
पुणे (वृत्तसंस्था) : कृणाल पंड्या, दुष्मंथा चमीरा आणि मोहसीन खान या गोलंदाजांच्या त्रिकुटापुढे पंजाबच्या फलंदाजांनी शुक्रवारी गुडघे टेकले. लखनऊच्या या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांना मान वर करू दिली नाही. त्यामुळे लखनऊने हा सामना २० धावांनी जिंकत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
प्रत्युत्तरार्थ लखनऊच्या १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या पंजाबची सुरूवात तितकी चांगली झाली नाही. कर्णधार मयांक अगरवालच्या बॅटमधून धावा येत होत्या, पण दुसऱ्या बाजूला शिखर धवनने संयम बाळगला होता. त्यामुळे सुरवातीला विकेट वाचवणे त्यांना जमले असले तरी धावांना गती देण्याच्या प्रयत्नात अगरवालने आपली विकेट गमावली. चमीराने पंजाबला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर शिखरचाही संयम सुटला. भानुका राजापक्षालाही फार काळ मैदानात थांबता आले नाही. त्यामुळे ५८ धावांवर पंजाबचे ३ फलंदाज माघारी परतले होते.
त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि लिवींगस्टोन या जोडीने पंजाबला सावरण्याचा प्रयत्न केला. या जोडीने ३० धावांची भागीदारी करत पंजाबच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात लिवींगस्टोनने विकेट गमावली. जॉनी बेअरस्टोचाही संयम सुटला. त्याने २८ चेंडूंत ३२ धावांचे योगदान दिले. रुषी धवनने फलंदाजीची सूत्रे हाती घेतली.

पण दुसऱ्या फलंदाजाकडून त्याला साथ मिळालीच नाही. २० षटकांअखेर पंजाबला ८ फलंदाजांच्या बदल्यात १३३ धावांपर्यंतच मजल मारता आली. लखनऊच्या कृणाल पंड्या आणि दुष्मंथा चमीरा यांनी कमालीची गोलंदाजी केली. कृणालने ४ षटकांत अवघ्या ११ धावा देत २ विकेट मिळवल्या. दुष्मंथा चमीराने ४ षटकांत १७ धावा देत २ बळी मिळवले. मोहसीन खाननेही गोलंदाजीत लक्ष वेधून घेतले. त्याने ४ षटकांत २४ धावा देत ३ बळी मिळवले.
प्रथम फलंदाजीला आलेल्या लखनऊला तिसऱ्याच षटकात रबाडाने पहिला धक्का दिला. चांगलाच फॉर्मात असलेल्या कर्णधार लोकेश राहुलला यष्टीरक्षक शर्माकरवी झेलबाद केले. क्वींटॉन डी कॉक आणि दिपक हुडा या जोडीने सावध खेळ करत लखनऊचे धावफलक खेळते ठेवले. या जोडीने लखनऊची धावसंख्या शतकासमीप नेत त्यांना चांगला प्लॅटफॉम उभारून दिला.
त्यामुळे लखनऊ मोठी धावसंख्या उभारेल अशी अपेक्षा होती. तेवढ्यात संदीप शर्मा पंजाबसाठी धाऊन आला. त्याने सेट झालेल्या क्वींटॉन डी कॉकला यष्टीरक्षक शर्माकरवी झेलबाद करून पंजाबला मोठा बळी मिळवून दिला. क्वींटॉन डी कॉकने लखनऊकडून सर्वाधिक ४६ धावा केल्या.