Monday, March 24, 2025
Homeकोकणरायगडपालीत वाहतूक कोंडीचे मोठे विघ्न

पालीत वाहतूक कोंडीचे मोठे विघ्न

अवजड वाहनांमुळे कोंडी जटिल: नागरिक, भाविक, पर्यटक बेजार

गौसखान पठाण

सुधागड – पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात मोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटक दाखल होत असतात. भाविक व पर्यटकांची वाहने, तसेच इतर अवजड वाहने आणि डंपर यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी जटिल होत आहे. दिवसा आणि रात्री देखील कोंडी होत असते. परिणामी पर्यटक, भाविक व नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. पाली हे तालुक्याचे ठिकाण आहे. परिणामी अनेक लोक कामानिमित्त व विद्यार्थी शाळा व कॉलेजमध्ये येत असतात. परिणामी कोंडीमुळे वाहनचालक, भाविक, पादचारी येथून वाट काढतांना मोठी गैरसोय होते. शिवाय दुर्घटना घडण्याची शक्यता देखील आहे.

बल्लाळेश्वर मंदिर ते ग.बा. वडेर हायस्कूल, मारुती मंदिर चौक ते जुने एस.टी.स्टँड, गांधी चौक ते बाजारपेठ, कुंभार आळी, बँक ऑफ इंडिया, हटाळेश्वर चौक ते मिनिडोअर स्टँड, एसबीआय बँक ते गांधी चौक अशा विविध ठिकाणी नियमित वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पालीत डंपर, ट्रॅक्टर व लक्झरी वाहनांची नियमीत ये-जा सुरु असते. त्यामुळे वाहनांना येण्या जाण्याचा आणि वळण्यासाठीचा मार्ग मिळत नाही. तसेच नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालक देखील वाहतूक कोंडीत भर घालतात. पालीतील रस्ते हे खूप अरूंद आहेत. अशा अरुंद रस्त्यांच्या दुतर्फा अनेकजण आपली दुचाकी वा मोठी वाहने पार्क करतात आणि खरेदी किंवा इतर कामांसाठी ते निघुन जातात.

अनेक दुकाने, टपऱ्या व इमारती रस्त्यांच्या अगदी कडेला आहेत. काही ठिकाणी तर अनधिकृत बांधकामे देखील उभारली गेली आहेत. त्याबरोबरच रस्त्याच्या बाजुला सुरु असलेली बांधकामे आणि या बांधकामांचे साहित्य रस्त्यावर पडलेले असते. त्यामुळे येथून मार्ग काढणे वाहनचालकांना शक्य होत नाही. तसेच सुट्टयांच्या काळात तर मोठ्या प्रमाणात पर्यटक व भाविक पालीत दाखल होत आहेत.

बाह्यवळण मार्ग ठरेल वरदान

राज्यशासनाने सन २०१० या वर्षी पाली बाह्यवळण मार्गाला मान्यता दिली आहे. तसेच या रस्त्यासाठी १८ कोटी तर भूसंपादनासाठी १० कोटींची मंजुरी मिळाली होती. सदरचा मार्ग हा वाकण – पाली मार्गावरील बलाप येथून पाली पाटनुस राज्यमार्ग ९४ ला जोडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खाजगी एजन्सीद्वारे मार्गाचा प्लॅन फायनल केला आहे. त्यानुसार रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास मान्यता देवून प्रांत अधिकाऱ्यांना जमिन अधिग्रहणाच्या सुचना दिल्या होत्या. या मार्गात येणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी नष्ट होणार असल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. त्यांचा या मार्गाला विरोध आहे. परिणामी विविध कारणांमुळे मार्गाचे काम रखडले आहे. बाह्यवळण मार्ग झाल्यास येथील कोंडी फुटू शकेल.

वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सर्वांचीच मोठी गैरसोय होते. डंपर व अवजड वाहनांमुळे अधिक कोंडी होते. शिवाय अपघाताचा धोका देखील आहे. याबाबत ठोस उपाययोजना करावी. तसेच वाहनचालकांनी देखील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. – दत्तात्रेय दळवी, अध्यक्ष स्वयंपूर्ण सुधागड

वाहन चालकांनी नियमांचे पालन केल्यास वाहतूक सुरळीत होईल. नोइन्ट्री, नो पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत. नागरिकांनी आपली वाहने बसस्थानक, पशुधन कार्यालय आदी ठिकाणच्या मोकळ्या जागेत पार्क केल्यास शहरात वाहतूक कोंडी होणार नाही. -आरिफ मणियार, उपनगराध्यक्ष, नगरपंचायत पाली

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -