रवींद्र मुळे
उद्गीर येथे साहित्य संमेलनाचे सूप वाजले आणि तीन दिवसांचा सोहळा पार पडला. त्याबरोबरच हल्ली बरोबरीने भरणारे विद्रोही संमेलनही पार पडले. पण अलीकडील काळात ही संमेलने खरोखर आवश्यक आहेत का? असा प्रश्न पडावा, अशी एकूण स्थिती आहे.
एके काळी एखाद्या शहरात साहित्य संमेलन असले की, त्या शहरालाच एखाद्या उत्सवाचे रूप यायचे. लोकसहभाग उत्स्फूर्त असायचा आणि त्यामुळे उत्साह दांडगा असायचा. परिणामस्वरूप ते शहर सहजच साहित्य नगरी बनायचे! साहित्यिक आणि वाचक यांचा एक अनुबंध मांडला जायचा!
मराठी सारस्वतांची सुरुवात थेट संत साहित्यापाशी जाऊन थांबते. जसा जसा काळ बदलत गेला, तसे तसे साहित्य बदलत गेले. आजूबाजूला असणाऱ्या सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब साहित्यात उमटणे स्वाभाविक होते. त्यातून लेखक, साहित्यिक निर्माण होऊ लागले. अशा सगळ्या साहित्यिक, लेखक आणि रसिक वाचक यांचे एकत्र येणे गरजेचे झाले, त्यातून संमेलन सुरू झाले.
संमेलन म्हटले की, अध्यक्ष आले. मग अध्यक्ष निवडायची प्रक्रिया आली. निवडणुका आल्या आणि मग त्यामुळे राजकारण पण आले. स्वतःला समाजवादी, डावे किंवा लोकप्रिय भाषेत पुरोगामी म्हणवणाऱ्या मंडळींनी यावर वर्चस्व निर्माण केले. त्यातून आपल्याला हवे तसे विमर्ष निर्माण करण्यासाठी त्यांनी या व्यासपीठाचा सातत्याने खुबीने वापर केला. म्हणजे या बाबतीत ते इतके मालकी असल्यासारखे वागत होते की, पु. भा. भावे हे एकदा अध्यक्ष म्हणून निवडून आले, तर यांनी चक्क संमेलन उधळून लावले. कारण काय तर पु. भा. भावे हे हिंदुत्ववादी विचारांचे होते. थोडक्यात साहित्यिक मूल्यांच्या पेक्षाही त्या लेखक अथवा साहित्यिकांचे राजकीय, सामाजिक विचार कुठले आहेत, यावर साहित्य संमेलने आणि अध्यक्ष यांचे राजकारण फिरू लागले. आता अलीकडील काळात या निवडणुका न होता नेमणुका होऊ लागल्या आहेत.
साहित्य संमेलनात राजकीय कार्यकर्ते, नेते यांचा हस्तक्षेप नसावा यावर बराच वादंग मागील काही काळ झाला. पण पैसे आणि पुरस्कार या दोन्ही गोष्टींनी संमोहित झालेले आमचे साहित्यिक एरवी कितीही लिहीत असले, तरी भ्रष्ट राजकीय व्यवस्थेचे गुलाम झाले आहेत, असे दुर्दैवाने म्हणावे लागते आणि मग त्याचेच प्रतिबिंब तेथील कार्यक्रम आणि अध्यक्षीय भाषणापासून दिसू लागते. उद्गीर येथील संमेलनही याला अपवाद नव्हते.
या बरोबरीने वेगवेगळी साहित्य संमेलने निर्माण झाली, त्यात विद्रोही साहित्य संमेलन हाही एक प्रकार सुरू झाला. काही संमेलनाचे हेतू विधायक होते, काही संमेलनाचे हेतू विघातक होते. समाजात नेहमीच मुख्य प्रवाह जो प्रस्थापित मंडळींचा होता आणि त्या प्रवाहाला विरोध करणारा जो असायचा त्याला विद्रोही म्हटले जायचे. पण अलीकडच्या काळात एक गंमत दिसायला लागली आहे, ती म्हणजे विद्रोहाचे सूर कमी-अधिक प्रमाणात दोन्हीकडे दिसू लागले आहेत आणि मुख्य म्हणजे यातील एक समान धागा दिसू लागला म्हणजे हिंदुत्वाचा विरोध करणे हा होय! दोन्ही व्यासपीठावर वेगवेगळ्या पद्धतीने समान विमर्ष पुढे नेण्याचा घृणास्पद प्रयत्न सुरू झाला.
या देशातील बहुसंख्य समाज हा हिंदू आहे आणि महाराष्ट्र याला अपवाद नाही. मराठी भाषिक बहुतांश समाज अर्थात हिंदू आहे, अशा वेळेस कुणीतरी सय्यद चिस्ती नामक तथाकथित उपटसुंभ उद्घाटक म्हणून आला आणि त्याने विद्रोही साहित्य संमेलनाचे रूपांतर धार्मिक व्यासपीठ करत रामनवमी, हनुमान जयंतीच्या मिरवणुकींवर घसरला! आमच्याच
देशात आमच्या देवतांच्या मिरवणुका कशा काढायच्या याची बंधने आणि दुसरीकडे, कुठल्याही मुस्लीम देशात पैगंबर जयंती साजरी होत नसताना येथे मात्र उन्मादी मिरवणुका! दलित बांधवांना उचकवण्याचा त्याचा प्रयत्न अश्लाघ्य होताच. पण उघड-उघड मुस्लीम धर्मप्रसार करणारे त्याचे भाषण हे एकूणच संमेलनाच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे होते!
कुणाच्या आशीर्वादाने ही संमेलने भरत आहेत? मागे नाशिकला या विद्रोही संमेलनात श्रीमंत केकाटले की, शूर्पणखा ग्रामदेवता आहे आणि आज हे मौलवी बरळले! असेच चालू राहिले, तर ही विद्रोही संमेलने होऊ नये, असे ठराव स्थानिक नागरिकांना करावे लागतील. हिजाब घालून अनेक महिला या संमेलनात हजर होत्या! हा विद्रोह होता की, मुस्लीम पारंपरिक नियम हे आम्हाला महत्त्वाचे आहेत, असे हिंदूंना खिजवणे होते? एकीकडे हिंदू परंपरांना विरोध करायचा, तो विद्रोह म्हणून गौरवायचा आणि हिजाब घालण्यासाठी महिलांना प्रोत्साहन द्यायचे, ही या विद्रोही मंडळींची दुहेरी नीती असावी.
पूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मुस्लीम समाजाला किती राग आहे हे यावेळी त्यांच्या जयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक करून धर्मांध मंडळींनी दाखवून दिलेच. पण या विद्रोही संमेलनाच्या स्वागताध्यक्षा ज्या कुणी मुस्लीम होत्या त्यांनी जे विद्यापीठ नामांतर झाले त्यालाच विरोध केला! त्यामुळे हे विद्रोही संमेलन नव्हते, तर हिंदू संमाजाच्या विरोधातील विखार व्यक्त करणारे विखारी संमेलन होते. अशा विद्रोहाचे रूप घेऊन विखार व्यक्त करणाऱ्या लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे!
हल्ली महाराष्ट्राच्या नाट्य, संगीत, साहित्य सर्व व्यासपीठावर जॉर्ज ओरवेलने वर्णन केलेल्या बिग ब्रदरची एकतर उपस्थिती असते किंवा त्याचे डोळे, कान बघत आणि ऐकत असतात! त्यामुळे साहित्यातील विचारशून्य पोपट पण बिग ब्रदरला खूश करण्यासाठी अभ्यास, तत्त्वज्ञान याचा मुलामा देत हिंदुत्वाला बदनाम करत असतात! मग कुठलेही व्यासपीठ असो, नकारात्मकता व्यक्त करायची आणि सध्या कसे सगळे वाईट चालू आहे, याचे रडगाणे गायचे.
आमच्या भारत सासणेंनी ती परंपरा कायम ठेवली, जी श्रीपाल सबनीस यांनी सुरू केली. त्यांनी आपल्या बोलण्यात भर्तृहरी, पुराण याचे दाखले दिले खरे, पण त्यांनी छद्म आणि दुष्ट बुद्धीचा उल्लेख करत देश अशा मंडळीच्या ताब्यात गेला आहे, असे म्हटले. त्यांनी वर्णन केलेल्या बुद्धीच्या लोकांनीच हा देश कोरोना संकटातून बाहेर काढला आहे, हे ते सोयीस्करपणे विसरले. याच बुद्धीच्या लोकांनी जगात भारताचे एक सन्मानयुक्त स्थान निर्माण केले आहे. याच बुद्धीच्या लोकांकडून सत्तेत असताना रुपयांचा भ्रष्टाचार झालेला नाही. या छदम आणि दुष्ट बुद्धीच्या लोकांनी कोरोना काळात अखंड सेवा केली आहे. त्यामुळे ही छद्म बुद्धी आहे की, दुष्ट बुद्धी आहे की, विवेक आणि सद्सद्विवेक बुद्धी आहे? हे लोकांना ठरवू द्या. तुम्ही लोकशक्तीला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका!
