नवी मुंबई (प्रतिनिधी) : कुमार कार्तिकीया, रीले मेरेडीथ यांची प्रभावी गोलंदाजी आणि त्याला मिळालेली सूर्यकुमारच्या अर्धशतकाची साथ या जोरावर यंदाच्या हंगामातील सलग ८ सामन्यांमधील पराभवांनंतर अखेर मुंबईच्या विजयाचा सूर्य उगवला. मुंबईने तगड्या राजस्थानला अनपेक्षित पराभूत करत विजयाचे खाते अखेर खोलले. मुंबईने गुणांचे खाते उघडले असले तरी या स्पर्धेमधील त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
१५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेला मुंबईचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने राजस्थानविरुद्धही निराशा केली. अवघ्या २ धावा करून हा तगडा फलंदाज माघारी परतला. इशन किशनही फार काळ थांबला नाही. त्याने १८ चेंडूंत २६ धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या जोडीने मुंबईला संकटातून बाहेर काढत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या.
या जोडीने ८१ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने ३९ चेंडूंत ५१ धावांचे योगदान दिले, तर तिलक वर्माने ३० चेंडूंत ३५ धावा केल्या. तळात टीम डेवीडने ९ चेंडूंत नाबाद २० धावा करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी मुंबईने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरच्या फलंदाजीची जादू मुंबईविरुद्धही चालली. त्याने एका बाजूने धावांना वेग वाढवत ठेवला. मात्र दुसऱ्या बाजूने राजस्थानचा एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. देवदत्त पडीक्कलच्या रुपाने पाचव्या षटकात शोकीनने मुंबईला पहिला बळी मिळवून दिला. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन, डारेल मिचेल अनुक्रमे १६ आणि १७ धावा करून माघारी परतले. तळात अश्वीनने ९ चेंडूंत २१ धावांची धडाकेबाज कामगिरी करत राजस्थानच्या राजस्थानच्या धावांची गती वाढवली.