Monday, July 15, 2024
Homeसाप्ताहिककोलाजकुंकू घ्या कुणी काळं मणी...

कुंकू घ्या कुणी काळं मणी…

‘दाताचं दातवण घ्या गं कुणी कुंकू घ्या कुणी काळं मणी...

प्रियानी पाटील

लावण्य, सौंदर्याचा आविष्कार आजवर अनेक लावण्यवतींच्या नजाऱ्याने पेश झाला. मात्र या नजाकतीला पेश करणारी गाणीही तितकीच मोलाची मानावी लागतील. सौंदर्यात जसे कुंकू महत्त्वाचे तितकाच महत्त्वाचा कंगवा, आरसा. निसर्गाने स्त्रीला बहाल केलेले सौंदर्य टिकवताना आज अनेक कृत्रिम टिप्स वापरल्या जातात. उन्हामध्ये चेहरा काळवंडतो तेव्हा ‘अरे देवा आता काय करावं’ असं वाटून जातं. आता सौंदर्यांचे अनेक किट्स निर्माण झालेत पण पूर्वी काय होतं? आज अनेक साहित्याची निर्मिती झाली आहे. पण पूर्वी जे काही साधक-बाधक होते तेच सौंदर्यालंकार म्हणून प्रचलित होते.

कुणीतरी दुरून ललकारी द्यायचे कुंकू घ्या, बांगड्या घ्या, पिना घ्या… पण खरं सांगायचं तर अनेक गाण्यांतून स्त्रीच्या सौंदर्यालंकाराचा होणारा उल्लेख पाहून आज असं वाटतंय, कुठे गेला तो सूर जो काही वर्षांपूर्वी भर दुपारच्या वेळी कानी पडायचा. कासारणींच्या पिशव्या भरून लगडलेल्या बांगड्यांची किणकिण, लहान मुलांचे वाळे, फणी, काजळ असं बरच काही तिने डोईवर घेतलेल्या पेटाऱ्यातून उलगडायचं.

डोईवर असणाऱ्या पेटाऱ्यात खास स्त्री सौभाग्याचे अलंकार भरलेले असायचे. सासुरवाशिणींच्या हक्काचं माणूस तेव्हा आल्यासारखं वाटायचं प्रत्येकीला.

ती भर दुपारी उन्हातान्हातून फिरायची, डोईवरच्या साहित्याने तिला उन्हाच्या झळा लागत असतील, नसतील कोण जाणे, पण दारी आल्यावर घटघटा पाण्याच्या पूर्ण तांब्यातील पाणी पिऊन ती समाधान पावलेली असायची. ती अख्खा गाव फिरायची डोक्यावर पेटी, टोपली घेऊन. ती आली की प्रत्येक घराघरांत सासुरवाशिणींच्या ओठी नकळत हास्य खुलायचं. राखून ठेवलेले, माहेरून दिलेले किंवा पतीने दिलेले पैसे घेऊन गृहिणी आपल्या हाती नवा चुडा भरण्यासाठी आतूर झालेली असायची आणि मनात जरी नवा चुडा भरलेला नसला, तरी कासारणीच्या आग्रहाखातर तर नवीन चुडा मग हाती भरला जायचा.

हिरवा चुडा, तासाच्या बांगड्या, प्लेन हिरव्या बांगड्या, विविध रंगांच्या बांगड्या कुमारिकांच्या आवडीच्या असायच्या. गंध, टिकल्या, हेअर बँड, पिना, सुया, दोरा, दाभणापासूनच्या साऱ्या वस्तू असायच्या तिच्याकडे.

टिकल्यांआधी कुंकवाचा जमाना खूप काही सांगून जाणारा. स्त्रियांच्या सोशिकतेचा सूर त्यात नकळत जाणवायचा. लाल पिंजर लावताना मेणाची डबी घ्यायलाही या सासुरवाशिणी विसरायच्या नाहीत. हे मेण कुंकू लावण्याआधी कपाळावर लावलं की कुंकू व्यवस्थित कपाळावर कोरलं जायचं. आणि अगदी टिकलीसारखंच मेणाला चिकटून राहायचं. अंबाड्याला लावायला जाळी ती देखील असायची. अंबाडा फिट्ट बसायचा आणि फुलं माळायला काटे ते देखील या कासारणीकडे मिळायचे. सौंदर्याचं सारं कीट या ठिकाणी मिळायचं. पार्लर आता झाले, पण ती एक उन्हातान्हातून फिरणारी सौंदर्यालंकाराच्या साऱ्या वस्तू घेऊन उन्हातान्हातून फिरणारी कासारीण साऱ्या गृहिणी, सासुरवाशिणींच्या जिव्हाळ्याची आपली व्यक्ती असायची. ती येऊन महिना होऊन गेला की पुन्हा तिची वाट पाहणं सुरू व्हायचं. तिला कधी यायला उशीर झाला, दोन- तीन महिने ती आली नाही, तर या साऱ्याजणी निरोप देऊन तिला बोलावून घ्यायच्या.

विवाह कार्यात तिला अावर्जून आमंत्रण दिले जायचे. अगदी घरी राहण्याचा आग्रहही केला जायचा. प्रत्येक घराशी तिचं जिव्हाळ्याचं नातं होतं. प्रत्येकीची डिमांड वेगळी असायची. सासूची आवड वेगळी, सुनेची वेगळी. कधी कधी सासु-सुनांचं हितगूजही व्हायचं. कधी कधी मनातल्या गोष्टी मांडण्याचा एक हक्काचा कप्पाही तिच्याकडे असायचा, जे तिला सांगितलं की मन हलकं होऊन जायचं. काय म्हणते सून, बरी वागते का सासू? नणंद अजून सासरी जायचं नाव घेतच नाही का? असे घरगुती विषयही तिचे होऊन गेलेले असायचे. अख्ख्या गावाची ती आणि अख्खं गाव तिचं असं होऊन जायचं.

गावागावात तिचं रूप निराळं. प्रत्येक गावात एक तरी कासारीण असायची जी प्रत्येकीची आपली म्हणून असायची. तिच्याकडच्या वस्तू, अलंकारांनी सासुरवाशिणींच्या सौंदर्याची शोभा वाढायची. तिची साद प्रत्येकीला हवहवीशी वाटायची. आज ही साद काहीशी कालाच्या ओघात विस्मरणात गेली आहे. आज ऑनलाइनमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. सौंदर्य अधिक खुलू लागलं आहे. नॅचरलपणाचा अभाव यामुळे दिसत असला तरी आज कृत्रिम सौंदर्य वाढविण्याकडे कल दिसून येत आहे. काळाच्या ओघात उन्हातान्हातून फिरणारी अनेक वर्षं अनेकांच्या मनात वसलेली ती आता बरीच भूतकाळात गेली आहे.

priyanip4@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -