Thursday, July 10, 2025

चेन्नईचा हैदराबादवर धक्कादायक विजय

चेन्नईचा हैदराबादवर धक्कादायक विजय

पुणे (वृत्तसंस्था) : चेन्नईला रविवारी नेतृत्वबदल चांगलाच फळल्याचे दिसते. रुतुराज गायकवाड आणि देवॉन कॉनवे यांची धडाकेबाज फलंदाजी आणि त्याला मिळालेली रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीची साथ या जोरावर चेन्नईने हैदराबादवर धक्कादायक विजय मिळवला.


प्रत्युत्तरार्थ चेन्नईच्या २०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या हैदराबादलाही चांगली सुरुवात मिळाली. अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन यांनी दमदार फलंदाजी करत हैदराबादला चांगली सुरुवात करून दिली. अभिषेकने २४ चेंडूंत ३९ धावा केल्या, तर विल्यमसनने ४७ धावा केल्या. त्यानंतर हैदराबादची मधली फळी ढासळली.


निकोलस पुरनने धडाकेबाज फलंदाजी करत सामन्याची रंगत वाढवली. पुरनने ३३ चेंडूंत नाबाद ६४ धावा केल्या. मात्र त्याला दुसऱ्या फलंदाजाकडून हवी तशी साथ मिळाली नाही. अखेर हैदराबादला २० षटकांत १८९ धावांपर्यंतच मजल मारता आली.


तत्पूर्वी प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नईच्या रुतुराज गायकवाड आणि देवॉन कॉनवे या जोडीने अप्रतिम फलंदाजी करत हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. या सलामीवीरांनी १८२ धावांची विक्रमी खेळी खेळत चेन्नईला मोठी धावसंख्या उभारून दिली. रुतुराजने ९९ धावा केल्या, तर कॉनवेने नाबाद ८५ धावांचे योगदान दिले. त्यामुळे चेन्नईने २० षटकांत २०२ धावा केल्या.

Comments
Add Comment