श्रीनिवास बेलसरे
भगवद्गीतेत सांगितलेली आत्म्याच्या अमरत्वाची आणि पूर्वजन्म/पूनर्जन्माची संकल्पना भारतीय मानसिकतेत खोल रुजलेली आहे. तिचे प्रतिबिंब भारतीय भाषांतील कितीतरी सिनेमात वारंवार दिसते. रंजकतेसाठी दिग्दर्शक बहुतेक वेळा याला एका जन्मात अर्धवट राहिलेल्या प्रेमकथेची जोड देतात.
एकूण ९ फिल्मफेअर पारितोषिकांसाठी नामांकने मिळालेला आणि त्यापैकी सर्वोत्कृष्ट संगीत (लक्ष्मीकांत-प्यारेलाल), सर्वोत्कृष्ट नायिका (नूतन) आणि सर्वोत्कृष्ट सहनायिका (तेलुगू अभिनेत्री जमुना) अशी ३ पारितोषिके जिंकलेला ‘मिलन’(१९६७) ही अशीच एक हृदयस्पर्शी प्रेमकथा! हा तसा ‘मोगा मानसुलू’(१९६३) या अदुर्थी सुब्बाराव यांनी दिग्दर्शित केलेल्या तेलुगू सिनेमाचा रिमेक! सुनील दत्त आणि नूतन यांच्या लोभस अभिनयाने सिनेमा लोकप्रिय झाला. सर्वच गाणी तुफान चालली. शीर्षकगीत ‘हम तुम युग युगसे ये गीत मिलन के’ तर ‘बिनाका गीतमाला’मध्ये प्रचंड गाजले.
सिनेमातील एक गाणे मोठे आगळे होते. आनंद बक्षीजींनी एका वेगळ्याच विषयावर ही भावमधुर रचना केली होती. जीवनात अनेकदा माणसाची जशी अगदी साधी इच्छाही पूर्ण होत नाही, तसे कधी आयुष्यभर पाहिलेले स्वप्नही कायमचे भंग पावते! अशा वेळी त्याची मन:स्थिती किती विस्कटून जाते त्याचे हृदयद्रावक वर्णन म्हणजे हे गाणे! लतादीदीने लक्ष्मी-प्यारेंच्या दिग्दर्शनात चारूकेशी रागात गायलेल्या या गाण्याचे बोल हृदयाचा ठाव घेतात…
‘आज दिलपे कोई जोर चलता नहीं,
मुस्कुराने लगे थे, मगर रो पड़े…!
स्वप्नभंगामुळे सर्वकाही उद्ध्वस्त झाल्याची भावना मनाला घेरून आलेली असताना मी तर आपले दु:ख अंत:करणाच्या गुहेत खोल पुरून टाकले होते. खूप प्रयत्न करून मनाचा कसाबसा तोल सावरला होता. आता जगासमोर चेहरा हसरा ठेवण्याचा निर्धार केला होता. पण शेवटी अश्रूंनी दगा दिलाच अन् रडू कोसळले!
रोजहीकी तरह आज भी दर्द था
हम छुपाने लगे थे मगर रो पड़े…!
पूर्णत: निराश झालेली प्रेमिका म्हणते, आता हे दु:ख कुणाला सांगावे? ज्याच्यासाठी मनाची ही अवस्था झाली त्याला तर याची गंधवार्ताही नाही. मला स्वत:ला तरी कुठे याचा अंदाज होता? आता माझ्या दुखावलेल्या विव्हळ मनाची इतकीच इच्छा आहे की, त्याला निदान इतके कळावे की, मीही एक माणूसच आहे, मलाही मन आहे!
तशी एकेका भाषेची एक ताकद असते. ‘हम भी रखते हैं दिल, हम भी इन्सान हैं’ हा आशय जेव्हा हिंदीत, तोही दीदीच्या निराश आवाजात येतो, समोर नूतनचा नितांत नितळ पण उदास चेहरा असतो, तेव्हा मन गलबलून जातेच.
‘और अब क्या कहें, क्या हुआ हैं हमें,
तुम तो हो बेखबर, हम भी अन्जान हैं!
बस यही जान लो तो बहुत हो गया,
हम भी रखते हैं दिल, हम भी इन्सान हैं!’
मी तर पाझरणाऱ्या नेत्रांसाठी पुन्हा काहीतरी सबब शोधून चेहऱ्यावर स्मितहास्याचा लेप लावत होते, पण त्या क्षणीच मनाचा बांध फुटला आणि रडू कोसळले –
‘मुस्कुराते हुए हम बहाना कोई,
फिर बनाने लगे थे, मगर रो पड़े…!’
अशा वेळी अगतिक झालेला माणूस समोर आलेल्या शोकांतिकेसाठी स्वत:च काहीतरी तर्क शोधून काढतो आणि बिचारा आपल्या मनाला समजावू लागतो. आकाशात अनेक तारका आहेत. पण म्हणून काय प्रत्येकाच्या नशिबात एक तारा थोडाच येणार आहे? दूरदेशी निघालेल्या प्रत्येक नावेला किनारा मिळेलच, असे कसे सांगता येईल? समुद्रात तर जहाजेच्या जहाजे गिळून टाकणारे भवरेसुद्धा असतातच ना? मग माझेच दु:ख असह्य कसे? अशी स्वत:ची मी समजूत काढत होते. नशिबात आलेला अंतिम विरह स्वीकारून मी शांतपणे पुढे निघाले! आता माझे अस्तित्व संपून मी बुडणार, असा दिलासा वाटू लागला होता आणि तेवढ्यात सगळे अवसान गळून पडले आणि मला रडू कोसळले!
हैं सितारे कहाँ इतने आकाशपर
हर किसीको अगर इक सितारा मिले
कश्तियोंके लिये ये भंवर भी तो हैं
क्या जरूरी है सबको किनारा मिले
बस यही सोचके हम बढ़े चैनसे
डूब जाने लगे थे मगर रो पड़े…
उरलेले आयुष्य जरी फक्त अश्रू ढाळण्यात गेले असते तरी मला चालले असते, कारण या जगात स्मितहास्याची काहीच किंमत नसते. माझ्या मनाची कदर तर फक्त माझ्या अश्रुंनीच केली.कधी आकाशात खूप ढग येतात. अंधारून येते. आता अगदी कोसळेल असे वाटते आणि अचानक वारा सुटतो व सगळे ढग निघून जातात. तशीच मी जीवनाच्या पसाऱ्याकडे पाठ करून मनात दाटलेले दु:ख पदरात नीट संभाळत, एकही अश्रू न सांडू देता परत निघाले होते. पण मनाचा बांध फुटला आणि मी ढसढसा रडले!
उम्रभर काश हम यूं ही रोते रहे,
आज क्यूं के हमें ये हुई हैं खबर,
मुस्कुराहटकी तो कोई कीमत नहीं,
आँसुओंसे हुई हैं हमारी कदर…
बादलोंकी तरह हम तो बरसे बिना
लौट जाने लगे थे, मगर रो पड़े…!
बाप रे! हे जुने कवी कसले जादुगार लोक होते! दुसऱ्याच लेखकाने कल्पनेने रंगवलेल्या एखाद्या पात्राच्या काल्पनिक दु:खात शिरून त्याचे स्पंदन न् स्पंदन जाणवून घेऊन ते नेमक्या शब्दात मांडून आपल्या मनाचा ताबा घेत असत. आपल्याला क्षणात हसायला, तर क्षणात रडायला लावत. धन्य त्यांची सृजनशीलता आणि धन्य त्यांची लेखणी!