मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात भाजप पुन्हा आक्रमक झाली असून लवकरच नालेसफाईच्या कंत्राटाबाबत भाजपकडून पोलखोल केली जाणार आहे.
२०१७ मध्ये शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेवर आल्यानंतर भाजपने पहारेकऱ्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेतील अनेक भ्रष्टाचार भाजपने समोर आणले. रस्ते कामातील अनियमितता, राणी बागेच्या कामातील अनियमितता तसेच बेस्टच्या निविदेमधील घोटाळा असे भ्रष्टाचार भाजप नेत्यांनी समोर आणले आहेत. दरम्यान नालेसफाईच्या कामांच्या पाहणीचे दौरेदेखील भाजपकडून करण्यात आले. नालेसफाईच्या कामात काय चुका होत आहेत? याबाबत भाजपने आयुक्तांना पत्र देखील दिले होते.
दरम्यान मुंबई महापालिकेवर आता सत्ताधाऱ्यांची सत्ता नसली तरी भाजप आपल्या पहारेकऱ्याच्या भूमिकेत आहे. ७ मार्च २०२२ ला महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाल संपल्यानंतर ८ मार्चला प्रशासक नियुक्त करण्यात आले. मात्र प्रशासक नियुक्त केल्यानंतरही भाजपने पालिकेवर आपले लक्ष ठेवले आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा भाजप आक्रमक झाली असून नालेसफाईच्या कामांची पाहणी केल्यानंतर पालिकेकडून देण्यात आलेल्या कंत्राटाबाबत भाजपकडून कागदपत्रे गोळा केली जात आहेत. तसेच कोणती कंत्राटे कोणत्या दराने देण्यात आली याबाबतही माहिती गोळा केली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप पालिकेतील भ्रष्टाचार समोर आणण्याच्या तयारीत आहे.