मुंबई (वार्ताहर) : रविवारी दुपारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स दुसऱ्यांदा आमने-सामने उभे ठाकणार असून लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध लढण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स सज्ज आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत चार सामने जिंकले असून तेवढेच सामने त्यांनी गमावले आहेत आणि गुणतालिकेत ते सहाव्या स्थानी आहेत.
याउलट लखनऊने खूप चांगली कामगिरी केली आहे आणि सहा विजय मिळवून १२ गुणांसह ते तिसऱ्या स्थानावर आहेत. मोसमाच्या सुरुवातीच्या सामन्यात लखनऊने दिल्लीवर सहा गडी राखून विजय मिळवला होता. त्यामुळे या पराभवाचा बदला घेण्यासाठी दिल्ली आतुर असल्याने दोन्ही संघांतील हा सामना अटीतटीचा होण्याची शक्यता आहे.
तसेच दोन्ही संघांनी आपापल्या मागील सामन्यात विजय मिळवला असल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, कर्णधार ऋषभ पंत आणि मुस्तफिजुर रहमान, तर लखनऊ सुपर जायंट्ससाठी, सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल तसेच रवी बिश्नोई महत्त्वाचे खेळाडू असतील.
केएल राहुल या हंगामात स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे तसेच कुलदीप यादवने मागील सामन्यात तीन षटकांत चार विकेट्स घेतल्याने कुलदीप आणि मार्कस स्टॉइनिस तसेच, दुष्मंथा चमीरा आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यातील द्वंद्वयुद्धही पाहण्यासारखे असेल. दिल्ली कॅपिटल्सची बाजू चेतन साकारियाच्या समावेशामुळे मजबूत झाली आहे, तर लखनऊला मोहसीन खानच्या समावेशामुळे मोठा फायदा झाला आहे.
ठिकाण : वानखेडे स्टेडियम, वेळ : दुपारी ३.३०