मुंबई (प्रतिनिधी) : मशिदीवरील भोंग्यांवरून राज्यातील राजकारणात खळबळ माजवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर टीका केली. ‘असे भोंगेधारी, पुंगीधारी व त्यांचे खेळ खूप पाहिलेत… असे खेळ करणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही’, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना टोला हाणला. एका दैनिकाला दिलेल्या खास मुलाखतीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.
यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर खरमरीत टीका केली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर घणाघात केला. ‘अशा खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही, हे खेळाडू नेमक्या कोण – कोणत्या मैदानात कोणते-कोणते खेळ करतात, हे आतापर्यंत लोकांनी अनुभवले आहे. कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ, असे खेळ महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहेत’, असे ते म्हणाले.
‘दोन वर्षांचा कालखंड फार मोठा होता. या दरम्यान सर्व बंद होते. मग करमणूक फुकटात मिळत असेल, तर का नाही पाहायची? असेही ते म्हणाले. शिवसेनेला ओळख करून देण्याची गरज नाही. शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, मला ते लपवायची गरज नाही आणि मी ते करणारही नाही. सध्या मार्केटिंगचा जमाना आहे, नाही पसंत पडलं तर परत करा, तसे हे तुमचं फळलं तर फळलं नाहीतर परत, असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप पाहिलेत’, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली. भोंग्यांचा विषय गाजलेला वाटत नाही. मला माझ्या जनतेच्या जीवाची पर्वा आहे. केंद्राने भोंग्याबाबत धोरण ठरवावे. राज ठाकरेंचा अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न आहे. हिंदुत्वाचा डंका आम्हाला वाजवावा लागत नाही. शिवसेनेने कधीच झेंडा बदलला नाही, असेही ते म्हणाले.