मुंबई (प्रतिनिधी) : प्रदीप सांगवानची दमदार गोलंदाजी आणि फलंदाजांची सांघिक कामगिरी शनिवारी गुजरातच्या विजयासाठी उपयुक्त ठरली. या विजयासह गुजरातने विजयाचा गोल्डन टच सुरूच ठेवत ९ पैकी ८ सामने जिंकून १६ गुणांसह आपले अव्वल स्थान अधिक घट्ट केले आहे.
बंगळूरुच्या १७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या गुजरातची सुरुवात चांगली झाली. त्यांच्या सलामीवीरांनी नाबाद अर्धशतक झळकावत विजयाचे संकेत दिले. वृद्धीमान साहाने २९ धावा केल्या तर शुबमन गीलने ३१ धावांचे योगदान दिले. गुजरातची मधली फळी चांगलीच बहरली. डेवीड मीलर आणि राहुल तेवतिया या जोडीने नाबाद धडाकेबाज फलंदाजी करत गुजरातची विजयी घोडदौड कायम ठेवली.
गुजरातने हा सामना ६ विकेटने जिंकला. तत्पूर्वी बंगळूरुच्या विराट कोहली, रजत पाटीदार यांनी दमदार अर्धशतके झळकावत बंगळूरुला २० षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात १७० धावा गाठून दिल्या. गुजरातच्या प्रदीप सांगवानने अप्रतिम गोलंदाजी करत ४ षटकांत अवघ्या १९ धावा देत २ बळी मिळवले.