मृणालिनी कुलकर्णी
आज १ मे; महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी शहीद झालेल्या १०७ हुतात्म्यांना माझा नमस्कार. मराठमोळ्या संस्कृतीसाठी, मराठी भाषेसाठी, मराठी माणसांचे राज्य म्हणजे महाराष्ट्र. १ मे १९६० या दिवशी महाराष्ट्र अस्तित्वात आले. औद्योगिक क्रांतीनंतर कामगारांना कोणत्याही सुविधा न देता कमी पैशात १२ ते १८ तास काम करून घेत. त्या विरोधात कामगार एकत्र आले, तो आज जगभरातील कामगार चळवळीचा विशेष दिन.
जगाच्या पोषणासाठी राबणारे, ज्यांच्या कष्टाच्या जोरावर आपण प्रगती करीत आहोत त्या कामगारांना प्रथम वंदन. स्वातंत्र्य-समता-बंधुत्व या नात्याने १ मे हे आंतरराष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. त्यांचाच आदर्श घेऊन महाराष्ट्र वाटचाल करीत आहे. त्यांच्या प्रेरणेने स्वातंत्र्याच्या लढ्यात महाराष्ट्र अग्रेसर होता.
महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची भूमी. संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, तुकाराम, कान्होपात्रा, चोखामेळा यांच्या मांदियाळीने ओव्या, अभंग, भजन-कीर्तनातून लोकांच्या मनाचे संवर्धन, पोषण केले. जातीभेद-वंशभेद विसरण्यासाठी त्यांना भक्ती साधनेचा मार्ग दाखविला. आज विज्ञान युगातही एकादशीला हजारोंच्या संख्येने विठ्ठल प्रेमाने वारकरी पंढरपूरला जातात. स्वतःचे अस्तित्व विसरायला लावणारी, एकात्मतेच्या वारीचा निनाद महाराष्ट्रभर निनादतो. असे म्हणतात, ज्याला ही टाळी पकडता आली त्याला महाराष्ट्र समजला. ज्ञानोबा/ग्यानबा तुकाराम; शिवाजी महाराज की जय! या मंत्राने जे भारावून जातात ते मराठी. महाराष्ट्राची लोककला, लोकगीते, लोकसाहित्य हे लोकजीवनाशी बांधलेले आहे. बोलीभाषेतून गण गौळण, दशावतार, गोंधळ, तमाशातील शृगांरीक लावणी, वीरश्री आणि पुरुषार्थ जागवणारी शाहिरी -पोवाड्यातून (अमर शेख – अण्णा भाऊ साठे) ग्रामीण-कृषी जनतेला नीतीच्या गोष्टी सांगत होते. याच महाराष्ट्रात लोकहितवादी शाहू-फुले-आंबेडकर, कर्वे, गाडगेबाबा, रानडे, आगरकर, टिळक, सावरकर या समाजसुधारकांनी समाजाला प्रबोधन केले. आमटे, बंग, कोल्हे आजचे नवे प्रश्न हाताळीत आहेत.
संस्कृती : माणूस जेथे जन्मतो तेथील राहणीमान-चालीरीती-भाषा-धर्म या साऱ्यांचा प्रभाव म्हणजे संस्कृती. संदेश देणाऱ्या सण-उत्सवांतून मराठी संस्कृतीचे दर्शन घडते. रांगोळी-पूजा हा सणाचा मूळ गाभा. संक्रांत, पाडवा, गणेश जयंती, दसरा, दिवाळी या सणाच्या दिवशी पारंपरिक पोशाख; तीळगूळ – मोदक – गुळाची/पुरणाची पोळी यातून मराठी खाद्यसंस्कृती जपली जाते. श्रावण, पोळा, नारळी पौर्णिमा, भाऊबीज, पाडवा या दिनी निसर्गासोबत नातीही जपली जातात. सणाचे अस्तित्व हवेच. मूल्य जपा, अवडंबर नाकारा.
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम आणि मध्य द्विकल्पीय प्रदेशातील एक राज्य आहे. महाराष्ट्रात पश्चिमेस सह्याद्री पर्वतरांग, शिवकालीन गडकिल्ले, कोकणाला लाभलेला निसर्गरम्य समुद्र नि समुद्रकिनारा; गोदावरी-कृष्णा या प्रमुख नद्या; खापरखेडा-भिरा-तारापूर-तुर्भे-कोयना वीज केंद्र, जैविकविविधतेने नटलेला सिंधुदुर्ग, ताडोबा-नवेगाव-नागपूर येथील अभयारण्ये; कान्हेरी एलिफन्टा, अजंठा वेरूळच्या देखण्या लेण्या, लोणार सरोवर अशा स्थानांनी महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर नेले.
राज्यभर पसरलेली हिंदू-बुद्ध-जैनांची प्रार्थना मंदिराची वास्तुरचना-स्थापत्यशैली-मंदिराचे कळस स्तिमित करतात. तुळजापूर, शिर्डी, शेगाव, पंढरपूर ही तीर्थक्षेत्रे; महाराष्ट्राचे सर्वपरिचित लोकदैवत खंडोबा आणि कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी. भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंग महाराष्ट्र स्थित आहेत. ज्वारी, तांदूळ, ऊस, साखर ही उत्पादने. महाराष्ट्रचा राज्य पक्षी कबुतरवंशीय हरियाल, प्राणी खार प्रजातीची शेकरू, फळ आंबा होय.
गेटवे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. स्वतंत्र भारतातील ज्ञान-विज्ञानाच्या आधुनिक गरज हेरत महाराष्ट्र स्थापनेच्या दिवशीच मुखमंत्री यशवंराव चव्हाण यांनी शासनाच्या धोरणात मराठी साहित्य, कला व संस्कृती या क्षेत्राची प्रगती व्हावी म्हणून शासनाचे महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ सुरू केले.
साहित्य हा समाज संस्कृतीचा अविष्कार आहे. गडकरी, खांडेकर, अत्रे, कुसुमाग्रज यांचे सर्जनशील साहित्य. संगीत व नाटक हे प्रत्येक मराठी माणसाचे वेड. सुहास बहुलकर, गायतोंडे यांची चित्रे महाराष्ट्राची मानचिन्हे आहेत. नृत्यात रमलेली नवी पिढी. कृषी, व्यापार, शिक्षणाबरोबरच देशाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात महाराष्ट्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
गेटवे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. महाराष्ट्रात भारतातील सर्वात मोठे स्टॅाक एक्स्चेंज, भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचे केंद्र; टीआयएफआर, आयआयटी, सीएसआयआर व भाभा अणू संशोधन केंद्र या नावाजलेल्या संशोधन संस्थाही मुंबईत आहेत. आजचा महाराष्ट्र अनेकविध क्षेत्रांत संपन्न-समृद्ध असून साऱ्या वाटा विस्तारत आहेत. अनेकांना महाराष्ट्राने समर्पक उपाध्या दिल्या आहेत. उदा. महाराष्ट्राचे वाल्मिकी ग. दि. मा., कलामहर्षी बाबुराव पेंटर; चित्रपती व्ही. शांताराम, शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे…
“महाराष्ट्र भूषण” देऊन सन्मानित केलेल्यांची नावे – संगीतात : लता मंगेशकर – आशा भोसले – भीमसेन जोशी. क्रीडा : सचिन तेंडुलकर – सुनील गावस्कर; विज्ञान : विजय भाटकर, रघुनाथ माशेलकर, अनिल काकोडकर-जयंत नारळीकर; उद्योग : रतन टाटा; साहित्य : महाराष्ट्राचे लाडके पु. ल. देशपांडे – मंगेश पाडगावकर; समाज सेवक बाबा आमटे – नानासाहेब धर्माधिकारी – रा. कृ. पाटील; चित्रपट : सुलोचना अशा अनेकांनी जगात महाराष्ट्राचे नाव नेले आहे.
आज विकासाच्या नावाखाली शब्दाशब्दांवरून वाद, विरोध बघतो. मुंबईत मानवी मन घडविणाऱ्या मूल्यांचा आभाव जाणवतो. ६० वर्षांपूर्वी मराठी राज्यासाठी केलेले आंदोलन आठवा. आज मराठी माणसाने स्वतःचे अस्तित्व वेळोवेळी दाखवून द्यावे. मी मराठी! महाराष्ट्र माझा!!