डॉ. वीणा सानेकर
कोणतीही भाषा माणसा-माणसांमधील संवाद सुकर करते. सोपी करते. भाषा ही कमवायची गोष्ट आहे हे तर खरेच. पण ही कमाई बाजाराच्या गणितानुसार मोजता येत नाही. ती भौतिक समृद्धीशी जोडलेली गोष्ट नाही. ती आतून समृद्ध करणारी गोष्ट आहे. भावना, विचार, विवेक यांच्या विकासाची गोष्ट आहे. मात्र भाषासंस्काराचे महत्त्व आपल्या समाजात तितकेसे बिंबवले जात नाही. त्यात मायभाषेचे तर मुळीच नाही. आता मराठीचेच पाहा ना, ती घरात बोलली जाणारी भाषा याच अर्थाने पाहिली जायला लागली आहे. शालेय स्तरावर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये ती दुय्यम स्तरावरची भाषा समजली जाते. मराठी माणसांच्या घरातही तिचे स्थान मग दुय्यमच बनते.
हा संवाद पाहा :
आई : अरे निखिल, तुला एक मराठी पुस्तक वाचायला नको.
निखिल : पण मला नाही आवडत.
आई : अरे तू काय बोलतोयस हे? आपली भाषा ना ती.
निखिल : हो पण मला कुठे सवय उरलीय. अगं, तूच ना मला इंग्लिश मीडियममध्ये घातलंस.
आई : हो पण म्हणून काय तू मराठी वाचायचंच नाही का?
निखिल : अगं, तू मला विज्ञान, गणित, सोशल सायन्स असे विषय महत्त्वाचे असल्याचे सांगितलेस. पण मराठी महत्त्वाची, हे कुठे सांगितलेस? माझ्याकरिता मराठी ही नेहमीच सेकंडरी लँग्वेज होती.
या संवादातून उमटलेले चित्र आज घराघरांमध्ये दिसते. इंग्रजी शाळांची निवड पालकांनी केल्यामुळे मराठी ही दुय्यम भाषा झाली. साहजिकच मुले मायभाषेपासून दुरावली. ती महत्त्वाची नाही, पुढे जायचे, तर इंग्रजीची कास धरली पाहिजे. नकळत्या वयात मुलांच्या मनावर बिंबवले गेले.
पालकांनीच मुलांना मराठीपासून तोडले. आपल्या भाषेतील मूल्यसंस्कार करणार या पुस्तकांपासून मुले दुरावली आणि मग त्यांना मराठी वाचनाची गोडी नाही म्हणून पालकच कुरबुर करू लागले.
आज अनेक घरांमध्ये पालक मुलांना मॅाल्समध्ये घेऊन जातात. त्यांना हव्या त्या वस्तू, खेळणी देतात. पण आठवणीने पुस्तक डेपो किंवा पुस्तक प्रदर्शनांना जाऊन मुलांकरिता मराठी पुस्तके खरेदी करतात का?
भाषासंस्कार ही गोष्ट पालकांनी किती महत्त्वाची मानली? मुलांची मातृभाषा जर पक्की असेल, तर मुले अन्य भाषादेखील सहज शिकू शकतात, असे शिक्षणतज्ज्ञ मानतात, पण हा दृष्टिकोन अनेक पालक समजून घेत नाहीत. परिणामी नुकसान मुलांचे होते.
मातृभाषा मुलांच्या ठिकाणी सर्जनशीलतेचा विकास घडवून आणते. त्यांची समज वाढवते. संवेदनशीलता जागी ठेवते. केवळ बुद्ध्यांक मुलांच्या विकासात महत्त्वाचा नाही, तर भावनांक देखील तितकाच महत्त्वपूर्ण आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम उच्च वर्ग आणि गरीब – वंचित वर्ग यांच्यातील दरी वाढत जाणे हितावह नसते. वंचितांचे प्रश्न समजून घ्यायचे, तर त्यांच्या प्रश्नांबद्दल आस्था आणि कळकळ हवी. तिचा विकास परक्या भाषेतून होऊ शकत नाही.
बाई मी धरण धरण बांधते
माझे मरण मरण कांडते…
या ओळी आहेत, दया पवार यांच्या ‘धरण’ नावाच्या कवितेतील. कष्टकरी बाईची वेदना, तिचे दु:ख’ मरण कांडते’ या ओळींमधून आर्ततेने व्यक्त झाले आहे. ती आर्तता एक विलक्षण समज वाढवते.
अशीच कष्टकरी स्त्रीची वेदना टिपणारी एक कविता आहे. ‘डोंगरी शेत माझं गं मी बेनू किती’, असे या कवितेचे शब्द. टपलेला सावकार, घरातली ओढाताण, पदरी असलेलं लहान बाळ या सर्वांचे उल्लेख या कवितेत येतात. आपल्या मायभाषेत व्यक्त झालेली कष्टकरी वर्गाची व्यथा-वेदना मुलांपर्यंत पोहोचते, तेव्हा दुसऱ्या बाजूने या वर्गाची दु:खे दूर करण्याकरिता झटण्याची जाणीव देखील विकसित होण्याच्या शक्यता वाढतात. विविध वर्गांतील, जाती-पोटजातींतील माणसांची आत्मकथने मुलांकरिता प्रेरणादायक ठरू शकतात. शिक्षण हे अनेकांकरिता आव्हान होते. ना गणवेष, ना धड जेवण, ना गावात सोयी-सुविधा! अशा प्रतिकूल परिस्थितीत माणसे पुढे गेली. त्यांनी प्रगतीची दारे स्वत:च्या आणि मायभाषेच्या जोरावर उघडली. मराठीत उचल्या, उपरा, व्हय मी कलेक्टर व्हयनू, आयदान, पोस्टातली माणसं, ढोरं, अशी अनेक आत्मकथने आहेत, जी दलित वंचितांचा उद्गार समर्थपणे नोंदवतात.
आपल्या मुलांना मायभाषेतले हे दालन पालकांनी दाखवले आहे काय? अनेक मूल्ये केवळ पाठ करून आत्मसात करता येत नाहीत, तर ती सहजगत्या मुलांच्या मनात झिरपली पाहिजेत आणि त्यासाठी हवा मायभाषेतून घडणारा भाषासंस्कार!
नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईचा वीजवापर ‘४००० मेगावॅट’ पार! तर राज्यभरात ३०,९२१ मेगावॅटची विक्रमी मागणी मुंबई : राज्यातील उष्णतेच्या…
शांघाय : बाजारात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाच, चीनमधील शांघाय शहरात एक भन्नाट तंत्रज्ञान…
तुर्कस्तान : तुर्कस्तानमध्ये (तुर्कीये किंवा टर्की) भूकंपामुळे जमीन हादरली. जर्मन भूगर्भतज्ज्ञांनी तुर्कस्तानमध्ये ६.२ रिश्टर क्षमतेचा…
चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie) सातत्याने नवनवीन चित्रपटांची घोषणा होत आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक…