Saturday, December 14, 2024
Homeक्रीडाचेन्नईविरुद्ध हैदराबादचे पारडे जड

चेन्नईविरुद्ध हैदराबादचे पारडे जड

पुण्याच्या स्टेडियममध्ये रंगणार सामना

मुंबई (वार्ताहर) : आयपीएलच्या १५व्या हंगामात रविवारी सनरायझर्स हैदराबादचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. यंदा सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज दुसऱ्यांदा भिडतील. गेल्या सामन्यात सनरायझर्सने सुपर किंग्जचा ८ गडी राखून पराभव केला होता. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील हैदराबादचे सध्या १० गुण असून टॉप ४ मध्ये टिकून राहण्यासाठी त्यांच्यासाठी या सामन्यात विजय आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत हैदराबादसाठी जिंकणे अनिवार्य आहे. आतापर्यंतचा दोन्ही संघांचा प्रवास पाहता हैदराबादचे पारडे जड असल्याचे दिसते.

दुसरीकडे, चेन्नईच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा जवळपास मावळल्या आहेत. त्यामुळे एका विजयाने त्यांना काही विशेष फरक पडणार नाही. चेन्नई सुपर किंग्सच्या बंगळूरु तसेच नंतर मुंबईविरुद्धच्या विजयामुळे चाहत्यांमध्ये थोडी आशा निर्माण झाली होती; परंतु गुजरात आणि पंजाब यांच्याविरुद्धच्या पराभवामुळे खरे पाहता, चेन्नईला प्लेऑफमध्ये जाण्याची आजिबात संधी नाही. नवा कर्णधार रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने फक्त २ सामने जिंकले आहेत. चेन्नई ४ गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी आहेत, तर सनरायझर्स १० गुणांसह ४ थ्या स्थानी आहेत.

सलामीवीर गायकवाडने फॉर्ममध्ये येणे चेन्नईसाठी गरजेचे आहे, तर हैदराबादकडे वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅनसेन, उमरान मलिक आणि टी नटराजन असे तगडे गोलंदाजी आक्रमण आहे. राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम आणि निकोलस पूरन यांच्या रूपाने त्यांच्याकडे फलंदाजीही सक्षम आहे. त्यामुळे त्यांना हरवणे चेन्नईसाठी सोपे नसेल.

चेन्नईसाठी शिवम दुबे व अंबाती रायुडूने अनुक्रमे २४७ आणि २४६ सर्वाधिक धावा केल्या आहेत. गोलंदाजीत ड्वेन ब्राव्होने सर्वाधिक १४ विकेट्स व तिक्षणा ८ विकेट्स घेतल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादने गुजरात टायटन्सविरुद्धचा आपला मागील सामना पाच सामन्यांत सलग जिंकल्यानंतर गमावला होता. रशीद खानने त्याच्या माजी क्लबविरुद्ध विजयी धावा ठोकल्याने सामना शेवटच्या चेंडूवर पूर्ण झाला होता. तथापि, संघ पुनरागमन करण्यास सक्षम आहे.

स्थळ : एमसीए स्टेडियम, पुणे. वेळ : रात्री ७.३०वा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -