दोन वर्षांत राज्यात ३७ एमएसएमई क्लस्टर उभारणार
‘एमएसएमई’ मंत्रालयाकडून मिळणार संपूर्ण सहकार्य
मुंबई (प्रतिनिधी) : आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी उद्योजक होऊन रोजगार निर्माण करा, असे आवाहन करत यासाठी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली. महाराष्ट्र दिनानिमित्त सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग मंत्रालय तसेच सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग विकास संस्था, ‘झेप उद्योगिनी’ आणि ‘वी एमएसएमई’च्या सहकार्याने १ ते ३ मे दरम्यान मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे ‘महाराष्ट्र एमएसएमई एक्सपो २०२२’ हे तीनदिवसीय व्यावसायिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून नारायण राणे यांच्या हस्ते रविवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
देशाच्या एकूण निर्यातीपैकी एमएसएमई क्षेत्राचा निर्यातीमधील वाटा हा ५० टक्के आहे, तर आर्थिक वृद्धीत या क्षेत्राचे योगदान ३० टक्के असून ते पुरेसे नाही. या दोन्ही ठिकाणी हे क्षेत्र पहिल्या क्रमांकावर असावे यासाठी मंत्रालयाचे निरंतर प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले. तसेच आर्थिक क्षमता वाढविण्यासाठी नागरिकांनी उद्योगांकडे वळावे, असा सल्ला त्यांनी दिला. केवळ उद्योगांचे प्रस्ताव घेऊन पुढे या,उद्योगांच्या प्रगतीसाठी ‘एमएसएमई’ मंत्रालयाचे सहकार्य कायमच राहील, असे राणे यांनी सांगितले. देशाच्या विकासात मुंबई आणि महाराष्ट्राचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. येत्या दोन वर्षांत एमएसएमई अंतर्गत महाराष्ट्रात ३७ ‘क्लस्टर’ उभे करणार असल्याची माहिती देत त्यांनी महाराष्ट्रात उद्योगवाढीसाठी उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमाला जागतिक व्यापार केंद्राच्या कार्यकारी संचालक रूपा नाईक, एमएसएमई महाराष्ट्र संस्थेचे संचालक प्रशांत पार्लेवार, दुबईस्थित ‘पेशवा’ हॉटेलचे व्यवस्थापकीय संचालक सचिन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. जास्तीत जास्त महिलांना उद्योजक बनण्यासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने आवश्यक ते सर्व सहकार्य करावे, अशी विनंती जागतिक व्यापार केंद्राच्या कार्यकारी संचालक रूपा नाईक यांनी यावेळी केली.
मुंबईत साकीनाका येथील एमएसएमई केंद्राच्या जागेत प्रदर्शन आणि परिषद केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव यावेळी देण्यात आला आहे, असे एमएसएमई महाराष्ट्रचे संचालक प्रशांत पार्लेवार यांनी सांगितले. महिला उद्योजकांची ‘उद्यम’अंतर्गत नोंदणी करून त्यांना केंद्र सरकारच्या ई – मार्केट प्लसवर संधी देण्यात यावी, अशी मागणी केली. या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक उद्योजकांना नवीन व्यावसायिक तसेच सरकारच्या सहकार्याने व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होणार आहे. लघू, मध्यम उद्योग योजना, कॉर्पोरेट कंपन्यांसोबतचा व्हेन्डर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, मुद्रा कर्ज योजना, परदेशातील व्यावसायिक संधी, आयात-निर्यात या विषयांवर मार्गदर्शन देखील या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे.