चंद्रपूर : चंद्रपूरच्या शहरालगत असलेल्या दुर्गापूरमध्ये बिबट्याने घराच्या अंगणात जाऊन काम करीत असलेल्या महिलेच्या नरडीचा घोट घेतल्याची घटना रविवारी रात्री घडली.
दुर्गापूरच्या वॉर्ड क्र. ३ मधील दिल्ली मोहल्ला येथे महिला रात्री बाराच्या सुमारास घराच्या अंगणात काम करीत असताना अचानक बिबट्याने प्रवेश केला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. त्या महिलेचे नाव गीता विठ्ठल मेश्राम (४७) असे आहे. सदर भागात बिबट्याचे सातत्याने हल्ले होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या अगोदर त्याच परिसरात एक बिबट्या वनविभागाने जेरबंद केला आहे. आता दुसरा हल्लेखोर बिबट दिसत आहे. वनविभागाचे अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले.
दरम्यान दुर्गापूरमध्ये या परिसराला लागून वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडची कोळसा खाण आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बाह्य क्षेत्रातून वन्यजीवांचा या परिसरात प्रवेश होत असल्याचे तेथील स्थानिक नागरिक सांगतात. परिसरात राहत असलेल्या लोकांनी वाघ-बिबट्याची तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.