नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने दुसऱ्यांदा एशियन बॅडमिंटन चॅम्पीयनशीपमध्ये कांस्य पदक जिंकले. शनिवारी खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गत विजेती जपानची खेळाडू अकाने यामागुचीने सिंधूचा पराभव केला. अकाने सिंधूला २१-१३, १९-२१ आणि १६-२१ असे हरविले.
याआधी २०१४ मध्येही सिंधूने एशियन बॅडमिंटन चॅम्पीयनशीपमध्ये कांस्य पदक पटकावले होते. या सामन्याची सुरुवात सिंधूने चांगली केली. पहिल्या गेम सिंधूने २१-१३ असा सहज जिंकला. दुसऱ्या गेममध्येही ती १३-११ अशी आघाडीवर होती. पण त्यानंतर अकाने पुनरागमन करत दुसरा गेम १९-२१ असा जिंकला. त्यानंतर तिसरा गेमही अकाने १६-२१ असा जिंकत सामना खिशात घातला.
शुक्रवारी खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात चीनच्या ही बिंग जियाओला हरवून सिंधूने महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. १ तास १६ मिनिटे चाललेल्या या सामन्यात जियाओला २१-९, १३-२१, २१-१९ असे पराभूत केले होते.