Sunday, July 14, 2024
Homeमहत्वाची बातमीराज्यात उष्माघाताचे २५ बळी

राज्यात उष्माघाताचे २५ बळी

आठ वर्षांत यंदा सर्वाधिक बळी

मुंबई : गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढत आहे. त्याचाच परिणाम म्हणून यंदा मार्च-एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीत राज्यात सुमारे २५ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला असून ३७४ जणांना उष्माघाताची बाधा झाली. मृतांची ही संख्या गेल्या आठ वर्षांतील सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे सुमारे ४४ टक्के मृत्यू राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये झाले आहेत. दरम्यान पुढील काही काळ उष्णतेच्या लाटांचा असेल, त्यामुळे काळजी घ्यावी, अशी सूचना राज्याचे साथ सर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे.

यावर्षी एप्रिल महिन्यात तिसऱ्यांदा उष्णतेची लाट आली आहे. विदर्भात अकोला, ब्रह्मपुरी आदी भागांमध्ये ४५ अंश सेल्सिअसच्याही पुढे तापमानाचा नोंद झाली आहे. परिणामी विदर्भात उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा तीव्र असल्यामुळे उष्माघाताची बाधा झालेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.

एप्रिल महिन्यात राज्यभरात २५ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला असून यात सर्वाधिक ११ मृत्यू नागपूरमध्ये झाले आहेत. त्या खालोखाल जळगाव ४, अकोला ३, जालना २ आणि अमरावती, औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद आणि परभणी येथे प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उष्माघाताच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या दोन महिन्यांत ३७४ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यात सर्वाधिक २९५ रुग्ण नागपूर विभागातील, तर ३२ जण अकोला विभागातील आहेत. विदर्भ, मराठवाड्यापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातही उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहेत. येथील अनेक भागांत सरासरी ४२-४४ अंश सेल्सिअस तापमान आहे. नाशिक विभागात १४, औरंगाबादेत ११ तर लातूर विभागात एकाला उष्माघाताचा त्रास झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही कमाल तापमान ४१ ते ४३ अंश सेल्सियसपर्यंत आहे. पुणे विभागात २०, कोल्हापूर विभागात एका रुग्णाला उष्माघाताचा त्रास झाला आहे.

मागील आठ वर्षांतील आकडेवारी

२०१५ पासून यावर्षी प्रथमच उष्माघाताच्या बळींची संख्या वाढली आहे.

गेल्या सात वर्षांतील स्थिती पाहता २०१५ – २, २०१६ – १९, २०१७ – १३, २०१८ – २, २०१९ – ९, २०२० आणि २०२१ मध्ये शून्य मृत्यूची नोंद झाली होती.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना काळजी घेण्याचे आवाहन

देशात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांना तोंड देण्यासाठी आरोग्य केंद्रामध्ये अत्यावश्यक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या पत्रानुसार, एकात्मिक रोग निरीक्षण कार्यक्रमचा हा दैनंदिन देखरेख अहवाल राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र सोबत शेअर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या, भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे राज्यांसह सामायिक केल्या जाणार्या दैनंदिन उष्णतेच्या सूचनांवरून पुढील ३-४ दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यांचे आरोग्य विभाग, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि तळागाळातील कामगारांना उष्णतेबद्दल संवेदनशील बनवावे लागणार आहे, तसेच त्यांची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरू ठेवावे लागतील. उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांना तोंड देण्यासाठी आरोग्य विभागाला उष्णतेचे आजार, त्याचे लवकर निदान आणि व्यवस्थापन याबाबतची तयारी अधिक तीव्र करावी लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -