Friday, March 21, 2025
Homeमहत्वाची बातमीकोकणची मोठी झेप उघडेल विकासाचा नवा मार्ग!

कोकणची मोठी झेप उघडेल विकासाचा नवा मार्ग!

अनघा निकम-मगदूम

आंबा, काजू आणि मासे यावर अवलंबून असलेली कोकणाची अर्थव्यवस्था! अर्थात या अर्थव्यवस्थेत मोडणारा कोकण हा रायगडचा थोडासा भाग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इतक्यातच मर्यादित ठेवला पाहिजे. त्यातही रायगडमध्ये औद्योगिकीकरण वेगाने वाढत आहे, तर सिंधुदुर्गमध्ये पर्यटन व्यवसायाने गोव्याशी स्पर्धा करण्यास सुरुवात केली आहे. मध्येच असणाऱ्या आणि आपल्या अनेक पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक वैशिष्ट्यांनी स्वतःचे वेगळेपण जपणाऱ्या रत्नागिरीच्या प्रगतीचा प्रवास मात्र संथ गतीने सुरू आहे. पारंपरिक चौकटीच्या बाहेर जाऊन वेगळं काही करण्यासाठी आवश्यक धाडस अजूनही रत्नागिरीमध्ये दिसून येत नाही. त्यातच आजवरच्या अनेक सरकारांनी कोकणाला अनेकदा सापत्न वागणूक दिल्याचे म्हटले जाते. तरीही रत्नागिरी आणि कोकणातील अन्य जिल्हे जे हाताशी आहे त्याच्या जोरावर विकासाच्या वाटेवर आपापल्या ताकदीने आपले मार्गक्रमण करत आहेत. असे असले तरीही रत्नागिरी आणि उर्वरित कोकणाकडे अजूनही स्वतःची प्रगती करण्यासाठी खूप वाव आहे, तशा प्रकारचे रिसोर्सेस उपलब्ध आहेत. मात्र त्याकडे सर्वार्थाने वेगळ्या पद्धतीने बघण्याची गरज निर्माण झाली आहे.

या सगळ्यात केवळ रत्नागिरीचाच जरी विचार केला तरीही या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच उपलब्ध साधनांचा, क्षमतांचा, क्रयशक्तीचा एकत्रित विचार करून कालबद्ध योजना आखणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. एक जिल्हा असूनही जिल्ह्यातील मंडणगडपासून राजापूरपर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यातील विकासाचे ठोकताळे वेगवेगळे असल्याचे दिसून येते. त्यामुळेच इथला विकास आजही फळे आणि मासे इथपर्यंतच थांबल्याचे प्रकर्षाने जाणवते. खरतर आंबा, काजू, मासे ही इथली उत्पन्नाची साधने ऋतुमानावर आधारित आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस या साधनांवर अवलंबून राहून प्रगती करणे जिकरीचे झाले आहे. आंबा, काजूला ‘अवकाळी’चा शाप लागला आहे, तर मासेमारीला अवैध मासेमारीचे ग्रहण लागले आहे. बागायती आणि मासेमारी यावर अवलंबून असलेल्या लोकांना याची सातत्याने झळ बसत आहे. त्यामुळेच या परिघाबाहेर जाऊन विचार करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे .

गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरीबाबत एक नकारार्थी दृष्टिकोन सर्वत्र पसरताना दिसून येतो. रत्नागिरीत प्रत्येकाला विरोधच होतो ही पसरलेली मानसिकता इथल्या विकासाला मारक ठरली आहे. त्यामुळेच इथे येऊ इच्छिणाऱ्या संस्था, उद्योग समूह, व्यक्ती यांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. बदल ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. निसर्गसुद्धा बदलतच असतो. १० वर्षांपूर्वीचे वातावरण आता दिसणार नाही. मग पर्यावरण बचाव ही व्याख्या कालानुरूप बदलली पाहिजेच ना! मात्र त्याच शब्दांचा वापर करून अपूर्ण माहितीवरून अनेकदा चांगले प्रकल्प जिल्ह्यातून बाहेर गेलेले आहेत. जर पर्यावरणाला घातक प्रकल्प नको आहेत, तर इतक्या वर्षांत पर्यावरणपूरक प्रकल्प किती आले आणि त्याचा रत्नागिरीकरांना फायदा किती? हा विषय संशोधनाचाच असेल. ज्यांनी प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांचे नेतृत्व केले, त्यांनी इथल्या विकासासाठी कधीच पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळेच रायगड आणि सिंधुदुर्ग या दोन विकासाच्या वाटेवर आघाडीवर असलेल्या जिल्ह्यांच्या मध्ये असलेल्या रत्नागिरीचा विकास मात्र अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

खरं तर सिंधुदुर्ग हा जिल्हा रत्नागिरीचे लहान भावंड! १९८१च्या जिल्हा विभाजनामध्ये स्वतंत्रपणे नांदू लागलेला जिल्हा! मात्र वेगळा झाल्यानंतर या जिल्ह्याने स्वतःमध्ये बदल करण्यास सुरुवात केली. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्यासारखे एकहाती नेतृत्व या जिल्ह्याला लाभले. सिंधुदुर्गवासीयांनी जेव्हा बदल स्वीकारले तेव्हा त्यांनी प्रगती केली, काळाच्या सोबत ते पावले टाकू लागले. रायगड मुंबईजवळ असल्याने त्याचा परिणाम या जिल्ह्याला जाणवू लागला आहे. तसाच वेग रत्नागिरीनेही घेतला, तर कोकण अधिक समृद्ध होईल. आंबा, काजू, मासे याच्या पलीकडे प्रक्रिया उद्योग, पर्यटन विकास, शैक्षणिक विकास, कला मनोरंजनाचा व्यावसायिक विकास अशा पद्धतीने विचार होणे आवश्यक वाटते. तसं म्हटलं तर कोकणाकडे, या भागाच्या विकासाकडे राज्य शासनाचे अन्य प्रदेशांइतके लक्ष जात नाही. विकासासाठी योजना राबविताना किंवा आराखडा ठरवतानाही कोकणाला बरेचदा शेवटच्या क्रमांकावर येऊन थांबावे लागते. तरीही एक चांगली गोष्ट पुढे आली आहे. ती म्हणजे शासनाने घोषित केलेल्या जिल्हानिहाय दरडोई उत्पन्न गटात दोन्ही जिल्ह्याचे स्थान चांगले आहे. दरडोई उत्पन्नाच्या जिल्हानिहाय आकडेवारीमध्ये सिंधुदुर्ग हा सहाव्या आणि रत्नागिरी जिल्हा नवव्या क्रमांकावर आहे. मात्र असे असले तरीही इथल्या सर्वांगीण विकासासाठी अजूनही बरचसे आकाश मोकळे आहे, हे संपूर्ण आकाश कवेत घेण्यासाठी थोडी मोठी झेप घेण्याची गरज आहे इतकेच!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -