मुंबई (प्रतिनिधी) : कर्णधार लोकेश राहुल, दिपक हुडा यांची वैयक्तिक अर्धशतके आणि मोहसीन खानने केलेल्या कमालीच्या गोलंदाजीने रविवारी लखनऊला दिल्लीविरुद्ध विजय मिळवून दिला. लखनऊच्या अन्य गोलंदाजांसमोर धावा काढण्यात प्रतिस्पर्ध्यांना यश आले, मात्र मोहसीनसमोर दिल्लीच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. मोहसीनने ४ षटकांत अवघ्या १६ धावा देत ४ बळी मिळवले. या विजयासह लखनऊने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
लखनऊच्या १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या दिल्लीची सुरुवात खराब झाली. अनुभवी डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ दोघेही स्वस्तात परतले. अवघ्या १३ धावांवर दोन्ही सलामीवीर माघारी परतले होते. त्यानंतर मिचेल मार्श आणि कर्णधार रीषभ पंत या जोडीने या जोडीने दिल्लीच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या.
पंतने ४४ धावा केल्या, तर मार्शने ३७ धावांचे योगदान दिले. त्यानंतर रोवमन पॉवेल आणि अक्षर पटेल यांनी धडाकेबाज कामगिरी करत दिल्लीला विजयाजवळ आणले होते. पण मोहसीन खानच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे दिल्लीचा विजय दूरच राहीला. लखनऊने हा सामना ६ धावांनी जिंकला.