नवीन पनवेल (वार्ताहर) : मार्च-एप्रिल महिन्यापासून नवीन पनवेल परिसरात विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणावर पाहावयास मिळत आहे. कित्येक तास वीज गायब होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यानिमित्ताने महावितरणचा भोंगळ कारभार समोर आला आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
उन्हाळ्यास सुरुवात झालेली असून तापमानात वाढ झाल्याने अंगाची काहिली होत आहे. त्यातच दर दिवशी नवीन पनवेल परिसरातील वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. रात्रीच्या वेळेस देखील वीज पुरवठा खंडित होत असल्याने मच्छरांचा उपद्रव जाणवू लागला आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ व रात्री या चारही वेळेला कधीही वीज गायब होत असल्याने नक्की वीज कोणत्या वेळेला असते असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. वारंवार वीज गायब होत असली तरी देखील वीज बिल कमी होण्याचे नाव घेत नाही. नवीन पनवेलमध्ये महावितरणचे लाखो वीज ग्राहक आहेत.
मात्र दररोज त्यांना विजेचा लपंडाव सहन करावा लागत आहे. सततच्या विजेच्या जाण्यामुळे विद्युत उपकरणे खराब होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. दिवसा वीज जातेच शिवाय रात्री देखील वीज गायब होत असल्याने व्यवस्थित झोप देखील मिळत नसल्याची व्यथा नागरिक मांडत आहेत. विजेची समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.