Tuesday, July 23, 2024
Homeसाप्ताहिककोलाजक्या तुम हो मेरे अपने?

क्या तुम हो मेरे अपने?

डॉ. स्वप्नजा मोहिते

जिंदगी तुम मेरे ख्वाब में आती हो…
पलको पे सतरंगी पंछी झिलमिलाते हैं तब…
मेरे खयालो में उमडते सवालोंको तब तुम हँस के उडा देती हो…
जुगनू चमकते हैं जब रात में, तब रात की स्याही की चादर ओढे…
तुम रोती हो चुपके से…
उजाले में जब शबनम के कतरे पत्तो पे ठहरे होते हैं…
तब ए जिंदगी तुम मुझे यूं मिल जाती हो!!!

गच्चं धुक्यातून वाट शोधत चालावं आणि रस्ताच सापडू नये… सापडलाच तर तो आपलाच का? असा प्रश्न पडावा… असं काहीसं झालंय. अशा संभ्रमात असताना ती मला भेटते. एक खूप जुनी मैत्रीण!

माणसाचं मन म्हणजे नक्की काय याचा शोध घेणारी. नाकावरचा चष्मा सारखा करत, ती बोलायला लागली की, माझी तंद्री लागते. खूप काही अगम्य, खोलवर विचार करणारं बोलते ती! सायकॉलॉजी तिचा जीव की प्राण! माझ्या डोक्यात प्रश्न पेरत, ती निघून जाते आणि मी परत धुक्यात वाट शोधत बसते. नको ना पेरून जाऊस असे प्रश्न… माझ्या आधीच गुंता झालेल्या मनात…! नंतर मी मनातल्या मनात तिला रागवत राहाते… तिच्या सावली भांडत बसते. पुढच्या भेटीत तिच्याकडून या प्रश्नाचे उत्तर मागायचा निश्चय करत राहते. तोपर्यंत मेंदूचा आलेख पार बिघडलेला असतो. तेव्हाच तिचा फोन येतो, काय करतेस? चल सीसीडीमध्ये जाऊया! सीसीडीतला कॉफीचा भलाथोरला मग तिच्यासमोर आदळावा आणि विचारावं तिला… अगं तुझे ते झपाटणारे प्रश्न माझ्या अल्पमती ब्रेनला पेलवत नाहीत. नको ठेवूस त्यांना माझ्यासमोर! का त्रास देतेस? मला तीचं उत्तरही माहित आहे यावर. तू खूप छान विचार करतेस! तिचं ते चष्मा नाकावर सरकवून, त्याच्यावरून माझ्याकडे बघणंही पाठ झालंय आता मला. हं! बोल… ती शांतपणे कॉफीचा घोट घेते आणि आमची चर्चा सुरू होते.

परवा तसंच झालं. फोनवर तिने बोलणे सुरू करण्याआधीच मी बोलून टाकलं, सीसीडी? किती वाजता? ठरल्याप्रमाणे मी तिची वाट बघत बसलेली, कोपऱ्यातलं आमचं नेहमीचं टेबल पकडून. बाईसाहेब आल्या तेव्हाच त्यांचा चेहरा पाहून मी ओळखलं… परत कुठला तरी गहन प्रश्न कॉफीबरोबर समोर येणार. तसंच झालं. तुला माहित आहे… सगळ्या स्त्रियांसमोर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय असतो ते? तिनं तिच्या टिपिकल स्टाईलमध्ये, नाकावरचा चष्मा खाली करत मला विचारलं. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न? आज जेवायला काय करायचं? मी माझा चेहरा शक्य तेवढा कोरा ठेवत उत्तरले. हा जोक होता? कॉफीवरच्या वाफेआडून डोळे मोठे करत तिने विचारलं. इथेच तर चुकतं ना! तुला खाण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही, टेबलवर मूठ आपटत ती म्हणाली. मी कॉफीचे मग्स सांभाळत, बावळट चेहऱ्यानं तिच्याकडे बघितलं.

“कुछ रिश्तों की बातें करते हैं…
कुछ मेरी तुम्हारी बाते करते हैं…
समय की बदलती करवटों पे…
कुछ उलझते सवालों की बाते करते हैं!”

अरे देवा! आता हिला काय झालं शायरी करायला? मी घाबरतच तिचा कॉफीचा मग तिच्याकडं सरकवला. माझ्यामते प्रत्येक स्त्रीच्या मनात प्रश्न असतो… तिचा नवरा… म्हणजे हजबंड… पार्टनर… सोलमेट खरंच तिचा असतो का? मी मनातल्या मनात परत तिच्या प्रश्नाची उजळणी केली. खरंच, हा प्रश्न असतो प्रत्येकीच्या मनात? प्रत्येक स्त्रीच्या मनात ही इन्सिक्युरिटी असते. खोल कोपऱ्यात ढकलून ठेवलेली… जाणूनबुजून दुर्लक्ष केलेली! ज्याला लाइफ पार्टनर म्हणून स्वीकारलं तो शेवटपर्यंत आपलाच असेल, याची शाश्वती नसतेच स्त्रीला! अगदी झोपडीत राहणाऱ्या स्त्रीपासून ते आलिशान महलों में रहनेवाली… सभी को सताता हैं, यह सवाल! तिच्या चेहऱ्यावर मंद सोनेरी प्रकाश सांडलेला! त्यात ती मला एखाद्या ग्रीक तत्त्ववेत्त्यासारखी भासली. या एका अलिखित, अनुच्चारित प्रश्नावर किती गोष्टी टिकल्यात… माहित आहे तुला? मी नकळत मन नकारार्थी हलवली.

