Friday, May 9, 2025

महामुंबई

मुंबईतील अमराठींना मराठींकडून चांगली वागणूक

मुंबईतील अमराठींना मराठींकडून चांगली वागणूक

मुंबई (प्रतिनिधी) : मराठी लोक मुंबईतल्या अमराठींना चांगली वागणूक देत असल्याचे समोर आले आहे. सी-व्होटर्सच्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. ६० टक्क्यांहून अधिक अमराठी लोक म्हणतात की त्यांना स्थानिक मराठी लोक चांगली वागवून देतात. एवढेच नाही तर ६० टक्क्यांपेक्षा अधिक मराठी लोकांना बाहेरचे लोक आपल्यासाठी धोका आहेत असे वाटत नाही. सी-व्होटर्सच्या सर्वेक्षणातून हे समोर आले आहे.


एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, यासाठी मुंबईतील सुमारे १,३०० रहिवाशांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रात जन्मलेल्या आणि इतर राज्यात जन्मलेल्यांना समान प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये लोकांचे सर्वात आवडते नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत.


मुंबईतील ३५.२ टक्के अमराठी लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्या पसंतीसाठी निवडले आहे. तर ३२.३ टक्के मराठी लोकांनी त्यांना पसंती दिली आहे. या सर्वेक्षणानुसार दुसरे सर्वात प्रशंसनीय नेते बाळासाहेब ठाकरे आहेत, ज्यांना १५.३ टक्के अमराठी आणि १७.१ टक्के मराठी लोकांनी निवडले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईकरांना प्रेरणा देतात असे वाटत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, नुकत्याच दिवंगत झालेल्या लता मंगेशकर यांना ३.५ टक्के मतेही मिळाली नाहीत. जवळपास ११ टक्के अमराठी लोकांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना पसंती दिली आहे, तर फक्त ४ टक्के मराठी भाषिकांनी त्यांना पसंती दिली आहे, असे सर्वेक्षणात दिसून आले आहे.


मराठी आणि अमराठी दोघांनीही ‘पावभाजी’ हा त्यांचा आवडता पदार्थ म्हणून निवडला आहे. दोघांनीही मुंबईच्या सुरक्षेबाबत समाधान व्यक्त केले आहे. तर मुंबईत सार्वजनिक वाहतूक ही गंभीर समस्या असल्याचे दोघांनी मान्य केले आहे.


बॉलिवूडमधील सर्वाधिक पसंतीच्या लोकांचा विचार केला तर २५ टक्के लोक अमिताभ बच्चन आणि २४ टक्के लोक अक्षय कुमारला पसंती देतात. आमिर, शाहरुख आणि सलमान खान या दिग्गजांपैकी कोणीही १० टक्क्यांच्या वर पोहोचलेले नाही, असे सी-व्होटर्सच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Comments
Add Comment