औरंगाबाद : औरंगाबादमध्ये आज १ मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून शनिवारी सायंकाळी राज ठाकरे औरंगाबादमध्ये पोहोचताच क्रांती चौकात त्यांचे मनसैनिकांनी जंगी स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी फुलांचा वर्षाव आणि भगवे फेटे घातलेल्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या आगमनानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
त्याआधी शनिवारी सकाळी पुण्यातून औरंगाबादच्या दिशेने निघालेल्या राज ठाकरे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. पुरोहितांचे आशीर्वाद यावेळी घेण्यात आले.
औरंगाबादमध्ये महाराष्ट्र दिनी होणाऱ्या बहुचर्चित सभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले. त्याआधी सभा निर्विघ्न पार पडावी यासाठी पुण्यातील राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर शेकडो पुरोहित जमले होते. चारही वेदांमधील मंत्रोच्चाराद्वारे जवळपास १०० ते १५० पुरोहितांनी राज ठाकरेंना आशीर्वाद दिले. यानंतर राज ठाकरे पुण्याहून रवाना झाले. त्यानंतर राज वढू येथे संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मात्र राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबादमध्ये पोस्टर वॉर रंगल्याचे पाहायला मिळत असून आज महाराष्ट्र दिनी होणाऱ्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यातील सभेत मशिदीवरील भोंग्यांना विरोध दर्शवला. तसेच ते भोंगे उतरवण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे आज कोणती गर्जना करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
बॅनरबाजी जोरात
औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. याबरोबरच राज ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू असून सभेच्या प्रचारासाठी भोंगे लावलेल्या रिक्षांमार्फत शहरात या सभेचा प्रचार करण्यात येणार आहे. याच प्रचार रिक्षांचा शनिवारी मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
औरंगाबाद जिल्ह्यात करण्यात आलेल्या बॅनरबाजीमध्ये शिवसेनेच्या वतीने पोस्टर वॉर पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंच्या हॉटेलच्या काही अंतर परिसरात शिवसेनाच्या वतीने होर्डिंग लावण्यात आले आहेत. या होर्डिंगवर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या सम दुसरे होणे नाही, असे बॅनर लावण्यात आले आहेत. यामुळे शहरात एकंदरीत शिवसेनेच्या वतीने पोस्टर आणि सोशल वॉर पाहायला मिळत आहे.
स्वतःला बाळासाहेब ठाकरेच समजू लागलेत
राज ठाकरे हे आपण जणू बाळासाहेब ठाकरेच आहोत, असे समजू लागले आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच राज ठाकरे हे भाजपची बी टीम नव्हे तर ढ टीम आहे, असा टोलाही लगावला.
बाळासाहेबांची नक्कल कुणी करू नये
भगवी शाल वापरून कुणी शिवसेनाप्रमुखांसारखे होत नाही. बाळासाहेबांची नक्कल कुणी करू नये, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. राज ठाकरे यांची आज १ मे रोजी औरंगाबाद येथे ही सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
सभेच्या अटी
सभास्थळी आसनमर्यादा ही १५ हजार इतकी आहे. त्यामुळे १५ हजार पेक्षा जास्त जणांना आमंत्रित करू नये. जास्त नागरिकांना आमंत्रित करुन चेंगराचेंगरी किंवा इतर दुर्घटना घडल्यास आयोजकांना दोषी धरले जाईल. सभेदरम्यान कोणत्याही वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळथ असणाऱ्या प्रथा/परंपरा यावरून कोणत्याही व्यक्ती किंवा समुदायाचा अपमान होणार नाही, त्याविरुद्ध चिथावणी दिली जाणार नाही, अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कुणीही करणार नाही. याबाबत आयोजक आणि वक्त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी. सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येणाऱ्या वाहनांनी पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा. वाहनांनी शहरात आणि इतर ठिकाणी वेगमर्यादाचे पालन करावे. सभेसाठी कार किंवा बाईक रॅली काढू नये. कार्यक्रमवेळी कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नये आणि त्यांचे प्रदर्शन करू नये. आदी प्रकारच्या अटी सभेसाठी ठेवण्यात आल्या आहेत.