अनुराधा परब
महाभारतातील आदिपर्वामध्ये तसेच भीष्मपर्वातील नवव्या अध्यायामध्ये ‘अपरान्त’, ‘कोकण’ अशी नावे आलेली आहेत. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील गौतमीपुत्र सातकर्णी याच्या कोरीव लेखात आणि तसेच दुसऱ्या शतकातील रूद्रदमनाच्या शिलालेखामध्ये सौराष्ट्र, काठेवाड याहून भिन्न असा अपरान्त देश, असा उल्लेख येतो. तर इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील गुणाढ्याच्या बृहत्कथेमध्येही अपरान्त (ठाणे जिल्हा) आणि कोकण ही जनपदे भिन्न होती, अशी माहिती मिळते. काहींच्या मते परशुरामाची माता ‘कुंकणा’ हिच्यावरून या प्रदेशाला ‘कोकण’ असे नाव पडले असावे. विशेष म्हणजे आजच्या गुजरातमध्ये समाविष्ट झालेल्या डांग या भागामध्ये कुंकणादेवीचे स्थान असून तेथील स्थानिक आदिवासी तिचा उत्सव, पूजन करतात, असाही एक संदर्भ सापडतो. डॉ. कृष्णस्वामी अय्यंगार यांच्या मते ‘कोकण’ हा शब्द तामिळ भाषेतील ‘कोठ’ आणि ‘काणम्’ या शब्दांच्या संयोगातून निर्माण झाला असावा. संघम काळातील तामिळ साहित्यामध्ये या शब्दाचा उल्लेख येतो, असेही ते नोंदवतात. तर भैरवाच्या ‘श्रीकण्ठ चरित्रा’मध्ये अपरादित्यास ‘कुंकणेश्वर’ म्हटले आहे. खारेपाटणच्या शके १०१६च्या ताम्रपटामध्ये ‘कोकण’ आणि ‘कुंकण’ अशी दोन्ही रूपे असल्याचे कोरीव लेखतज्ज्ञ सांगतात. ७व्या शतकातील ‘प्रपंच हृदय’ नामक ग्रंथात कोकण व परकोकण अशी नावे दिलेली आहेत. याशिवाय सह्याद्री खण्डामध्येदेखील परशुरामाच्या बाणामुळे निर्माण झालेल्या केरळ, तुलंग, सौराष्ट्र, कोकण, करनाट व बर्बर अशा सात प्रदेशांना ‘सप्तकोकण’ अशी संज्ञा वापरल्याचे आढळून येते. दक्षिण कोकणाविषयी सांगायचे तर तो ज्या दक्षिणापथ प्रदेशांतर्गत येतो. त्याचेही उल्लेख कौटिलीय अर्थशास्त्र, बौधायन धर्मसूत्र, सुत्तनिपात इ. ग्रंथांमध्ये येत असल्याचे मत म. श्री. माटे आणि गो. त्र्यं. कुलकर्णी या संशोधकांनी नोंदवलेले आहे.
एतद्देशिय ग्रंथ, कोरीव लेखादी साधनांमधून अपरान्त-कोकण या शब्दाविषयीचे उल्लेख जसे मिळतात तसेच उल्लेख परदेशी प्रवाशांनी लिहिलेल्या नोंदींमधूनही ते सापडतात. त्यामध्ये प्लिनी, फ्रॉस्टर, इब्न बतुता, टोलेमी इत्यादी ग्रंथकारांनी कोकणातल्या केवळ भूभागाचाच नाही तर तिथल्या तत्कालीन संस्कृती, पर्यावरणादी गोष्टींचा उल्लेख केल्याचे दिसून येते. कोकणाचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग टोलेमी आपल्या ग्रंथामध्ये ‘लारिका’ व ‘अरिका’ असे उल्लेखितो. टोलेमीच्या भूगोलामध्ये अपरांत महाराष्ट्राला ‘आर्याके’ म्हटले आहे. आजच्या प्रदेशाचे ‘कोकण’ हे नाव इसवी सनाच्या सहाव्या शतकानंतर रूढ झाल्याचे काही ग्रंथकार नोंदवतात. मिरजेच्या शके ९४६च्या ताम्रपटामध्ये ७ कोकणचा उल्लेख आहे, तर कान्हेरी लेणींतील कोरीव लेखामध्ये अपरांतात शूर्पारक व कल्याण या नगरांचे उल्लेख आढळून येतात.
इसवी सनापूर्वीपासून ते अगदी शिवकाळापर्यंत, पेशवाईपर्यंत होऊन गेलेल्या विविध राजकीय सत्तांच्या पाऊलखुणा कोकण प्रांतावर उमटलेल्या दिसून येतात. नालासोपारा येथे सापडलेल्या शिलालेखामधील उल्लेखावरून (सनपूर्व २५०) सम्राट अशोकाच्या अाधिपत्याखाली रत्नागिरी-सिंधुदुर्ग प्रदेश येत असल्यावर शिक्कामोर्तब होते, तर नेरूर आणि गोवा येथे आढळलेल्या ताम्रपटांच्या आधारे सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांची सत्ता कोकणात असल्याची नोंद सापडते. चालुक्यांची राजधानी रेवतीद्विप अर्थात कोकणातील ‘रेडी’ हे गाव होते. मांगलिशाने सन ६२० मध्ये जिंकून घेतलेले दक्षिण कोकण; ऐहोळे शिलालेखातील द्वितीय पुलकेशीचा ‘दक्षिणापथाचा स्वामी’ असा उल्लेख केलेला असून त्याचा मुलगा चंद्रादित्य याला कुडाळ येथील राज्यकारभार पाहण्यासाठी पाठविल्याचा संदर्भही आढळतो. चालुक्यांनंतर राष्ट्रकुटांची सत्ता या प्रांतावर इसवी सनाचे सातवे ते नववे शतक सांगितली जाते. त्या राष्ट्रकुटांचा राजा कृष्णराजाने हा प्रदेश अंकित केल्यानंतर आपला प्रतिनिधी म्हणून दक्षिणी शिलाहारवंशीयांचा आद्य पूर्वज सणफुल्ल यांची नियुक्ती केल्याचा खारेपाटणच्या रट्टराजाच्या ताम्रलेखातील उल्लेख वा. वि. मिराशी नोंदवितात. शिलाहारांच्या ३ शाखांपैकी दुसऱ्या शाखेकडे गोवा व पूर्वीचे सावंतवाडी संस्थान आणि रत्नागिरी जिल्हा (या प्रदेशाला इरिडिगे म्हणत) म्हणजेच दक्षिण कोकणाचा राज्यकारभार होता. सणफुल्ल तत्कालीन सिंहल म्हणजे आजच्या गोवा प्रांतावर राज्य करीत होता. खारेपाटणच्या ताम्रलेखातील नोंदीनुसार या दक्षिणी शिलाहारांच्या ताब्यातील ७०० गावांची राजधानी ही गोवा प्रांतातील चांदोर (पूर्वीचे चंद्रपूर) आणि दुसरी बलिपत्तन अर्थात खारेपाटण होती. दक्षिणी शिलाहारांचा काळ हा आठवे ते बारावे शतक हा उपलब्ध लिखित नोंदींच्या आधारे पुराविदांनी सांगितलेला आहे. कोकणामध्ये बाराव्या शतकात देवगिरीचे यादव, तेराव्या शतकापासून बहामनी आणि पंधराव्या शतकाखेरीस विजापूरची आदिलशाही यांचे वर्चस्व राहिले. सोळाव्या शतकामध्ये पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीज सत्ता उदयाला आली. याच शतकाच्या उत्तरार्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवलेला हा प्रांत १८७१ पर्यंत मराठ्यांनी राखला. १८७१ मध्येच ब्रिटिश आणि पेशव्यांमधील संघर्ष संपून इथे ब्रिटिश अमल सुरू झाला. १८१९ मध्ये दक्षिण कोकण असा वेगळा जिल्हा निर्माण होऊन त्याचे मुख्यालय आधी बाणकोट येथे आणि नंतर रत्नागिरी येथे केले गेले. १८३० मध्ये उत्तरेकडील तीन उपविभाग ठाणे जिल्ह्यामध्ये समाविष्ट करून सिंधुदुर्गाला उपजिल्ह्याचा दर्जा देण्यात आला.
१८३२ मध्ये रत्नागिरीला स्वतंत्र जिल्ह्याचे स्वरूप प्राप्त झाले आणि सिंधुदुर्गाचा समावेश त्यात झाला. एकोणिसाव्या शतकामध्ये कणकवलीला नवा तहसील दर्जा, सावंतवाडी संस्थानाचे जिल्ह्यामध्ये विलीनीकरण करत त्याला स्वतंत्र तालुका दर्जा, तालुक्यांच्या सीमानिश्चिती, कुडाळ-लांजा यांना तहसील म्हणून मान्यता या घडामोडींना वेग आला. सरतेशेवटी छत्रपती शिवरायांनी मालवणनजीकच्या समुद्रकिनाऱ्याजवळ उभारलेल्या जलदुर्गाच्या नावानेच सिंधुदुर्गाचा भूभाग १ मे १९८१ रोजी प्रशासकीय सुविधा तसेच औद्योगिक, कृषिविकास यांच्यासाठी स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित झाला.
यात जागतिक स्तरावरील सर्वात सुंदर ३० पर्यटकस्थळांच्या यादीमध्ये जैवसमृद्धता, वैभवसंपन्नतेच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. एकार्थाने पर्यटनाच्या दृष्टीने हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा जिल्हा असण्यावर मोहोरच उमटलेली आहे. ऐतिहासिक तटरेखा, सुरक्षित बंदरे, व्यापाराचा जलमार्ग, त्या मार्गाने आलेल्या संस्कृती यांचा कोकणाच्या एकूणच संस्कृतीवर सखोल परिणाम झालेला आहे. बाहेरून आलेल्या संस्कृतीला, विचारांना इथल्या संस्कृतीने आपल्यात सामावून घेतले असले तरीदेखील स्वतःचे वेगळेपण कायमच जिवंत ठेवले. स्वीकारशील लवचिकता ठेवली तरच संस्कृती ही प्रवाहाबरोबरच टिकू शकते, समाजाला उपयोगी ठरू शकते हे कुठे तरी या भागातील धुरिणांनी जाणले होते. त्या सिंधुदुर्गाच्या एकूणच इतिहासाची आणि स्थापनेची ही चित्तरकथा पुनःपुन्हा आठवावी अशीच आहे.
(ज्येष्ठ पत्रकार, प्राचीन संस्कृती अभ्यासक)