
मुंबई : 'मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं होतं की अब्जाधीश फक्त आपणच आहात, मात्र आता कळलं की आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे. छान आहे, अशीच गुणी मंडळी कुटुंबात जोपासा,' असं ट्वीट भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले आहे.
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1521005143562817536
'राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव चांगलं गातात, असं मला नुकतंच आदित्यने सांगितलं. माझ्यासाठी हा धक्का होता. कारण मला वाटलं आजपर्यंत फक्त एकच व्यक्ती गाते,' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी अशाप्रकारचे ट्वीट करत थेट उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.
राज्यात महाविकास आघाडीने सत्ता काबीज केल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली. या राजकीय घडामोडींमुळे ठाकरे आणि फडणवीस कुटुंबातील संबंधही ताणले गेले आणि एकमेकांवर वैयक्तिक हल्लेही केले जाऊ लागले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या मागील काही काळापासून वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह शब्दांत टिप्पण्णी केल्यामुळे अमृता फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यामुळे अमृता फडणवीस यांच्यावर संबंधित ट्वीट डिलिट करण्याची नामुष्कीदेखील ओढावली होती. या सर्व वादानंतर आता पुन्हा एकदा अमृता यांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं आहे. या टीकेवर शिवसैनिकांकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.