औरंगाबाद (प्रतिनिधी) : ‘रस्त्यावर येऊन तुम्ही नमाज पडता, कोणी अधिकार दिले तुम्हाला’, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. ते म्हणाले, ‘माझी शासनाला विनंती आहे, आज तारीख एक आहे. उद्या तारीख दोन आहे. तीन तारखेला ईद आहे. त्यांच्या सणात मला मध्ये यायचे नाही. मात्र ४ तारखेपूर्वी लाऊडस्पीकर उतरवा…त्यानंतर ऐकणार नाही’, असा इशारा राज ठाकरे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. तसेच ४ तारखेनंतर जिथे जिथे लाऊडस्पीकरवरून ‘अजान’ होणार असेल, तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा पठण करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत.
‘त्या दिवशी एका पत्रकाराने मला विचारले, एकदम लाऊडस्पीकरचा मुद्दा. मी म्हटले अचानक. आम्ही हा विषय काढायचा नाही का? लाऊडस्पीकर हा विषय नवीन नाही. मी मांडतोय असेही नाही. याआधी अनेकांनी तो मांडला आहे. मी फक्त त्याला पर्याय दिला’, असे मशिदींच्या भोंग्यांवरून राज ठाकरे म्हणाले आहेत. औरंगाबादेत मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात पार पडलेल्या सभेत बोलताना ते म्हणाले की, मशिदींवर लाऊडस्पीकर लावून तुम्ही गोंगाट करणार असाल, तर त्या मशिदींच्या बाहेर आम्ही हनुमान चालिसा पठण करू, मोठ्याने वाचू’, असे ते पुन्हा एकदा म्हणाले आहेत.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, ‘मला कुठेही महाराष्ट्रात दंगली घडवायच्या नाहीत. तशी माझी इच्छा देखील नाही. मुस्लीम समाजाने ही गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे’. ते म्हणाले, ‘त्या दिवशी माझ्याकडे नाशिकला असताना एक पत्रकार आले, ते मुस्लीम समाजातले होते. ते माझ्या केबिनमध्ये आले, म्हणाले साहेब मी मुसलमान आहे. मात्र आम्हाला भोंग्यांचा खूप त्रास होतो. माझा लहान मुलगा लाऊडस्पीकर लागला की झोपत नाही. तो आजारी पडायला लागला आहे आणि दरवेळी तो झोपायला आला की, इकडे अजान सुरू होते. त्यामुळे माझे मूल झोपू शकत नव्हते. मी त्या मशिदीत जाऊन मौलवींना भेटलो आणि म्हणालो, तुमच्या भोंग्यांमुळे माझ्या मुलाला झोप येत नाही, त्यानंतर त्यांनी आवाज कमी केला’.
ते म्हणाले, लाऊडस्पीकर हा सामाजिक विषय आहे, जर तुम्ही या विषयाला धार्मिक वळण देणार असाल तर त्याचं उत्तर धर्मानेच देऊ. इच्छा नसताना आम्हाला टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. शांतता आम्हाला भंग करायची नाही. तशी आमची इच्छा देखील नाही, असे ते म्हणाले.
पवारांनी बाबासाहेब पुरंदरे यांना त्रास दिला
जवळपास एक तास केलेल्या भाषणात त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. एकंदर राज ठाकरेंनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीला टार्गेट केले. पवारांनी जेम्स लेनवरून बाबासाहेब पुरंदरे यांना त्रास दिला. ज्या जेम्स लेनवरून १०-१५ वर्षे राजकारण यांनी केले. तो म्हणाला की, मी कधीच पुरंदरेंना भेटलो नाही. तुमची केंद्रात सत्ता होती, तर का नाही आणला जेम्स लेनला महाराष्ट्रात? असा सवाल त्यांनी केला.