अजय तिवारी
भारतात कोरोनाच्या दोन लाटांनी जनजीवन आणि अर्थव्यवस्था दोन्हीही ठप्प करून टाकले. वाढती बेरोजगारी, घटलेलं उत्पन्न, महागाई अशा दुष्टचक्रातून देश गेला. या पार्श्वभूमीवर भारतात कोरोनाची चौथी लाट येईल का, आली तर तिची तीव्रता किती असेल याबाबत मतमतांतरं आहेत; परंतु भारतात सध्या आढळत असलेली रुग्णसंख्या आणि लसीकरणाची कमी झालेली गती पाहता आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना संपत आला असंच वाटायला लागलं होतं. एका जिल्ह्यात आढळणारी रुग्णसंख्या आता देशात एका दिवशी आढळत आहे. कोरोनाच्या दोन लसी घेतल्याने आणि काहींनी बुस्टर डोसही घेतल्याने कोरोनाचा प्रसार कमी होत आहे. कोरोनाची बाधा झाली, तरी आता पूर्वी इतका त्रास होत नाही आणि रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे देशातले बहुतांश निर्बंध मागे घेतले गेले; परंतु आता त्यापैकी काही निर्बंध पुन्हा लावले जाण्याची शक्यता आहे. दिल्ली, पंजाब आदी राज्यांमध्ये तर मुखपट्टीसारखे निर्बंध पुन्हा लागू झाले आहेत. महाराष्ट्रात मुखपट्टी आणि सामाजिक अंतर भानाचे निर्बंधही हटवण्यात आले आहेत. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे लोक बिनधास्त व्हायला लागले आहेत. कोरोनासोबत जगायचं ही भावना वेगळी आणि कोणतीही नियमावली न पाळता वागायचं ही भावना वेगळी. गेल्या दोन दिवसांमध्ये या अानुषंगाने येणाऱ्या बातम्या चिंता वाढवणाऱ्या आहेत. जगातल्या १२१ ठिकाणच्या समुद्रातल्या पाण्यांच्या नमुन्यांचा अभ्यास केला, तेव्हा वैज्ञानिकांना कोरोनाच्या साडेपाच हजार प्रजाती आढळल्या. त्यातले पाच प्रकार तर अगदीच नवीन आहेत. कोरोनाचा विषाणू आपलं रूप वारंवार बदलत आहे. काही उत्प्रेरकं घातक आहेत. जगातल्या काही देशांमध्ये आता कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढायला लागले आहेत. भारतातही तसंच व्हायला लागलं आहे. केंद्र आणि राज्यांनी दिलेली कोरोना नियमांमधली ढील बाधितांची संख्या वाढायला कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. पुन्हा एकदा कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे.
आजघडीला जगात कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा वेग पुन्हा वाढला आहे. भारतात सलग सहाव्या दिवशी दोन हजारांहून अधिक प्रकरणं आढळून आली आहेत. चीनच्या शांघायमध्ये कोरोनामुळे रोज सुमारे ४० मृत्यू होत आहेत, तर वीस हजार संक्रमित आढळत आहेत. त्याच वेळी, जर्मनी आणि फ्रान्समध्ये एका आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढली आहे. आफ्रिका आणि अमेरिकेतही कोरोनाचा आलेख झपाट्याने वाढत आहे. जगाचा संदर्भ देण्याचं कारण आता परदेशात येण्या-जाण्यावरील निर्बंध कमी झाल्यामुळे भारतात परदेशी नागरिकांचं येण्याचं आणि भारतातून बाहेरच्या देशात जाण्याचं वाढलेलं प्रमाण लक्षात घेतलं तर आपल्याला किती काळजी करावी लागेल, हे स्पष्ट होतं. अलीकडे भारतात रोज कोरोनाचे सुमारे अडीच हजार नवीन रुग्ण आढळत असून तीस जणांचा मृत्यू होत आहे. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन छत्तीसगड सरकारने राज्यातल्या सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी घालणं सक्तीचं केलं आहे. कुठेही थुंकण्यास मनाई आहे. त्याचबरोबर सामाजिक अंतर भान पाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. चंदिगड प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणं, शैक्षणिक केंद्रं, सरकारी आणि खासगी कार्यालयं आणि सर्व प्रकारच्या इनडोअर कार्यक्रमांमध्ये मुखपट्टी घालणं अनिवार्य केलं आहे. मुखपट्टी न घातल्यास पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे.
दरम्यान, कर्नाटक सरकारनेही मुखपट्टी घालणं आणि सामाजिक अंतर भान सक्तीचं केलं आहे. त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड ही राज्यं कोरोनामुक्त झाली आहेत. हरियाणातल्या १८-५९ वयोगटातल्या लोकांना मोफत बुस्टर डोस देण्याची व्यवस्था तिथल्या सरकारनं केली आहे. यासाठी तीनशे कोटी रुपयांच्या खर्चाचा भार राज्य सरकार उचलणार आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आधी हॉंगकॉंग आणि आता शांघाय कोरोनाच्या विळख्यात आहे. चीनमध्ये कोरोनामुळे मरण पावलेल्या लोकांचं सरासरी वय ७९ वर्षं आहे. ते कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त होते. फ्रान्समध्ये ५८ हजार आणि अमेरिकेत १२ हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. दक्षिण कोरियामध्ये सर्वाधिक ६४ हजार ७२५ नवीन रुग्ण आढळले आहेत. अन्य देशांमध्येही रुग्णसंख्येत हजारांनी भर पडत आहे. गेल्या वर्षाच्या मध्यात, जागतिक आरोग्य संघटनेने जून २०२२ पर्यंत प्रत्येक देशात कोरोनावरची सत्तर टक्के लस उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाकांक्षी लक्ष्य पुढे ढकललं आहे. बऱ्याच आरोग्यतज्ज्ञांचं म्हणणं आहे की, बहुतेक कमी उत्पन्न असलेले देश लक्ष्यापेक्षा खूपच मागे असतील. अमेरिकेची मदत बंद झाल्यामुळे आणि सरकार आणि देणगीदारांच्या प्राधान्यक्रमात बदल झाल्यामुळे हे घडलं आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, अनेक देश वीस टक्क्यांच्या खाली आहेत. याउलट, जगातल्या दोन तृतीयांश श्रीमंत देशांमध्ये सत्तर टक्के लस दिली गेली आहे. जागतिक मोहीम अपूर्ण ठेवल्यास नवीन धोकादायक प्रकारांचा उदय होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. चौथ्या लाटेसाठी ही चिंताजनक स्थिती असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र आणि मिझोराम सरकारांना पत्र लिहिलं आहे. राज्यांना सतर्कता वाढवण्यास आणि संसर्गाचं प्रमाण वाढण्याच्या कारणांचा गांभीर्याने तपास करण्यास सांगितलं आहे. सध्या दक्षिण कोरिया, जर्मनी, फ्रान्स, व्हिएतनाम, इटली, चीन, अमेरिका या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. ओमिक्रॉनचे सब-व्हेरिएंट बी.२ आणि एक्सई व्हेरिएंट या ताज्या लाटेला जबाबदार असल्याचं मानलं जातं.