रमेश तांबे
एक शिवा नावाचा घोडा होता. तो उंचपुरा अन् तगडा होता. पांढरे शुभ्र केस अन् कपाळावर त्याच्या काळा ठिपका होता. चारही पाय गुडघ्याखाली काळेभोर बाकीचे सारे अंग फक्त पांढरे शुभ्र… तर सांगायची गोष्ट ही की, शिवा जास्त वेळ रेसकोर्सवरच असायचा. तिथल्या शर्यतीतून जीव तोडून धावायचा. प्रत्येक वेळी त्याचा नंबर पहिलाच असे. अशा शिवाचा जॉकी होता कॅटी! म्हणजे शर्यतीत शिवाच्या पाठीवर कॅटी बसे, तो कधीच शिवाला मारत नसे. दोघांची दोस्ती होती खूपच जुनी, दोघांच्या गळ्यात होता सारखाच मणी! आठवण म्हणून शिवाच्या वाढदिवसाला कॅटीने शिवाच्या गळ्यात बांधला. तसा शिवाचा भाव खूपच वाढला. त्याला फुटले वाऱ्याचे पाय, मग बक्षिसांचे विचारता काय. कितीतरी नंबर काढले शिवाने, कॅटीने घेतली बक्षिसे आनंदाने.
पण एकदा काय झाले. शर्यतीत एक अक्रितच घडले. धावता धावता शिवाचे पायच घसरला. शिवा पडता पडता वाचला, कॅटी पडता पडता सावरला. ती शर्यत शिवा हरला. पण कॅटी मात्र मनातून फारच चिडला. नेहमी जायचा तसा कॅटी त्या रात्री शिवाजवळ गेलाच नाही. शिवाला स्वतःच्या हाताने खायलासुद्धा दिले नाही. कॅटी दोन दिवस बोललाच नाही. शिवाच्या अंगावरून त्याने हातही फिरवला नाही. शिवाचा पाय होता दुखत. पण कॅटीच्या मनात हार होती सलत. शिवा मनातून दुखावला, कॅटी आपल्या मैत्रीला नाही जागला. कॅटीच्या आठवणीने शिवा तळमळत होता. शिवाला कळेना कॅटीला रागवायला काय झाले? हार-जीत कुणाला चुकली. पण कॅटी तोंड वाकडे करून बसला. चार दिवसांत शिवाच्या समोर तो एकदाच आला.
आज पुन्हा शर्यत होती. शर्यत खूप मानाची होती. शिवाचा पाय अजून बरा नव्हता. तरी शर्यतीसाठी शिवा तयार होता. आज शर्यत जिंकायचीच, कॅटीला आपण हसवायचेच, असे शिवाने ठरवले. आज कॅटीच्या हातात चाबूक होता. याचे शिवाला नवलच वाटले. कॅटीने शिवाला चाबकानेच काय, तर साधे हातानेदेखील कधी मारले नव्हते. म्हणून शिवाला चाबूक बघून आश्चर्यच वाटले. शिवा शर्यतीला उभा राहिला. कॅटीने पहिला चाबूक ओढला तो शिवाच्या दुखऱ्या पायावरच. तसा शिवा कळवळला. पण कॅटीला दया आली नाही. शिवाच्या पाठीवर कॅटी बसला अन् पुन्हा एकदा चाबूक पाठीत बसला. शिवाच्या डोळ्यांत तर पाणीच आले. एवढ्या दिवसांच्या मैत्रीला काय झाले. हेच काय फळ मला मिळाले! की प्राण्यांची अन् माणसांची मैत्री होऊच शकत नाही. शिवाचे मन विचार करू लागले.
बंदुकीचा आवाज येताच शिवा उधळला, दुखऱ्या पायानेच तो पळाला. चाबकाचे फटके पुन्हा पुन्हा बसत होते. शिवा जीव तोडून धावत होता. तरी तो तीन घोड्यांच्या मागेच होता. दुखरा पाय अजून दुखू लागला. आता तर शिवाच्या तोंडातून फेसही येऊ लागला. चाबकाच्या फटक्यांनी अंगातून रक्त गळत होते. तरी जीवाच्या आकांताने शिवा धावत होता. चाबकाच्या प्रत्येक फटक्यांने शिवा अपमानित होत होता. आता तर त्याच्या अंगात वीज संचारली. तो वाऱ्याच्या वेगाने सुसाट धावू लागला. आपल्या प्रतिस्पर्ध्यांना सरसर मागे टाकत मागे शिवा वेगाने पुढे आला.
सरतेशेवटी शिवाने पहिला क्रमांक पटकावला. कॅटी मोठ्या बक्षिसाचा मानकरी ठरला. कॅटीने चाबकाचे आणखी दोन फटके शिवाला लगावले अन् बोटाने विजयी खूण करीत आपले हात हवेत उडवले. कॅटी खाली उतरला अन् शिवाकडे जाण्याऐवजी मित्रांकडे धावला. या पूर्वी असे कधीच घडले नव्हते. इकडे शिवा कॅटीकडे बघता बघता मटकन खाली बसला.
घोडा बसला, घोडा बसला एकच कल्ला झाला. तसा कॅटी शिवाकडे धावला. शिवाच्या दुखऱ्या पायाचे हाड बाहेर आले होते. चाबकाच्या फटकाऱ्यांनी अंगातून रक्त गळत होते. त्याचे डोळे आपोआप मिटत होते. तोंडातून घरघर आवाज येत होता. पोट लोहाराच्या भात्यासारखे खालीवर होत होते. कॅटीने शिवाला पाणी पाजले. भरल्या डोळ्यांनी शिवाच्या तोंडावरून हात फिरवला अन् शिवाने अश्रूंनी भरलेले आपले डोळे मिटले ते कायमचेच.
कॅटीला मोठ्याने रडू फुटले. शिवाला आपण दुखावले. त्याला झिडकारले. आपण आपल्या मैत्रीला जागलो नाही. म्हणूनच शिवाने प्राण सोडला. आता कॅटी स्वतःलाच दोष देऊ लागला. तो महिनाभर घरातच बसून राहिला. तेव्हापासून कॅटीने शर्यतीचा नादच सोडला. आता त्याचा स्वतःचा तबेला आहे. तेथे तो घोड्यांचे पालनपोषन करतो. शिवा घोड्याची महती साऱ्यांना सांगतो. असा हा शिवा घोडा प्राण देऊन आपल्या मैत्रीला जागला!