“अगं साधी कपडे धुवायची जाहिरात घे साबणाची… हमारे साबून से हाथ खुरदरे नहीं होते… नेक्स्ट शॉट… मऊ हाताची बायको आणि तिचे हात हातात घेतलेला नवरा! म्हणजे हात मऊ राहिले, तरच बायको नवऱ्याला आवडणार नं! म्हणजे तो तिचा राहील! नाहीतर जाईल सोडून तिला! इन्सिक्युरिटी!!” मी तिचं लॉजिक ऐकतेय. “मॉइश्चरायझर… त्याचंही तसंच! नितळ त्वचा हवी? मग लावा आमचं मॉइस्चरायझर! मग नवऱ्याची नजर तुमच्यावरून हलणार नाही!” इस बात में दम हैं! मला थोडं थोडं पटतंय. “लहान मुलांच्या डायपरपासून तुमच्या घरातल्या कुठल्याही गोष्टीपर्यंत… स्त्रीनं हेच वापरावं, असंच वापरावं म्हणजे तुमचा लाइफ पार्टनर, तुमचा नवरा खुश राहतो! असंच ठसवलं जातं नं आपल्या मनावर?” तिनं तिचा चष्मा रागानं नाकावरून वर सरकवत विचारलं. माझं मन वेगवेगळ्या जाहिराती आठवतंय. टीव्हीवरल्या, दुकानांवर लावलेल्या, न्यूजपेपर्स आणि मॅगेझिन्समधल्या! खरंच हा अलिखित प्रश्न डोकावतोय का त्यातून?

अॅनिमल इन्स्टिंक्ट माणसातही आहेच की! या निसर्गताला माणूसही एक प्राणीच! म्हणजे पुरुष खरंच मनानं कुणाचाच नसतो का? खरं तर निसर्गानंच हे वेगळेपण शोधत राहण्याचा जन्मजात गुण दिलाय पुरुषाला! पण मग नातिचरामी… टिल डेथ डू अस पार्ट… हे नुसतं बोलण्यापुरतंच असतं का? मला अचानक माझ्या घरी येणारी मल्लम्मा आठवली. काळी सावली, ठसठशीत चेहऱ्याची, नाकात चमकी घालणारी! “इन मर्दोंका क्या अम्मा? कभी इधर… कभी उधर को नजर जाताच उनका!” टिपिकल हैद्राबादी लहज्यात ती सांगायची. नवऱ्याचं भरकटणं सांगताना रडत राहायची. तेव्हाच आठवली, आमच्या भिशी गृपमधली स्नेहा… खाणं अर्धवट टाकून, गप्पांचा फड सोडून घरी पळणारी! “अगं, नवरा यायच्या आत घरी गेलं पाहिजे गं… नाहीतर…!!” नाहीतर शब्दात किती तरी अर्थ दडलेले असायचे तिच्या!

हे, यू आर राईट! तो खरंच माझा असेल की, असेल त्याच्या मनात दुसरंच काही? धिस इज द क्वेश्चन! खरंच किती अतर्क्य आहे समजणं आपल्याच नवऱ्याचं मन? सोलमेट म्हणा… पार्टनर म्हणा… पण याच काही खरं नसतं, हेच खरं! “तुला माहितेय दि, (हे तिनं मला दिलेलं नाव)… महाभारतात म्हणे द्रौपदीच्या केवळ मनात आलं की, कर्ण पांडवांमध्ये असता, तर माझे सहा नवरे असते आणि मला असे अपमान, पीडा सहन करावे लागले नसते.” “जांभूळ आख्यानातलं ते जांभूळ झाडावर परत चिकटवण्यासाठी, तिला कृष्णाने हे सगळ्यांसमोर कबुल करायला सांगितलं. पण तिच्या पाची नवऱ्यांना मात्र, त्यांच्या मनातल्या दुसऱ्या स्त्रियांच्या विचारांचा काहीच कबुलीजबाब नाही द्यायला लावला त्यानं! खरं बोलण्याच्या नावाखाली तिला तिच्या केवळ विचारांची अशी शिक्षा! नुसता दुसऱ्या पुरुषाचा विचार केला, तरी शिक्षा होते स्त्रीला! आणि हे पुरुष मनात असंख्य जणींचा विचार करत, फिरत असतात, कधी उघडपणे बोलतातही… काही आपल्याच बायकोमध्ये दुसऱ्याच कोणालातरी पाहत असतात… त्यांना नो शिक्षा!”

मी आता खरंच तिच्यासारखा विचार करतेय. गेल्या वर्षभरात तिनं याच प्रश्नावर काम केलंय. तिच्या फाइलमध्ये डेटा मांडलाय. एक न विचारला गेलेला प्रश्न… सगळ्याच स्त्रियांच्या मनात सतत डंख मारत राहणारा… छळत राहणारा… एक अस्थिर जाणीव सतत मनात पेरणारा! स्त्री कितीही बदलली तरी तिला हवं असता एक स्थैर्य आणि एक आपलेपणाचं माणूस! पण ते खरंच तिला मिळतं का? मी पुन्हा तिच्या प्रश्नावलीत डोकं खुपसून बसलेय…

एक छोटासा ही तो घर बनाना हैं,
पर क्या तुम हो उस में?
थोडीसी ही तो छाँव बिछानी हैं,
पर क्या तुम रह पाओगे उस में?
चांदनी की रात थोडी, थोडी धूप सुनहरी
बस इतना ही तो सपना हैं,
पर क्या तुम हो इन में?
थोडा ही तो रहना हैं साथ,
बस उस मंजिल की डगर तक
पर क्या तुम हो साथ?
इतना ही एक सवाल हैं,
क्या तुम हो मेरे अपने…?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -