Wednesday, April 23, 2025
Homeमहामुंबईघणसोलीत रिक्षाचालकांकडून प्रवाशांची होतेय लूट

घणसोलीत रिक्षाचालकांकडून प्रवाशांची होतेय लूट

‘आरटीओ’ने लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी

नवी मुंबई (वार्ताहर) : घणसोली विभागात मोठ्या प्रमाणात नागरिकरण होत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रिक्षा स्टँडही निर्माण होत आहेत; परंतु प्रवाशांची वाहतूक करताना योग्य भाडे असावे, ही अपेक्षा असताना मात्र रिक्षाचालक अवाच्या सव्वा भाडे प्रवाशांकडून वसूल करत आहेत. त्यामुळे प्रवाशांची लूट घणसोली परिसरात होताना दिसून येत आहे. या लुटीला प्रतिबंध बसावा यासाठी आता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

घणसोली परिसरात मीनाताई चौगुले रुग्णालय ते घणसोली रेल्वेस्थानक, घणसोली विठ्ठल मंदिर ते ऐरोली सेक्टर सहा ते आठ, गावदेवी मंदिर ते घणसोली रेल्वेस्थानक, घणसोली डीमार्ट ते घणसोली रेल्वे स्थानक या दरम्यान शेअरिंग रिक्षा धावत असतात. या सर्व रिक्षा स्टॅन्डपासून घणसोली रेल्वेस्थानक एक किमीपेक्षा जास्त अंतर नाही, तर ऐरोली सेक्टर सहादेखील जास्त अंतरवर नाही; परंतु या सगळीकडे किमान पंधरा रुपये इतके प्रवास भाडे आकारले जात आहे, तर दुसरीकडे घणसोली रेल्वे स्थानक ते एनएमएमटी आगार या दरम्यानही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे प्रवासी वैतागले आहेत.

राज्य शासनाच्या परिवहन विभागाकडून किमान दीड किमीचे अंतर मीटर चालू करून पार केल्यावर २१ रुपये इतका दर आकारला जातो. परंतु घणसोली परिसरात किमान एक किमीच्या अंतरात तीन नियमाने प्रवासी बसविल्यास पंधरा, तर अवैधपणे दोन प्रवासी जादा बसविल्यास रिक्षाचालकांना ७५ रुपयांची कमाई होते, परंतु अधिकृत प्रवासी वाहतूक केली तरी दिवसाकाठी चांगले उत्पन्न मिळत आहे. तरीसुद्धा रिक्षाचालक हे मनमानी करून प्रवाशांची वाहतूक करून लूट करीत असल्याचे वास्तव आहे.

सहा सहा प्रवाशी वाहतूक…

घणसोली येथून सकाळी व संध्याकाळी पावणे, महापे एमआयडीसी परिसरात रिक्षा मोठ्या प्रमाणात धावतात. या ठिकाणी जाणाऱ्या रिक्षांमध्ये कमीतकमी पाच ते सहा प्रवासी भरलेले असतात. याचा अर्थ किमान तीन प्रवाशांची क्षमता असताना जास्त प्रवासी भरले जाऊन सुरक्षेचे धिंडवडे निघत आहेत.

क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांच्या वाहतुकीवर कारवाई केली जाईल. तसेच अवैध रिक्षा स्टँडवरही कारवाई केली जाईल. शेअरिंग भाड्यासंदर्भात कार्यालयात माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.
– हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -