डोंबिवली (प्रतिनिधी) : डोंबिवली पूर्वेकडील इंदिरानगर झोपडपट्टी ही रेल्वेच्या सुमारे २६ एकर जमिनीवर अनेक वर्षांपासून असून गोरगरीब येथे वास्तव्य करीत आहेत. सदर जागेबाबत रेल्वे प्रशासनाने येथील संबंधित रहिवाशांना नोटीसा बजावून जागा रिकाम्या करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, भाजपा आमदार रविंद्र चव्हाण आणि स्व. नगरसेवक शिवाजी शेलार हे येथील जनतेच्या मदतीसाठी धावले होते. पत्रकार परिषद घेऊन या झोपडपट्टीवर बुलडोझर फिरवून प्रकल्प राबविणे योग्य नाही.
अगोदर येथील रहिवाशांचे पुनर्वसन करा, अशी मागणी केली होती. आता पुन्हा रेल्वे प्रशासने संबंधित लोकांना नोटीसा बजावल्या आहेत. भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी याबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन झोपडपट्टीवासीयांच्या समस्या मांडल्या आहेत. परिणामी याकडे दानवे यांनी सकारात्मक भूमिका घेत झोपडपट्टीवासीयांवर अन्याय होऊ नाही असे आश्वासन आमदार चव्हाण यांना दिले आहे.
आ. रवींद्र चव्हाण, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक साई शेलार, भाजप पदाधिकारी राजू शेख यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. पूर्वेकडील इंदिरानगर झोपडपट्टीवासीयांची घरे वाचवावी यासाठी आमदार चव्हाण यांनी दानवे यांना विनंती केली. दानवे यांना लेखी निवेदन देऊन त्यांचे म्हणणे दानवे यांच्या पर्यंत पोहोचविले. रेल्वे प्रकल्पातील बाधित इंदिरा नगर झोपडपट्टीत २५ हजार लोकवस्ती आहे. २६ एकर जमिनीवर या रेल्वेच्या जागेत १९७० पासून सुमारे २५ हजार कुटुंबे राहतात. या जागेवर प्रकल्प होणार असून जागा रिकामी करावी अशी नोटीस बजावल्याने येथील स्थानिक रहिवासी चिंतेत होते.
नागरिकांनी स्व. शिवाजी शेलार यांच्याकडे धाव घेतली होती. आमदार चव्हाण आणि स्व. शिवाजी शेलार यांनी त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन स्थानिकांना बेघर करण्याचे रेल्वे प्रशासनाच्या भुमिकेवर नाराजी व्यक्त केली होती.