Saturday, July 20, 2024
Homeमहत्वाची बातमीनवनीत राणांना स्पाँडिलायसिस, अनिल देशमुखांना खांदेदुखी तर मलिकांना मुत्राशयाचा विकार

नवनीत राणांना स्पाँडिलायसिस, अनिल देशमुखांना खांदेदुखी तर मलिकांना मुत्राशयाचा विकार

उपचारासाठी मागितली परवानगी

मुंबई : वेगवेगळ्या आरोपांखाली तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा यांना स्पाँडिलायसिस, माजी मंत्री अनिल देशमुख यांना खांदेदुखी तर मंत्री नवाब मलिक यांना मुत्राशयाच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. तिघांनीही यासंदर्भात केलेल्या अर्जामुळे ही माहिती समोर आली आहे. नवनीत राणा यांच्या वकिलांनी भायखळा जेलच्या अधीक्षकांना पत्र पाठवत तक्रार केली आहे. हीच तक्रार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही पाठवली आहे. तर अनिल देशमुख आणि नवाब मलिकांनी कोर्टात अर्ज केला आहे.

नवनीत राणा यांना स्पाँडिलायसिसची समस्या आहे. जेलमध्ये सतत फरशीवर बसल्याने आणि झोपण्यामुळे ही समस्या वाढत आहे. यामुळे नवनीत राणा यांना २७ एप्रिल रोजी जे. जे. रुग्णालयात घेऊन गेले. जे. जे. मधील डॉक्टरांनी सिटी स्कॅन करायला सांगितले होते. मात्र ते अजून केलेले नाही. त्यांना गंभीर दुखण्याने ग्रासले आहे. सीटी स्कॅन न केल्याने उपचार काय करायचे हे ठरवू शकत नाही. आम्ही संबंधित यंत्रणेला अर्ज दिला, मात्र त्यावर विचार केला गेला नाही. जर त्यांची प्रकृती बिघडली तर त्याला जबाबदार आपण असाल, असेही आम्ही सांगितले आहे, असे राणा यांच्या पत्रात म्हटले आहे. हीच तक्रार त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही पाठवली आहे.

जे. जे. रुग्णालयात उपचारासाठीच्या सुविधा अपुऱ्या आहेत. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी अनिल देशमुखांनी कोर्टाकडे परवानगी मागितली. जे. जे. हॉस्पिटलकडून यावर अहवाल आल्यावर निर्णय घेऊ, असे कोर्टाने म्हटले आहे.

तर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज कोर्टात आपल्या आजारांबद्दल स्वतः न्यायाधीशांना माहिती दिली. अनिल देशमुख यांना खांदेदुखी असून हृदयविकाराची समस्या असल्याचे त्यांनी कोर्टाला सांगितले. अनिल देशमुखांच्यावतीने घरचे जेवण मिळावे म्हणून कोर्टाकडे अर्ज दाखल करण्यात आला. खाजगी रूग्णालयात उपचार घेण्यासंदर्भात ईडीने उत्तर देण्यास वेळ मागितला आहे. मात्र घरच्या जेवणासाठी ईडीचा विरोध नाही. कोर्टाने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे ईडीने म्हटले. अनिल देशमुख यांच्या दोन्ही अर्जांवर ४ मे रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत निर्णय घेतला जाईल. अनिल देशमुखांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश जे. जे. रुग्णालयाला मुंबई सत्र न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या वैद्यकीय जामीन अर्जावर मुंबईतील विशेष न्यायालयात आज ईडीतर्फे २.३० वाजता उत्तर दाखल करण्यात येणार आहे. नवाब मलिक यांच्या मुत्राशयाच्या विकारावर तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी परवानगी मागितली आहे. मलिक यांनी वैद्यकीय आधारावर हा जामीन अर्ज दाखल केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -