Tuesday, April 29, 2025

महामुंबई

धुमधडाका’ फेम अभिनेत्री प्रेमा किरण यांचे निधन

धुमधडाका’ फेम अभिनेत्री प्रेमा किरण यांचे निधन

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील एके काळच्या गाजलेल्या नायिका प्रेमा किरण यांचे रविवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्या ६१ वर्षांच्या होत्या. त्यांनी ‘अर्धांगी’, ‘धुमधडाका’, ‘दे दणादण’ यांसारख्या चित्रपटांत काम केले होते. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत प्रेमा किरण हे खूप मोठे नाव होते. त्यांची आणि स्व. लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी तुफान हिट झाली होती. दे दणादण, धुमधडाका चित्रपटातील प्रेमा किरण आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी चांगलीच गाजली होती.

‘अर्धांगी’, ‘धुमधडाका’, ‘दे दणादण’, ‘गडबड घोटाळा’, ‘सौभाग्यवती सरपंच’, ‘माहेरचा आहेर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका त्यांनी साकारल्या होत्या. तसेच ‘पागलपन’, ‘अर्जुन देवा’, ‘कुंकू झाले वैरी’ आणि ‘लग्नाची वरात लंडनच्या घरात’ या चित्रटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. पितांबर काळे दिग्दर्शित ‘गाव थोर पुढारी चोर’ या चित्रपटातून दिसल्या. ‘फ्रेंडशिप बँड’ आणि ‘एए बीबी केके’ या चित्रपटांतही त्या होत्या.

त्यांनी जवळपास ४७ चित्रपटांतून भूमिका केल्या. प्रेमा यांनी केवळ मराठी चित्रपटातच नव्हे, तर गुजराती, भोजपुरी, अवधी, बंजारा या भाषांतील चित्रपटांमध्येही काम करत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. बहुभाषिक अभिनयासोबतच त्यांनी चित्रपटनिर्मितीत पाऊल टाकले होते. ‘उतावळा नवरा’ या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली होती आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

Comments
Add Comment