मुंबई (प्रतिनिधी) : ‘मशिदीवरचे भोंगे काढायला लावले, तर यांची हातभर फाटली आणि बाबरी मशीद आम्ही पाडली, असे सगळीकडे सांगत सुटतात’, अशा जहरी शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, असेही फडणवीसांनी निक्षून सांगितले. मुंबईतील सोमय्या मैदानात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘बुस्टर डोस’ सभा पार पडली. या सभेत फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले. ‘बाबरी मशीद पाडली तेव्हा एकही शिवसैनिक उपस्थित नव्हता, मी उपस्थित होतो’, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केला आणि भाजपच्या ‘बुस्टर डोस’ सभेत जाहीर सभेत खळबळ उडवून दिली.
बाबरी मशिदीवरून शिवसेनेला लक्ष्य करताना फडणवीस म्हणाले की, ते (उद्धव ठाकरे) काय म्हणाले परवा, बाबरी मशीद पडली तेव्हा कुठल्या बिळात होते. कोणीतरी प्रश्न केला, मशिदींवरील भोंगे काढायला यांना जमले नाही आणि हे म्हणतात आम्ही बाबरी मशीद पाडली. तो बाबरी ढाचा… मी त्याला मशीद मानत नाही. कोणी हिंदू, मशीद पाडू शकत नाही. तो ढाचाच होता. अभिमानाने सांगतो तो ढाचा आम्हीच पाडला. माझा सवाल आहे, तो ढाचा पडला तेव्हा तुम्ही कुठे होता. मी अभिमानाने सांगतो तो ढाचा पाडला, तेव्हा मी त्याच ठिकाणी होतो. एवढेच नाही तर, त्याआधी कारसेवेमध्ये याच राम मंदिराकरिता बदायूच्या तुरुंगात मी १८ दिवस घालवले’.
‘बाबरी पडली त्यावेळी महाराष्ट्रातून एकही नेता तिथे गेला नव्हता. एकही शिवसैनिक तिथे हजर नव्हता. बाबरी मशीद पडली त्यावेळी कुणावर आरोप झाला? त्यावेळी ३२ आरोपी होते, त्यात भाजप नेते लालकृष्ण अडवणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंग, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, रामविलास वेदांती… आणि त्यातला एक आरोपी मंचावर आहे, ते म्हणजे जयभान सिंग पवय्या… या ३२ आरोपींमध्ये एकही शिवसेना नेता नाही. आमचा दोष एवढाच आहे, आम्हाला प्रसिद्धी करता येत नाही, अनुशासन तोडता येत नाही.”
बाबरी रामसेवकांनी पाडली…
‘बाबरी पडल्यानंतर सगळ्यांनी मिळून बैठक घेऊन ठरवले, कुणी एकाने श्रेय घेण्याचे कारण नाही. हे कुणी काम केले असेल, तर रामसेवकांनी केले. म्हणून भाजपच्या कोणत्याही नेत्याला विचारले की, बाबरी कुणी पाडली? तर तो शिस्तीत सांगायचा, की बाबरी पाडणारे हे रामसेवक होते, कारसेवक होते’.
तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही…
‘मशिदीवरचे भोंगे काढायला लावले, तर यांची हातभर फाटली आणि बाबरी मशीद आम्ही पाडली, असे सगळीकडे सांगत सुटतात’, अशा जहरी शब्दांत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. ‘तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. हिंदुत्व ही अशी व्याख्या आहे की, ज्या हिंदुत्वाने जीवनाचा मार्ग दाखवला. तुमच्या सरकारमधले मंत्री भ्रष्टाचार करून जेलमध्ये गेलेत, म्हणूनच महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे, असे म्हणत फडणवीसांनी आघाडी सरकारला लक्ष्य केले. फडणवीस म्हणाले की, लक्षात ठेवा महाराष्ट्र म्हणजे १८ पगड जातीच्या १२ कोटी लोकांनी जो प्रदेश समृद्ध केला आहे, तो प्रदेश म्हणजे महाराष्ट्र. त्याचा सन्मान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही आणि आज हेही सांगण्याची वेळ आली आहे की, तुम्ही म्हणजे, हिंदू नाही… पण मी हे म्हणणार नाही. ‘ज्या छत्रपतींनी आम्हाला अस्मिता दिली, आम्हाला जगण्याचा अधिकार दिला, त्या महाराष्ट्रातील जनतेला आज महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. ‘महाराष्ट्र दिन’ फक्त साजरा करण्याचा दिवस नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्याचा आज दिवस आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.