डॉ. विजया वाड
पल्लवी मैत्रिणींबरोबर रमतगमत शाळेतून यायचा बेत करीत होती. आज ती विशेष आनंदात होती. नुसती तीच नव्हे, तिच्या मैत्रिणीसुद्धा!
“पल्लू, आज आमच्या बरोबर बरफ का गोला खा हं!”
“तुम्ही रोज रोज खाता?”
“नाऽऽय गं! आज तू येणार म्हणून. ईद का चांद!” पल्लवीला खूप बरं वाटलं. बरफ का गोला ही चीज तिने कधी काळी खाल्ली असेल, तर या मैत्रिणींबरोबरच! तीही चोरून. आज बाबा फिरतीवर गेले म्हणून हा सुयोग आला. नाहीतर नेहमी साडेपाचच्या ठोक्याला हजर स्कूटर घेऊन. जिभेवर ती लालुस थंडुस चव चाखत… लाडक्या मैत्रिणींबरोबर गुपचूप गोळा चोखत… अहाहा…!
“पल्लवी…” अरे, आईची हाक कुठून आली? तिने चमकून बघितलं. ती रिक्षात होती.
“बाबा फिरतीवर गेलेत” आईची टकळी सुरू होण्याआधी ती पटकन रिक्षाजवळ गेली. तिचा जाम विरस झाला.
आईने जोरात साद घातली. पण एक्कीनेही रिक्षात चढायची तयारी दर्शवली नाही.
त्यांना एकमेकींबरोबर दंगपंगा करीत रस्ता काटायची ओढ होती. रिक्षाने भुर्रकन घरी मुळीच जायचं नव्हतं.
“आई, मला बरफ का गोला हवाय.”
“अगं पण गाण्याची काँपिटिशन आहे उद्या. तुझा आवाज बसला म्हणजे?”
“नाही बसणार गं आणि त्या काँपिटिशनमध्ये मला सहावी, सातवी, आठवी… तीन वर्षं पहिलं बक्षीस मिळालंय. बरं दिसतं का पुन्हा भाग घेणं?”
“यंदाच तर घ्यायचा! बस! पुढल्या वर्षी सांगणारेय का मी? दहावीची प्रचंड तयारी. छे. माझा तर बाई जीव दडपून जातो. तरी तुझे बाबा वेल प्लॅन्ड आहेत पल्लवी. अगं, पंचवीस हजार भरून क्लासला तुझी अॅडमिशन पक्की केलीय.”
“मला नाही जायचं कोचिंग क्लासला.”
“आम्हाला तरी कुठे आवडतं? पण स्पर्धेच्या युगात नुसती शाळा पुरत नाही गं. त्यातून शाळेत पाट्या टाकतात गं नुसत्या. शिकवीत नाहीत धड.”
“आमच्या शाळेत असं नसतं. शिक्षक शिकवतात मन लावून
आणि क्लासला जाऊ नको असं हेडमॅडम म्हणतात.”
“पंचवीस हजार भरलेत, तर जावं हे लागणारच. बोर्डात यायचंय ना? त्या क्लासवाल्यांनी हमी दिलीय बरं. स्कॉलर बॅचला घालतील तुला. दर शनिवार, रविवार पेपर देणार, म्हणजे परीक्षाच. ती जर चांगली उतरली नाही, तर सोमवारी क्लासनंतर पुन्हा परीक्षा. ते स्कॉलर मुलांच्या बाबतीत कोणताही धोका पत्करायला तयार नसतात. एकदा हमी घेतली म्हणजे हमी! एवढी पंचवीस हजार फी घेतली म्हणजे त्यांना घेतल्या पैशाला प्रामाणिक राहायलाच हवं ना!” केवळ घर आलं म्हणूनच तिची बोलती बंद झाली. कुलूप उघडून तिने लेकीचं दप्तर खांद्यावरून अलगद काढलं. ते नीट ठेवलं. तिला हातपाय धुतल्याबरोबर टॉवेल दिला. घरी घालायचा फ्रॉक लगेच पुढ्यात!
“आज तुझ्यासाठी खास ओल्या नारळाच्या करंज्या केल्यात. त्या खा नि लगेच रियाझला बस. गोडांबे बाई म्हणाल्या की, यमनकल्याणच घ्या उद्याच्या काँपिटिशनला. तू खाऊन घे, तोवर मी तंबोरा काढते.”
“आता नको. रात्री बसू. आता मी टीव्ही बघणारेय.”
“पल्लवी… शहाणी ना तू? हे बघ… मी आजचं टाइमटेबल काय सुरेख केलंय… सहा ते सात रियाझ. मग सात ते सव्वासात आपल्या गच्चीवर वॉक. मग सव्वासात ते आठ गृहपाठ. आठ ते साडेआठ पाठांतर स्पर्धेची तयारी. साडेआठ ते नऊ तुझी लाडकी ‘अमानत’ सीरियल नि त्याचवेळी जेवण, नऊ ते दहा गणिताची स्पेशल तयारी. मी स्वत: करून घेणार. दहा ते साडेदहा उद्याच्या गाण्याची परत एकदा तयारी. मग झोप!”
हुश्श! वाजले एकदाचे साडेदहा हिच्या टाइमटेबलमध्ये. पल्लवीला एकदम आठवलं. ‘माझ्या परिसरातील उपयुक्त पक्षी’ हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रायोजकांचा निबंध उद्याच सबमिट करायचा होता.
“आई, आज तो पक्ष्यांवरला निबंध मला पुरा करायचा आहे. त्यामुळे आज नाही तुझ्या टाइमटेबलला मान देता येणार.” पल्लवीला सूक्ष्म आनंद होत होता. पण तिची आई लगालगा आत गेली, बाहेर येताना तिच्या हातात एक लिफाफा होता. लांबच लांब चेहऱ्यावर विजयोत्सव!
“बघ!” तिने लिफाफ्यातून फुलस्केप पेपर्सचं एक भेंडोळं काढलं. सुंदर पक्षी मुखपृष्ठावर. तिचं नाव कोरीवकातीव आणि आत चक्क निबंध! अक्षरसुद्धा बरंचसं तिच्यासारखं. तिचंच वाटावं असं. खाली
कोणते संदर्भग्रंथ वाचले त्याची सुबक सूची. आईने अत्यंत अभिमानाने म्हटलं.
“आज दिवसभर हे काम केलं. माझी बॉटनीची पुस्तकं… झुऑलॉजीची पुस्तकं… झालंच तर आपण घेतलेलं ते सलीम अलींचं “पक्षी निरीक्षण…” काम फत्ते! अक्षरही खूप तुझ्यासारखं काढलंय.” “पण हे माझं नाही. या निबंधाला बक्षीस लागलं, तर मला खूप अपराधी वाटेल.” पल्लवीला भरून आलं.
“अपराधी कशाला वाटायला हवं? तू मला स्वयंपाकात मदत करतेस, तेव्हा मला वाटतं का अपराधी? मी बाबांची लेटर्स ड्राफ्ट करून देते कधी कधी… त्यांना वाटतं का अपराधी?”
ती आईच्या बिनतोड विचारमांडणीकडे बघत राहिली. आई तंबोऱ्याची गवसणी काढत होती. पण पल्लवीला काही गाता येईना. तिला गाताच येईना!
“का गं? थकलीस का?” आई काळजीत पडली.
“नाही. पण मला गावंसं वाटत नाही.” लेक म्हणाली.
“उद्याच्या स्पर्धेत तू गाशील?” तिने आईला विचारलं.
“वेडी का तू? मला कसं गाऊ देतील? जे दृश्य स्वरूपात आहे ते तुलाच करायला हवं पल्लवी. मला करू नाही देणार जग.” तिने आईचा हात घट्ट धरला. डोळे झरझर वाहत होते.
“मग आई, तू इतकं नको करूस. मला या प्रेमाचंसुद्धा ओझं झालंय. मला तुमच्यावर धड रागावतासुद्धा येत नाही. तुमच्या करण्याचं सतत दडपण मनावर येतं. मला अगदी चारचौघीसारखं साधं जगू दे. प्लीज आई. माझ्यावर रागावू नकोस. पण…” ती ओक्साबोक्शी रडायला लागली. आईने तिला जवळ घेतलं. तिला वाटत राहिलं, जरा जास्तीच झालं…