सारे जग कोरोना लढ्यातील भारताच्या क्षमतेबद्दल साशंक होते. भारतात तपासणीच्या व्यवस्था, पीपीई किट, वेंटिलेटर, ऑक्सिजन सगळ्याची कमतरता होती. लस तयार करणे हे तर दूरच राहिले, अशा परिस्थितीत सासणे यांनी उल्लेख केलेल्या छद्म आणि दुष्ट बुद्धीच्या नेतृत्वाने आणि त्यांच्या सरकारने आश्चर्यकारकरीत्या या परिस्थितीवर मात केली. भारताने बजावलेल्या या कामगिरीचे साऱ्या आंतरराष्ट्रीय समुदायाने कौतुक केले. यात शास्त्रज्ञांनी, डॉक्टरांनी केलेली भूमिका महत्त्वाची होती. पण दुष्ट बुद्धीचे लोकांचे सरकार त्यांच्या पाठीशी उभे होते, हे सत्य विसरता कामा नाही. ज्या टाळ्या वाजवण्याची अध्यक्षांनी टिंगल केली त्यातील साऊंड थेरपी त्यांनी समजावून घ्यावी. लोकांचे मनोधैर्य केवळ शब्दांच्या बुडबुड्यातून निर्माण होत नाही. त्यासाठी चाकोरीबाहेर विचार करावा लागतो. दुर्दैवाने स्वतःला पुरोगामी म्हणवणारे भारत सासणेंसारखे विचारवंतच साचेबद्ध विचार करत आहेत हे दुर्दैव. विदूषकाच्या ताब्यात म्हणे देश गेला आहे, हा एक शोध त्यांनी मांडला. जो त्यांना विदूषक वाटतो, त्याला देश दोन वेळेस निवडून देतो आणि ते लोकशाही पद्धतीने! सगळे जग त्याला सन्मान देतात. तो १८ तास काम करतो. जवळ जवळ २० वर्षे सत्तेच्या केंद्रस्थानी राहून तो निष्कलंक राहतो. त्याच्या संपत्तीत वाढ होत नाही. सासणे यांचा एक तर लोकशाही प्रक्रियेवर विश्वास नसावा किंवा त्यांच्या मानाने हे खूपच जास्त चांगुलपण असावे.
हे म्हणतात, हे विदूषक भिकेचा कटोरा घ्यायला लावतील. पण मग आयएमएफचा अहवाल पण खोटा का? जो सांगतो आहे, सर्वात जास्त जीडीपी वाढ भारताची असणार आहे. तुम्ही तर थेट यादवी होण्याची भविष्यवाणी करून बसला! इतकी नकारात्मकता बरी नव्हे सासणे जी! अशी संमेलने खरे तर सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी असावी. समाजाला भ्रमित, भयग्रस्त करणारी नसावी, पण दुर्दैवाने अशी संमेलने नकारात्मक आणि जनतेत लोकप्रिय होत असलेल्या वैचारिक तत्त्वालाच विरोध करणारी ठरतात तेव्हा ती संमेलने, ते साहित्यिक आणि त्यांचे साहित्य हे समाज आणि त्यांच्यात अंतर निर्माण करते आणि स्थानिक पुढाऱ्यांच्या जीवावर राजकीय अधिवेशनात असते, तशी गर्दी खेचून आणावी लागते. मग उत्स्फूर्तता मागे पडते आणि उरते ती औपचारिकता!
तात्पर्य, जर याच पद्धतीने बदलत्या सामाजिक विमर्षाचा विचार न करता साहित्यिक आणि त्यांचे सहकारी यांच्याकडून केवळ आपल्या अन्नदात्याच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी अशी संमेलने भरवली जाणार असतील, तर समाज पूर्णपणे या प्रायोजित कार्यक्रमांवर बहिष्कार टाकतील आणि साहित्य संमेलने कालबाह्य होतील! याचा विचार मराठी साहित्य परिषदेने करण्याची गरज आहे.
(लेखक हे नगर येथील स्थापत्य अभियंता आहेत.)