केली आहे. पण त्याला व्यंकटेशसह, वरुण चक्रवर्ती या त्याच्या अन्य सहकाऱ्यांकडून पुरेसा पाठिंबा मिळाला नाही; परंतु गोलंदाजीत टीम साऊथी, उमेश यादव आणि सुनील नरेन हे त्रिकूट प्रभावी ठरले आहे. सूपरफॉर्मात असलेल्या राजस्थानच्या जोस बटलरला (५६६ धावा) शांत ठेवण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. या इंग्लिश खेळाडूसोबतच कर्णधार संजू सॅमसनलाही अधिक सातत्य राखण्याची गरज आहे.

सोमवारच्या सामन्यात उमेश यादव विरुद्ध जोस बटलर आणि श्रेयस अय्यर विरुद्ध युझवेंद्र चहल यांची जुगलबंदी पाहायला क्रीडारसिक उत्सुक असतील. आंद्रे रसेल आणि सुनील नरेन हे कोलकाता नाईट रायडर्स कॅम्पचे प्रमुख खेळाडू असतील. राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये सर्वांच्या नजरा जोस बटलर आणि युझवेंद्र चहल यांच्यावर असतील. १९ विकेट्ससह, युझवेंद्र चहल या मोसमात गोलंदाजी चार्टमध्ये आघाडीवर आहे आणि यंदा केकेआर विरुद्धच्याच पहिल्या सामन्यात त्याने हॅटट्रिक घेतली होती. सोबत आर. अश्विन, ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यामुळे राजस्थानच्या गोलदांजीच्या आक्रमणात प्रतिस्पर्ध्याला चीत करण्याची क्षमता आहे. त्यामुळे संजू सॅमसनच्या सैन्याची मुंबई इंडियन्सविरुद्ध जरी हार झाली असली तरी जोस बटलर, युझवेंद्र चहलच्या जबरदस्त फॉर्ममुळे त्यांच्यासाठी विजय मिळवणे जड नाही.

पर्पल कॅप होल्डर आणि ऑरेंज कॅप होल्डर एकाच चमूत!

यंदाच्या हंगामात राजस्थानचा जोस बटलर नंबर एक फलंदाज, तर युझवेंद्र नंबर एक गोलंदाज म्हणून शीर्ष स्थानावर आहेत. जोस बटलरने ९ डावांत तीन शतकांच्या मदतीने ५६६ धावा केल्या आहेत. तो सुरुवातीपासूनच अव्वल स्थानावर राहिला आहे. त्याचबरोबर युजवेंद्र चहल हा ९ सामन्यांत १९ बळी घेऊन अव्वल गोलंदाज ठरला आहे. त्यामुळे पर्पल कॅप होल्डर आणि ऑरेंज कॅप होल्डर एकाच चमूत आहेत.

ठिकाण : वानखेडे स्टेडियम, मुंबई. वेळ : रात्री ७.३० वाजता

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -