Tuesday, March 18, 2025
Homeकोकणरायगडव्यावसायिक हंगामाच्या काळात माथेरान करांवर मंदीचे सावट ! स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण

व्यावसायिक हंगामाच्या काळात माथेरान करांवर मंदीचे सावट ! स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण

मुकुंद रांजाणे

नेरळ : माथेरान मधील वनसंपदा हळूहळू संपुष्टात येत असतानाच एप्रिल आणि मे ह्या शेवटच्या व्यावसायिक हंगामात स्थानिकांना तीव्र मंदीचे चटके सोसावे लागत आहेत.अन्य उत्पन्नाचे साधन नसल्याने पर्यटन शेतीवर सर्वांचे जीवनमान अवलंबून असते. एकेकाळी एप्रिल आणि मे महिन्यात माथेरान मध्ये पर्यटकांची तोबा गर्दी पहावयास मिळत होती परंतु यावर्षी पहिल्यांदाच उष्णतेचे प्रमाण सुध्दा भरमसाठ वाढलेले असून या महत्वपूर्ण सुट्ट्यांच्या हंगामात स्थानिकांना मंदीचा सामना करावा लागत असल्यामुळे सर्वांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे.

मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यापासून पर्यटकांना खोटी माहिती आणि चुकीच्या पद्धतीने काही व्यवसायीक मार्गदर्शन करत असल्यामुळे पर्यटकांची होत असलेली दिशाभूल आणि फसवणूक यामुळे दिवसेंदिवस या सुंदर स्थळाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी की ज्यांना या गावाबाबत काहीएक स्वारस्य नाही की प्रेम नाही अशा लोकांना वेळीच आवर घातला गेला नाही तर माथेरान हे केवळ नकाशावर राहील आणि स्थानिकांना हे गाव सोडून जावे लागेल अशी भीती यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.

दस्तुरी नाक्यावर पर्यटकांची दिशाभूल करण्याचे जे काही अनुचित प्रकार घडत असतात त्याला सर्वस्वी जबाबदार येथील पोलीस प्रशासन, नगरपरिषद ,वनखाते आणि काही ठराविक लोकप्रतिनिधी आहेत. दस्तुरी येथील जे कोणी रस्त्यावर व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत त्यांच्यामुळे पर्यटकांमधून वेगळाच संदेश जात आहे. त्यामुळे या सुंदर स्थळाकडे पर्यटकांनी पाठ फिरवली असून दस्तुरी येथूनच होत असलेल्या व्यावसायिक लुटमारीमुळे पर्यटकांनी आपला मोर्चा थेट आजूबाजूच्या माथेरानच्या पायथ्याशी असणाऱ्या फार्म हाऊस कडे वळविला आहे. त्यामुळे हे ठिकाण वन डे पिकनिक स्पॉट झाले आहे.

माथेरान मधील पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेल्या स्थानिकांच्या मुलाबाळांच्या उज्वल भविष्यासाठी जे वेळच्यावेळी पाणी, वीज तसेच नगरपरिषदेच्या सर्व प्रकारच्या बिलांचा भरणा करीत आहेत. आणि संबंधित लोकप्रतिनिधी असोत की स्थानिक नगरपरिषद प्रशासन त्यांना साथ देत आहेत की ज्यांच्यामुळे या गावाची प्रतिमा अक्षरशः मलिन होत चालली आहे. याकामी लवकरच काहीतरी ठोस उपाययोजना केली गेली नाही तर आगामी काळात समस्त स्थानिकांचे जीवनमान अंधकारमय होईल अशी भीती वयोवृद्ध नागरिक करीत आहेत.

कधीच नव्हे एवढी मंदी पाहून डोके चक्रावून गेले आहे. आम्ही सर्व दुकानदारांनी या सुट्ट्यांच्या हंगामात चांगला व्यवसाय होईल म्हणून अनेकांनी कर्ज काढून दुकानात भरगच्च माल भरलेला आहे.परंतु अशाप्रकारे जी काही मंदी जाणवत आहे त्यामुळे आमच्या व्यवसायावर मोठया प्रमाणावर फरक पडला आहे.एवढी मंदी का पडली आहे त्याचा अभ्यास स्थानिक प्रशासनाला नक्कीच करावा लागणार आहे. -वैभव पवार, व्यावसायिक माथेरान

नोकऱ्या नसल्याने माथेरान मधील अनेक तरुण वर्ग लोजिंग व्यवसायात गुंतला आहे. कुणी वार्षिक भाडेतत्त्वावर ह्या लोजिंग घेतलेल्या आहेत. परंतु इथे अशा शेवटच्या सुट्ट्यांच्या हंगामात सुध्दा पर्यटक येत नाहीत त्यामुळे निश्चितच युवा वर्ग कर्जाच्या बोजाखाली दबणार आहे.यासाठी प्रशासनाने काहीतरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. -निखिल शिंदे,लॉज मालक माथेरान

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -