Tuesday, March 18, 2025
Homeसाप्ताहिककोलाजदाक्षिणात्य सिनेमांपुढे बॉलिवूड खुजे का?

दाक्षिणात्य सिनेमांपुढे बॉलिवूड खुजे का?

राकेश जाधव

एखाद्याची वेळ कधी बदलेल सांगता येत नाही. एखाद्या क्षणी आकाशाला गवसणी घालणारे कधी पुढच्या क्षणात कोसळतील, हेही कुणास ठाऊक नसतं. काहीशी अशीच अवस्था (खरं तर दुरवस्था!) हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजेच बॉलिवूडची झाली आहे. कारण कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर चित्रपटगृहं सुरू झाल्यापासून हाताच्या बोटांवर मोजता येतील, जेमतेम इतकेच हिंदी चित्रपट थोड्या फार प्रमाणात बॉक्स ऑफिसवर चालले आहेत. तथापि, अनेक बड्या कलाकारांच्या हिंदी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पहिल्या वीकेंडलाच मान टाकली. याची अनेक कारणं असतील, पण त्यातील एक महत्त्वाचं कारण म्हणजे उत्तम ‘कंटेट’चा अभाव.

कथा, पटकथा, दिग्दर्शन, अभिनय, संगीत, कॅमेरावर्क आणि इतर तांत्रिक बाबींना ‘कंटेट’ म्हटल्यास गेल्या काही महिन्यांत प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांच्या तुलनेत दाक्षिणात्य चित्रपट कितीतरी उजवे ठरले आहेत. उत्तम कंटेटचे असे अनेक दाक्षिणात्य चित्रपट ‘पॅन इंडिया’ स्तरावर संपूर्ण देशभर हिंदीत डब होऊन प्रदर्शित झाल्याने त्यांना प्रेक्षकांनी दिलेला दमदार प्रतिसाद बॉलिवूडला धडकी भरवणारा आहे. कारण अक्षयकुमार, सलमान खान, रणवीर सिंग, शाहिद कपूर अशा बड्या बॉलिवूड स्टार्सचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धाडकन आपटले. त्यातल्या त्यात अपवाद ठरला तो केवळ ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट. पण त्याही चित्रपटाला मिळालेलं यश जेमतेम होतं. त्या तुलनेत दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा – द राइज’, ‘आरआरआर’ आणि ‘केजीएफ २’ला मिळालेलं बेफाम यश अनेक ‘बॉलिवूड स्टार्स’च्या डोळ्यांसमोर ‘तारे’ चमकावणारं ठरलं. त्यामुळे दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये असं काय आहे, ज्यामुळे बॉलिवूडचे चित्रपट अगदी खुजे वाटू लागतात, असा प्रश्न मनात डोकावत राहतो.

हिंदीत डब केलेले दाक्षिणात्य चित्रपट पाहण्याची सवय लागण्यामागे कोरोनामुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन बऱ्याच अंशी कारणीभूत आहे. याच कालावधीत यूट्यूबवर मोफत उपलब्ध असलेले हिंदी डब चित्रपट प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करू लागले. त्यामुळे अनेक दाक्षिणात्य कलाकार व इतर तंत्रज्ञांना प्रेक्षक ओळखू लागले. अर्थात, त्याआधीही रजनीकांत, कमल हसन, चिरंजीवी अशा दाक्षिणात्य अभिनेत्यांचे हिंदी चित्रपट यशस्वी ठरत होतेच. पण मूळ दाक्षिणात्य भाषेत असणारे व हिंदीत डब केलेले चित्रपट पाहण्याचं वेड बाहुबलीने लावलं आणि अभिनेता प्रभास, दिग्दर्शक एस. एस. राजामौली ही नावं हिंदी प्रेक्षकांच्या परिचयाची झाली. बाहुबलीचा हाच वारसा बाहुबली-२, केजीएफ, पुष्पा, आरआरआर, केजीएफ-२ ने पुढे चालवला.

दरम्यान, याच कालावधीत हिंदी चित्रपटांकडे मात्र त्यांच्याच हक्काच्या प्रेक्षकांनी पाठ फिरवली. याचं सर्वांत मोठं उदाहरण म्हणजे शाहरुख खानच्या झिरोपेक्षा त्याच दिवशी पॅन इंडिया स्तरावर हिंदीत डब झालेल्या केजीएफने मिळवलेलं अफाट यश. शाहरुखसारख्या बॉलिवूडच्या बादशाहच्या चित्रपटापेक्षाही हिंदी प्रेक्षकांसाठी तुलनेनं अनोळखी असलेल्या कन्नड चित्रपटसृष्टीतील यशच्या केजीएफला प्रेक्षकांचं मिळालेलं प्रेम बॉलिवूडचे डोळे उघडवण्यास पुरेसं होतं. पण प्रेक्षकांना गृहीत धरून आम्ही काहीही दाखवलं तरी लोकांना ते आवडतंच असा भ्रम मनात बाळगलेल्या बॉलिवूडने यातून कोणताही धडा घेतलाच नाही. उलट बॉलिवूडचे अनेक निर्माते सुपरहिट ठरलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक करण्याच्या मागे लागले. याचा व्हायचा तो दुष्परिणाम झालाच. उदाहरणार्थ, गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झालेला शाहिद कपूरचा जर्सी हा चित्रपट. दाक्षिणात्य अभिनेता नानीनं आपल्या नैसर्गिक अभिनयानं प्रचंड उंचीवर नेऊन ठेवलेला मूळ तेलुगू चित्रपट जर्सी यूट्यूबवर मोफत आणि तोही हिंदीत उपलब्ध असतानाही त्याचाच हिंदी रिमेक बघायला प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये येतीलच असा अतिआत्मविश्वास बॉलिवूडवाल्यांना येतोच कुठून? हा प्रश्न इतर अनेक रिमेक चित्रपटांनाही विचारता येईल.

नेमकं प्रेक्षकांना काय आवडतं, याची नस दाक्षिणात्य चित्रपटांनी अचूक पकडलेली आहे. दुसरीकडे, बालिश रिमेक आणि अतार्किक सिक्वेलच्या मागे धावणाऱ्या बॉलिवूडची नौका मात्र आता गटांगळ्या खाऊ लागली आहे. प्रेक्षक केवळ सुपरस्टारच्या नावावर चित्रपटगृहांत गर्दी करत नाहीत, त्यांना पैसा वसूल चित्रपट हवा असतो. त्यात त्यांना कथाही लागते, शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारी पटकथाही हवी असते, टाळ्या वाजवता येतील, असे संवाद त्यांना ऐकायचे असतात, पाय थिरकायला लावणारं संगीतही त्यांना आवडतं… पण नेमक्या यातीलच अनेक गोष्टी सध्याच्या हिंदी चित्रपटांमध्ये शोधूनही सापडत नाहीत. त्यामुळे सुमार दर्जाच्या अतिरेकामुळेच बॉलिवूडचे बरेचसे चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटांसमोर खुजे वाटू लागतात. अर्थात, हे सत्य स्वीकारून सुपरस्टारपेक्षा चित्रपटाच्या कंटेट वर अधिक पैसा खर्च करण्याची तयारी बॉलिवूडने दाखवली, तरच ही चित्रपटसृष्टी आपला जुना लौकिक मिळवू शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -