Sunday, January 19, 2025
Homeसाप्ताहिककोलाजपोलीस रक्षक की भक्षक?

पोलीस रक्षक की भक्षक?

अॅड. रिया करंजकर

माणसाला आयुष्य जगताना अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागतं आणि त्यातूनच तो आपला आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करत असतो. माणसाच्या आयुष्यात येणारे हे चढ-उतार माणसाला कधी कधी चांगल्या गोष्टी शिकवतात, तर कधी कधी वाईट अनुभव देऊन जातात. जे अनुभव मिळतात, ते माणूस कधीही विसरू शकत नाही. त्या अनुभवातून तो बोध घेतो आणि आपला पुढील आयुष्याचा प्रवास निश्चित करतो.

कमला, एक विधवा स्त्री. पतीच्या पेन्शनवर आपले गुजराण करणारी, साधे सरळ व्यक्तिमत्त्व असलेली कमला. पतीच्या निधनानंतर दोन मुलं आणि ती असा तिचा संसार सुरू होता. आयुष्यात अनेक चढ-उतार तिने बघितले होते आणि त्यामुळे ती कणखर झालेली होती. पण आयुष्यामध्ये काही असे प्रसंग येतात की, त्यावेळी आपल्या घरातीलच काय, तर नातेवाइकांची मदत आपल्याला मिळत नाही किंवा मदत कोणी करत नाही. त्यावेळी आपल्याला उपयोगी येतात ते आपण बनवलेले आपले दागिने किंवा स्त्रीधन. कमलाचे तसेच झाले. तिच्यावर एक असा प्रसंग आला की, त्यावेळी तिने आपले पाच तोळ्यांचे मंगळसूत्र जे तिने पतीच्या निधनानंतर अडीअडचणीला मुलांसाठी उपयोग होईल म्हणून ठेवलेले होते, ते गहाण ठेवले. तिला अशा प्रसंगातून जावे लागत होते की, कोणाचीही तिला पैशांची मदत होत नव्हती. त्यावेळी दुसऱ्यांकडे हात पसरण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या दागिन्यांचा उपयोग आपण करावा, असं तिच्या मनात आलं आणि तिने ते पाच तोळ्यांचे मंगळसूत्र सोनाराकडे गहाण ठेवलं व आपल्या गरजेसाठी तिने पैसे सोनाराकडून उचलले. तिच्यावर आलेला प्रसंग त्या मंगळसूत्राच्या गहाण ठेऊन मिळालेल्या पैशातून निभावून निघाला. तिच्याकडे दागिना होता म्हणून तिची वेळ निभावून गेली. कोणाकडे हात पसरण्याची वेळ तिच्यावर आली नाही.

काही काळानंतर सोनाराकडे ती आपला दागिना सोडवण्यासाठी गेली. तिने दागिने सोडवण्यासाठी पैसे भरले आणि सोनार यांनी उद्या येऊन दागिना घेऊन जा, असंही तिला सांगितलं. म्हणतात ना माणसाचं नशीब त्याला कधी केव्हा कुठे धोका देईल हे सांगता येत नाही. हीच गोष्ट कमलाच्या बाबतीत झाली. त्याच वेळी नेमके पोलिसांनी त्या सोनाराला दोन नंबर धंदा करतो व दोन नंबरचा माल ठेवतो-घेतो, अशा विविध गोष्टींसाठी आपल्या ताब्यात घेतले आणि काही कारणास्तव सोनाराच्या दुकानातील सर्व माल पोलिसांच्या ताब्यात गेला. पोलिसांची इन्क्वायरी सुरू झाली. त्यावेळी सोनाराने आपल्याकडील असलेल्या डायरी हिशोब सगळे पोलिसांच्या ताब्यात दिले आणि ज्या ज्या लोकांनी आपले दागिने सोनाराकडे गहाण ठेवले होते, तेही आता पोलिसांच्या ताब्यात होते. त्यामुळे सर्वांनी कोर्ट गाठले.

कोर्टाकडून लोकांना ऑर्डरही मिळाल्या की, त्यांची प्रॉपर्टी परत करावी. ‘रिटर्न प्रॉपर्टी’ अशी ऑर्डरही कोर्टाने दिली. पण आजपर्यंत कमलाचे दागिने तिला परत मिळाले नाहीत. कारण, पोलिसांच्या ताब्यात असताना सोनाराच्या दागिन्यांची पेटी पोलिसांनी हडप केलेली होती. त्यात एक-दोन नाही, तर चार पोलीस गुंतलेले होते. त्याच्यामुळे ज्या-ज्या लोकांनी सोनाराकडे आपले दागिने गहाण ठेवले होते, त्यांचे दागिने कोर्टाने ऑर्डर देऊनही परत मिळालेले नाहीत. कारण, ते पोलिसांच्या ताब्यात होते आणि आता पोलिसांकडे ती दागिन्यांची पेटी नाही. त्याच्यामुळे जे लोक रिटर्न प्रॉपर्टीसाठी पोलीस स्टेशनला जातात, त्यांना विविध कारणं सांगून पोलीस स्टेशनमधून हाकलून दिले जात आहे. काही पोलीस तर लोकांना सांगतात की, तुम्ही असे करू नका. तुम्ही असं जर केलेत, तर आमची नोकरी जाईल, अशी विनवणी ते लोकांकडे करत आहेत. पण या ठिकाणी कोर्टाची ऑर्डर असूनही पोलिसांच्या लेखी त्याची काहीच किंमत नाही. या लोकांनी विश्वासाने सोनाराकडे आपले दागिने गहाण ठेवले होते. कमलासारख्या लोकांनी तर ठेवलेला दागिना परत मिळावा म्हणून पैसे दिले होते आणि दुसऱ्या दिवशी आपला दागिना मिळेल याची वाट बघत असताना ही सर्व अघटित घटना घडली. दागिनाही गेला व पैसेही गेले, अशी परिस्थिती आज कमलाची झालेली आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये दडलेल्या अशा चोऱ्यांमुळे सामान्य माणसाला फरफट करण्याची वेळ आज आली आहे.

(कथा सत्यघटनेवर आधारित असून नावे बदललेली आहेत)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -