
भंडारा : भंडारा जिल्ह्यात वाळू तस्करीत राजकीय लोकांचे साटेलोटे पुन्हा एकदा समोर आले आहे. वाळू तस्करीवर आळा घालण्यासाठी गेलेल्या भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत यांच्यावर वाळू तस्करांनी प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर फरार झालेला प्रहार संघटनेचा पवनी तालुकाध्यक्ष अक्षय तलमले याला अटक करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
भंडारा उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोडहे मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्यासह 27 एप्रिलच्या पहाटे पवनी तालुक्यात सुरू असलेल्या वाळू वाहतुकीच्या कारवाईसाठी गेले होते. दरम्यान, तीन टिप्पर अडविल्यानंतर अचानक 20 ते 25 तस्करांनी लाठ्याकाठ्या आणि हातात फावडे घेऊन घटनास्थळ गाठत राठोड यांना मारहाण केली. त्यांच्या बचावासाठी आलेले पवनीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत यांनाही मारहाण झाली. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी धर्मेंद्र नखाते, राजेश मेघरे, राहुल काटेखाये, प्रशांत मोहरकर या चौघांना अटक केली आहे. तर काल अक्षय तलमले याला अटक केली आहे अक्षय हा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा पवनी तालुकाध्यक्ष आहे, हे विशेष. त्यामुळे आता या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या पाच वर पोहोचली आहे. वाळू तस्करीत राजकिय व्यक्तिची उपस्थिती खुप काही बोलून जात आहे.